कोरोना ः ५०८ पॉझिटिव्ह, ८ मृत्यू

0
314

राज्यात काल दिवसभरात नवे ५०८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून ८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील कोरोना रुग्णांच्या बळीच्या संख्या २२० एवढी झाली आहे. मागील तीन दिवसांच्या तुलनेत शुक्रवारी थोडे कमी रुग्ण आढळले. मात्र गेल्या चार दिवसांत २,४४५ रुग्ण आढळले आहेत. राज्यातील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या १९,८६३ एवढी झाली असून सध्याच्या रुग्णांची संख्या ४८९६ एवढी झाली आहे.

राज्यातील कोरोना गंभीर आजारी रुग्णांचे मृत्यूसत्र सुरूच आहे. आणखी ८ कोरोना रुग्णांचे निधन झाले. दवर्ली-मडगाव येथील ५४ वर्षीय महिला कोरोनाचा बळी ठरली. दवर्ली येथील ६० वर्षांच्या महिला रुग्णाला मृतावस्थेत मडगावच्या जिल्हा इस्पितळात काल आणण्यात आले होते. तिचाही कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. रायबंदर येथील ७८ वर्षांचा पुरुष रुग्ण, बाणावली येथील ७३ वर्षांची महिला रुग्ण, हळदोणा येथील ७६ वर्षांच्या महिला रुग्णाचे जीएमसीमध्ये गुरूवारी निधन झाले. वास्को येथील ७५ वर्षांच्या पुरुष रुग्णाचे गोमेकॉमध्ये काल निधन झाले. बेतकी येथील ६५ वर्षांच्या महिला रुग्ण आणि ४८ वर्षांच्या अनोळखी पुरुष रुग्णाचे मडगाव येथील कोविड इस्पितळात गुरूवारी निधन झाले.

बांबोळी येथील कोविड प्रयोगशाळेतून २१३९ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करून अहवाल जाहीर केला आहे. प्रयोगशाळेत तपासण्यात आलेले एक चतुर्थांश नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहे. ३८४ स्वॅबच्या नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. आरोग्य खात्याने २१५७ स्वॅबचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले.

३८६ रुग्ण कोरोनामुक्त
राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह ३८६ रुग्ण बरे झाले असून कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १४,७४७ एवढी झाली आहे.

पणजीत नवे २६ रुग्ण
पणजी उच्च आरोग्य केंद्राच्या कक्षेत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ सुरूच आहे. नवे २६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण काल आढळून आले असून कोरोना रुग्णांची एकूण संख्या २४३ झाली आहे.