भारतीय तत्त्वज्ञान समजून घ्यावे

0
349

डॉ. सीताकांत घाणेकर
अंतरंग योग -58

खरे म्हणजे कठीण तत्त्वज्ञान गोष्टीरूपात सांगायची छान पद्धत भारतात आहे. गोष्ट लक्षात राहते पण आपण तत्त्वज्ञान विसरतो. त्यामुळे आचरण होत नाही. फक्त कर्मकांड मात्र केले जाते.

काळ-वेळ कुणासाठीही थांबत नाही. विश्‍वांत नैसर्गिक आपत्ती असू दे किंवा कोरोना असू दे. सृष्टीचक्र अविरत चालू असते. दिवसामागून महिने, महिन्यामागून वर्षे… पुढे पुढे जातच असतात. असाच श्रावण मास गेला. भारतात विविध छान छान उत्सव झाले. त्यातील मुख्य म्हणजे रक्षाबंधन आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी.

उत्सवातील कर्मकांडं करताना आपल्याला मजा येते. कोरोनामुळे छोट्या प्रमाणात का होईना अनेकांनी, अनेकांकडे, अनेक प्रकारे सण साजरे केलेत. पण त्यामागील भाव व ऋषीप्रेरित तत्त्वज्ञान समजले का? त्याप्रमाणे आचरण बदलले का? योगसाधनेमध्ये हाच विचार केला जातो.

आता भाद्रपद उजाडला. शुद्ध चतुर्थीला प्रत्येकाच्या आवडीचा हा उत्सव – श्रीगणेश चतुर्थी. या दिवसाला ‘महासिद्धीविनायकी’देखील म्हणतात. मोठ्या आनंदाने व उत्साहाने हा सण साजरा केला जातो. कुठे दीड दिवस तर कुठे अडीच दिवस तर कुठे पाच दिवस.. ते बारा दिवस. त्याचबरोबर प्रत्येकाच्या घरी किंवा सार्वजनिक ठिकाणी. ह्या उत्सवासंदर्भातही आपले ज्ञानी तत्त्ववेत्ते ऋषी आम्हाला आमच्या जीवनासंबंधी अत्यंत उपयुक्त व आवश्यक तत्त्वज्ञान सांगतात. भारतात अनेक संस्था आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत आहेत. समाजप्रबोधनाचे त्यांचे कार्य अविरतपणे चालूच असते. त्यांच्या विविध कार्यक्रमातून – प्रवचने, साहित्य… त्या संस्था समाजापर्यंत पोचवण्याचे कार्य करीत असतात. गणपतीबद्दलही छान माहिती त्यात मिळते.

पू. पांडुरंगशास्त्री आठवलेंनी या विषयावर फार विस्तृत माहिती दिली आहे.
१. गणेश चतुर्थी म्हणजे गणपतीची चतुर्थ अवस्था. तुर्यावस्थेपर्यंत सिद्धीची जाणीव करून देते. या दिवशी चंद्र पाहण्यास निषेध आहे. चंद्र हा मनाची देवता आहे- चंद्रमा मनसो जातः!

