त्रिनबागोने कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेत सलग दहा सामने जिंकून अपराजित राहताना स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळविले. आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात त्यांनी सेंट किटस् अँड नेव्हिस पॅट्रियोटस्चा ९ गडी व ५१ चेंडू राखून पराभव केला. पॅट्रियोटस्चा डाव १८.२ षटकांत ७७ धावांत संपवल्यानंतर त्रिनबागोने ११.३ षटकांत विजयी लक्ष्य गाठले.
प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर पॅट्रियोटस्ला सुरुवातीपासून धक्के बसले. त्यांच्याकडून यष्टिरक्षक दिनेश रामदिनने सर्वाधिक १९ तर कर्णधार रेयाद एम्रिटने १५ धावा केल्या. त्रिनबागोकडून लेगस्पिनर फवाद अहमद याने प्रभावी मारा करत २१ धावांत ४ गडी बाद केले. धावांचा पाठलाग करताना टियोन वेबस्टरने ३३ चेंडूंत नाबाद ४१ धावा करत त्रिनबागोचा विशाल विजय साकार केला.
आमिर जंगू (१९) संधीचा लाभ उठवू शकला नाही. स्पर्धेतील तिसाव्या व शेवटच्या साखळी सामन्यात सेंट लुसिया झूक्सने जमैका तलावाहज्वर ११ धावांना निसटता विजय मिळवला. झूक्सने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १४५ धावा केल्या. त्यांच्याकडून नजिबुल्ला झादरान याने सर्वाधिक ३५ धावा केल्या. रहकीम कॉर्नवॉलने ३२ तर रॉस्टन चेजने नाबाद ३२ धावा जमवल्या. तलावाहज्ने २२ अवांतर धावांची खैरात केली.
तलावाहज्कडून मुजीब रहमानने २ तर परमॉल, एडवर्डस्, कार्लोस ब्रेथवेट व लामिछाने यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना जर्मेन ब्लॅकवूड (२५) व ग्लेन फिलिप्स (४९) यांनी ११.४ षटकांत ८४ धावांची खणखणीत सलामी देऊनही तलावाहज्ला विजय संपादन करता आला नाही. झूक्सकडून चायनामन झहीर खान व लेगस्पिनर जावेल ग्लेन यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले.