पाच दिवसांनंतरही हत्येचे कारण गुलदस्त्यात

0
95

मडगाव येथील कृष्णी ज्वेलर्सचे मालक स्वप्नील वाळके यांच्या खून प्रकरणी आतापर्यंत तिघांना अटक केलेली असली तरी पाच दिवसांनंतरही खुनाच्या कारणाबाबतचे गूढ कायम आहे. राज्यात स्वप्नील वाळके यांच्या खुनाबाबत उलटसुलट चर्चा सुरू असली तरी पोलिसांकडून या खुनाबाबत कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केली गेलेली नाही.

या खून प्रकरणी गुन्हा अन्वेषण विभागाने तीन जणांना ताब्यात घेतले आहे, तर, मुख्य संशयित आरोपी मुस्तफा शेख मडगाव पोलिसांना शरण आला आहे. या प्रकरणात ताब्यात घेतलेल्या एडसन गोन्साल्वीस याच्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. स्वप्नीलच्या खुनाची सुपारी असलेली एक ऑडिओ क्लीप व्हायरल झाली. आता ही सुपारी कुणी दिली याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. या खून प्रकरणाच्या तपासासंदर्भात पोलिसांवर राजकीय दबाव असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

सदर खून प्रकरण मडगाव पोलीस स्थानकाच्या हद्दीत झाले होते. त्यामुळे मडगाव पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी प्राधान्य देण्याची गरज होती, परंतु, गुन्हा अन्वेषण विभागाने जोरदार कारवाई करून दोघांना ताब्यात घेऊन मडगाव पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर मुस्तफा याला पोलिसांना शरण येण्यास भाग पाडले. या खून प्रकरणी मडगाव पोलिसांकडून कोणतीही माहिती जाहीर केली नाही. त्यानंतर या खून प्रकरणाचा तपास गुन्हा अन्वेषण विभागाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. गुन्हा अन्वेषण विभागाने या प्रकरणी एव्हेंडर याला अटक केली, मात्र, एडसन याला अटक झालेली नाही. त्याला माफीचा साक्षीदार बनवण्यात येण्याची शक्यता आहे.

सराफाच्या दुकानाची पुन्हा पाहणी
मडगावातील सराफ स्वप्नील वाळके याचे खून प्रकरण पणजी येथील गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आल्यानंतर या विभागाचे निरीक्षक चेतन पाटील यांनी काल रविवारी सायंकाळी त्या सराफाच्या दुकानाची पुन्हा पाहणी केली. त्यावेळी आरोपी एवंडर रॉड्रीगीस यालाही तेथे नेण्यात आले होते.

पोलीस सध्या या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन तपास करीत आहेत. दोन महिन्यांमागे मुस्तफा शेख, ओंकार पाटील, एडसन गोन्साल्वीस हे कोणत्या हॉटेलात राहिले होते, कळंगुट येथील एका महिलेचा लुटलेला लाखो रुपयांचा सोन्याचा ऐवज कोणाला विकला होता, यावर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. खुनाच्या हेतूसंबंधी विविध वल्गना असल्या तरी या प्रकरणाच्या मुळाशी गेल्याशिवाय त्यावर बोलणे योग्य होणार नसल्याचे पोलिसांनी सांगितले.