  • चंद्र जसा वाढतो- घटतो तसे मनही माकडासारखे नाचत- बागडत असते. तुर्यावस्थेपर्यंत पोहचू पाहणार्‍या मानवाने मनाच्या चंचलतेच्या अधीन होता कामा नये. चित्तएकाग्र केले पाहिजे. मनाच्या तालावर नाचण्यात मानव जीवनाचा विकास नाही, तर अधःपतन आहे. ही गोष्ट चंद्रदर्शनाच्या निषेधामध्ये गर्भित आहे.
    आपण योगसाधनेमध्ये तर अशाच विचारांचा अभ्यास व चिंतन करतो. बालपणी आम्हाला एक गोष्ट सांगत असत-
  • एक दिवस गणपती आपल्या वाहनावर म्हणजे उंदरावर बसून फिरत होता. त्याचे ते मोठे पोट व जास्त वजन आणि उंदीर तर छोटासा. त्यामुळे पाय घसरून उंदीर पडला. त्याबरोबर गणपतीसुद्धा जमिनीवर जोराने कोसळला.
    तिथे बाजूला चंद्र होता. तो हे दृश्य पाहून मोठ्याने हसला. गणपतीला राग आला व त्याने चंद्राला शाप दिला- ‘चतुर्थीच्या दिवशी जो कुणी तुझे दर्शन घेईल त्याच्यावर चोरीचा आळ येईल.’
    वडीलधार्‍या व्यक्ती चांगल्या मीठ-मसाला लावून ही गोष्ट सांगत व आम्ही मुलेसुद्धा कान टवकारून ऐकत असू. पण या गोष्टीत आम्हाला बोध मिळाला…
  • कुणीही पडला तर त्याला हसायचे नाही. उठायला मदत करायची.
  • चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन घ्यायचे नाही. आम्ही फार दक्षता घेत असू. हे दिवस म्हणजे पावसाचे. त्यामुळे रस्त्यावर लहान-मोठी डबकी असायची. एक भीती होती- त्या पाण्यात चंद्रबिंब दिसले तर? चोरीचा आळ येणार… म्हणून वर-खाली कुठेही बघायचे नाही. किती निरागसपणा या बालमनाचा! आता खरा आध्यात्मिक अर्थ कळला. त्यामागील मनाच्या चंचलतेबद्दल विशिष्ट तत्त्वज्ञान ज्ञात झाले. खरे म्हणजे कठीण तत्त्वज्ञान गोष्टीरूपात सांगायची छान पद्धत भारतात आहे. गोष्ट लक्षात राहते पण आपण तत्त्वज्ञान विसरतो. त्यामुळे आचरण होत नाही. फक्त कर्मकांड मात्र केले जाते.
    या गोष्टीप्रमाणेच आणखी एक छान गोष्ट गणेशाच्या उत्पत्तीबद्दल प्रचलित आहे-
  • शंकर भगवान हिमालयात राहतात. ते ध्यान करण्यासाठी गेले होते. इकडे पार्वतीला अंघोळीसाठी जायचे होते पण राखण करण्यासाठी कुणीही नव्हते. म्हणून तिने आपल्या अंगाचा मळ काढला. त्याची मूर्ती बनवली व त्यात प्राण फुंकला. त्या लहान मुलाला तिने सांगितले की ती अंघोळ करायला जाते आहे तेव्हा आतमध्ये कुणालाही सोडू नकोस.
    कथाकार सांगतात की शंकर दहा वर्षे तपश्‍चर्या करत होते. ते त्याच दिवशी परत आले. आत जाऊ लागले तर त्यांच्या मुलाने त्यांना अडवले. शंकर त्याला ओळखत नव्हते. त्यांना क्रोध आला. त्यांनी लगेच आपले त्रिशूळ काढले आणि त्याचे मस्तक धडावेगळे केले.
    एवढ्यात पार्वती बाहेर आली. ती घटना बघून आक्रोश करू लागली. तिने शंकराला आपल्या मुलाला जिवंत करण्यास सांगितले. शंकराने आपल्या गणांना जंगलात पाठवले आणि सांगितले की सगळ्यात पहिले जो कुणी प्राणी किंवा जीव त्यांना दिसेल त्यांचे मस्तक कापून आणावे. गणांना सर्वांत आधी हत्तीचे पिल्लू भेटले. म्हणून त्याचे मस्तक घेऊन ते तिथे आले व शंकराने आपल्या मुलाच्या धडाला ते चिकटवून टाकले.

