जनतेच्या सुरक्षिततेसाठी पावले उचला ः कामत

0
308

मडगाव शहरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या खुनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील जनतेमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी सरकारने पावले उचलणे गरजेचे असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्वरित याची दखल घ्यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली आहे. मडगाव शहरात विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची गरज असून जे कॅमेरे खराब झालेले आहेत ते दुरुस्त केले जावेत. या कॅमेर्‍यांमुळे गुन्हेगारांचा छडा लावण्यास मदत होणार असल्याचे कामत यांनी स्पष्ट केले.

सरकारने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अनावश्यक खर्चाला आळा घालून जनतेच्या सुरक्षेसाठी त्वरित कृती करणे गरजेचे आहे. तसेच पोलीस खात्यातील रिकामी असलेली पदे भरून पोलीस यंत्रणेला बळ देण्याचे कामही सरकारने करावे, अशी मागणीही कामत यांनी केली आहे.
खासदार फ्रान्सिस सार्दिन यांच्या यापूर्वीच्या कारकीर्दीत मडगाव शहरात सीसीटीव्ही कॅमेरे खासदार निधीतून बसवण्यात आले होते. त्याचप्रमाणे कॉंग्रेसचे तत्कालीन राज्यसभा खासदार शांताराम नाईक यांनी फातोर्डा भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी खासदार निधीतून रक्कम मंजूर केली होती. परंतु सन २०१२ नंतर आलेल्या भाजप सरकारला कॅमेर्‍यांची देखभाल करणे जमले नाही. तसेच फातोर्डा येथे कॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव कागदोपत्रीच राहिल्याचे कामत म्हणाले.

पोलिसांनी बेकायदा शस्त्रे बाळगणार्‍यांवर त्वरित कारवाई करावी व शस्त्रे जप्त करावीत, अशी मागणीही कामत यांनी केली.