अजून वेळ हवा

0
331

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीतून अमली पदार्थ व्यवहाराचे एक वेगळेच प्रकरण समोर आलेले आहे. आता या प्रकरणाचा प्रत्यक्ष सुशांतसिंहच्या मृत्यू अथवा आत्महत्येशी थेट संबंध आहे की नाही हे अजून स्पष्ट व्हायचे आहे, परंतु बॉलिवूडच्या चंदेरी झगमगाटाआडची आणखी काही भुते मात्र या प्रकरणाच्या तपासाच्या निमित्ताने वर आलेली आहेत हे निश्‍चित.
सुशांतसिंह मृत्यूप्रकरणात अजूनही काही अत्यंत महत्त्वाचे प्रश्न अनुत्तरित आहेत. सुशांतसिंह राजपूत हा जर अमली पदार्थांचे सेवन करीत होता, तर तो स्वतःहून ते करीत होता की त्याची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिच्या व्हॉटस्‌ऍप चॅटमध्ये जे सांकेतिक संदेश आढळले आहेत, त्यात म्हटल्यानुसार तिचा त्यामध्ये वाटा होता हे स्पष्ट करायचे आव्हान तपास यंत्रणांपुढे आहे. त्याचा मृत्यू हा खरोखरच आत्महत्या आहे की अन्य काही कारणाने तो ओढवला आणि त्यावर पांघरूण घालण्यासाठी आत्महत्येचा बनाव रचला गेला हेही तपासावे लागणार आहे.
आतापर्यंत सुशांतसिंहशी संबंधित काही व्यक्तींना तपास यंत्रणेने अटक केली, त्यामध्ये त्याचा स्वयंपाकी दीपेश सावंत, व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा आणि रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक यांचा समावेश आहे. अशा प्रकारे जेव्हा संशयितांना थेट अटक होते, तेव्हा निश्‍चितच त्यामागे काही ठोस धागेदोरे सापडलेले असतात. अमली पदार्थ व्यवहारासंदर्भात या व्यक्तींचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे पुरावे तपास यंत्रणांना मिळालेले असल्याखेरीज ही कारवाई झाली नसती. त्यामुळे अजूनही या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी वेळ देणे आवश्यक आहे.
सुशांतसिंहच्या मृत्यूच्या आधी त्याच्या पूर्वीच्या व्यवस्थापिकेचा दिशा सॅलियन हिचा आपल्या इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून पडून जो संशयास्पद मृत्यू झाला, ते प्रकरणही आता या अनुषंगाने तपासले जाईल. ज्या पार्टीच्या वेळी ती घटना घडली, त्यात कोण कोण उपस्थित होते, तेथे नेमके काय चालले होते याचाही शोध तपासयंत्रणांना घ्यावा लागेल.
सुशांतसिंहचे मृत्यूप्रकरण खरोखरच चक्रावून टाकणारे आहे, कारण ज्या चौदा जूनच्या सकाळी तो त्याच्या सदनिकेत मृतावस्थेत आढळला, त्या दिवशी सकाळी नऊ वाजता त्याचे बहिणीशी बोलणे झाले होते. त्यानंतर एकाएकी तो संशयास्पद स्थितीत मृतावस्थेत आढळला. त्यामुळे या प्रकरणाचे गूढ वाढते. मुंबई पोलिसांनी सुरवातीला केलेल्या तपासकामामध्ये अनेक त्रुटी होत्या हे आता सीबीआयच्या हाती हे तपासकाम जाताच उघड झालेले आहे. त्यामुळे मुंबई पोलीस कोणाच्या दबावाखाली काम करत होते का, त्यांना अमली पदार्थांचे हे धागेदोरे का शोधावेसे वाटले नाहीत असे प्रश्न आता नक्कीच उपस्थित होतात.
सध्या मुंबई पोलिसांवर कंगना राणावतने केलेल्या शेरेबाजीचे एक आनुषंगिक प्रकरण गाजते आहे. शिवसेनेचे संजय राऊत विरुद्ध कंगना हा जो सामना रंगला आहे तो अनावश्यक व जनतेचे लक्ष सुशांतसिंह मृत्यू प्रकरणाच्या तपासकामापासून अन्यत्र वळवणारा आहे.
या प्रकरणामध्ये टीव्ही पत्रकारांचा नको एवढा हस्तक्षेप सध्या चालला आहे. जो तो स्वतः करमचंद असल्यासारखा या प्रकरणाच्या नव्या नव्या खर्‍या खोट्या बाजू उजेडात आणण्यासाठी धडपडताना दिसतो आहे. यातून तपासयंत्रणांना चुकीची दिशा मिळण्याचा संभव असतो. त्यामुळे अशा प्रकारच्या अतिउत्साहाला या पत्रकार मंडळींनी आळा घालायला हवा. तपासयंत्रणांना त्यांचे काम करण्यासाठी पुरेसा वेळ द्यायला हवा.
सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरण हे आता एवढे बहुचर्चित बनले आहे की त्यावर पांघरूण टाकणे कोणालाही शक्य होणारे नाही. त्यामुळे आज ना उद्या यातील सत्य उजेडात नक्की येईल हा विश्वास हवा.
सध्या बॉलिवूड आणि एकूणच जनतेमध्येही या विषयावर सरळसरळ दोन तट पडलेले दिसतात. सुशांतसिंहच्या कुटुंबियांची बाजू उचलून धरणारा एक गट आहे, तर रिया चक्रवर्ती ही कशी भोळीभाबडी आणि निर्दोष आहे हे ठासून सांगू पाहणारा दुसरा एक प्रभावशाली गट आहे. तिच्या खास मुलाखती घेतल्या गेल्या आणि तिचे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी भले भले पुढे झाले, परंतु सध्याच्या तपासाची दिशा पाहिली तर तिच्यावरची संशयाची सुई अजून हटलेली नाही, उलट ती अधिक गडद झालेली दिसते. त्यामुळे तपासयंत्रणांना त्यांचे काम करू द्यावे. वेळ द्यावा. आधीच निष्कर्ष काढून मोकळे होणे या टप्प्यावर मुळीच योग्य होणार नाही हे भान सर्वांनी ठेवले तरच सुशांतसिंहच्या मृत्यूचे रहस्य लवकर उलगडू शकेल!