आम्हा लहान मुलांना आनंद व्हायचा. पण बालमनात कसलेही प्रश्‍न मनात येत नसत. पण आता आपण प्रौढ झालो. या वयात तरी बुद्धीत अनेक प्रश्‍न यायला हवेत. संक्षेपामध्ये बघूया.-
१. पार्वतीच्या अंगावर एवढा मळ होता का?
२. शंकर तर भगवान आहेत, मग त्यांना अंतर्ज्ञानाने सत्य कळू नये?
३. दहा वर्षे तपश्‍चर्या करून आल्यानंतर त्यांचे मन शांत असायला हवे होते. मग त्यांना एवढा क्रोध कसा आला? आणि आला तर आला पण सरळ एका लहान मुलाचे मस्तकच उडवायचे?
४. स्वतःच्या मुलाला जिवंत करण्यासाठी दुसर्‍याचे मस्तक कापायचे?
असे अनेक प्रश्‍न. पण त्या प्रश्‍नांची उत्तरे शोधण्यापेक्षा साधकांनी परस्पर भावार्थ, गर्भितार्थ, आध्यात्मिक अर्थ व त्या कथेमागील उच्च तत्त्वज्ञान अभ्यासायला हवे.
पांडुरंगशास्त्री म्हणतात – ‘‘पुराणांची भाषा भावगर्भित तशीच लक्षण व रूपके यांनी भरलेली असते. बुद्धिवादी माणसाने स्वतःची बुद्धी कसाला लावून भावगर्भित अर्थ शोधून काढून आनंद प्राप्त करून घ्यायचा असतो आणि बालबुद्धीने वाचून आनंद मिळवायचा असतो’’. आता आपण एक एक विषय विस्ताराने पाहू.

१. गणपती – हा शब्द दोन शब्दांतून आलेला आहे- गण + पती म्हणजे समूहाचा पती. म्हणजे नेता. तो गणपतीदेखील असायला हवा. तसेच नेता तत्त्ववेत्ता असायला हवा. त्याच्यात बाह्य सौंदर्य नसले तरी आंतरिक सौंदर्य असायला हवे.

२. गणपती हा समाजाचा नेता आहे. ती तत्त्वज्ञानाची, बुद्धीची देवता आहे, जो बुद्धिमानच असणे अपेक्षित आहे. संकुचित वृत्तीची व्यक्ती महान तत्त्ववेत्ता व सफल नेता बनू शकत नाही.

३. गणपतीचे महत्त्व जाणल्यामुळे प्रत्येक शुभकार्यात त्याचे प्रथम पूजन होते. श्रीगणेशपूजा.
लहानपणी शाळेत जाण्यापूर्वी प्रथम दिवशी पाटी-पुस्तके घेऊन गणेशपूजन केले जात असे. तसेच गुरुजी पाटीवर ‘श्रीगणेश’ लिहीत असत. त्यानंतरच शिक्षण सुरू होत असे. त्या अल्पबुद्धीच्या वयात फक्त कर्मकांडं लक्षात राहिले.

तसे पाहिले तर कोणत्या आईला हत्तीच्या मस्तकाचा मुलगा आवडेल? आपणातील बहुतेकजण भगवंताकडे मुलगा मागतो. समजा पार्वतीने आम्हाला सांगितले- * मी तुम्हाला मुलगा देते पण त्याचे मस्तक माझ्या मुलासारखे, हत्तीचे असेल. कारण आता त्याचे मित्र त्याची मस्करी करतात. त्याच्यासारखी अनेक मुलं झाली की मग ते व्यंग राहणार नाही. तर आपण काय उत्तर देऊ? बहुतेकजण गप्पच राहतील. पण मनात नकारच असेल. तसे पाहिले तर लक्षात येईल की जेव्हा एक-दोघांचीच शरीर-रचना वेगळी असते तेव्हा ते व्यंग वाटते. अनेकांची तशी रचना असली की ते नॉर्मल वाटते.
उदा. आफ्रिकेतील निग्रो- त्यांचा रंग काळा, ओठ मोठे… जपानी-चायनीज-उत्तर भारतीय यांचे डोळे बारीक. अशी विविध उदाहरणे आहेत. पण तो आपला विषय नसल्यामुळे व्यर्थ चिंतन नको. तसेच यातील विनोद विसरून भारतीय तत्त्वज्ञानाचा विचार करूया. विषय पुष्कळ मोठा आहे. सगळेच एका दिवशी नको. योगसाधकांना चिंतन करायला वेळ हवा.

आज आपण वरील मुद्यांवर चिंतन करून इतरांशी चर्चा करून पुढील मुद्यांवर चर्चा करू. (संदर्भ ः पू. पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या प्रवचनांवर आधारित – संस्कृती पूजन)