चाचण्यांचे प्रमाण घटले; त्यामुळे रुग्णसंख्याही

0
290

>> ‘३४४ नवे रुग्ण, ३६६ जणांचे अहवाल प्रलंबित’

राज्यात काल नवे ३४४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येने आता २१ हजारांचा टप्पा पार केला असून रूग्णसंख्या २१,१७३ एवढी झाली आहे. सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ४५०१ एवढी आहे. दरम्यान, वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन सरकारने नवे दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ अतिरिक्त कोविड इस्पितळ करायचा निर्णय घेतला आहे.

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून कोविड स्वॅबच्या चाचण्यांचे प्रमाण कमी करण्यात आले आहे. दररोज साधारण केवळ एक हजाराच्या आसपास स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी केली जात आहे. बांबोळी येथील कोविड प्रयोगशाळेत ११९४ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून ३४४ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत, तसेच, ३६६ स्वॅबच्या नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. आरोग्य खात्याने १३१९ स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह ५८८ रूग्ण बरे झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. राज्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या १६,४२७ एवढी झाली आहे.

७६८० रुग्ण घरी
विलगीकरणाखाली
कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या ३५९ जणांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला असून होम आयसोलेशनखालील रुग्णांची संख्या ७६८० झाली आहे. गोमेकॉमधील विलगीकरण कक्षात १५७ जणांना दाखल करण्यात आले आहेत.

पणजीतील दोन हॉटेलांच्या
दोघा कर्मचार्‍यांना कोरोना
पणजी उच्च आरोग्य केंद्राच्या कक्षेत १४ नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून एकूण रूग्णसंख्या २१६ झाली आहे. करंजाळे, मळा, भाटले, सांतइनेज, पणजी शहरात कोरोना रुग्ण आढळले आहेत. शहरातील दोन हॉटेलांमध्ये काम करणारे दोन कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. उच्च न्यायालय, सरकारी कर्मचारी, फार्मसीमधील कर्मचारी, गोमेकॉचा कर्मचारी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.