दाबोळी विमानतळावरील कोरोना निगेटिव्हची अट मागे

0
140

आता देशी विमानातून गोव्यात येणार्‍या प्रवाशांना आपण कोरोना निगेटिव्ह असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र घेऊन येण्याची आवश्यकता नाही. दाबोळी विमानतळावर प्रवाशांकडून अशा कोरोना निगेटिव्ह वैद्यकीय प्रमाणपत्राची मागणी करण्यात येणार नसल्याचे काल दाबोळी विमानतळावरील सूत्रांनी स्पष्ट केले.

केंद्र सरकारच्या अनलॉक-४ च्या मार्गदर्शक सूचनांनुसार देशी विमानातून गोव्यात येणार्‍या प्रवाशांना कोरोना निगेटिव्ह वैद्यकीय प्रमाणपत्र आणण्याची गरज नाही. त्यामुळे विमानतळावर अशा वैद्यकीय प्रमाणपत्राची मागणी केली जाणार नसल्याचे काल विमानतळ सूत्रांनी सांगितले. केंद्रीय गृहव्यवहार मंत्रालयाने अनलॉक-४ च्या मार्गदर्शक सूचनांतर्गत लोकांवर घातलेले कित्येक निर्बंध मागे घेतले आहेत. त्यात कोरोना निगेटिव्ह वैद्यकीय प्रमाणपत्राचाही समावेश आहे. त्याशिवाय राज्याच्या सीमांवरील चाचणीची अटही मागे घेण्यात आलेली आहे.

गोवा एअरपोर्टने मंगळवारी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आंतरराज्य प्रवासातील सर्व निर्बंध भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मागे घेण्यात आले आहेत. देशी विमानांतून येणार्‍या प्रवाशांना यापुढे आपण कोविड निगेटिव्ह असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र आणावे लागणार नाही. तसेच त्यांना विमानतळावर कोरोनासाठीची चाचणीही करून घ्यावी लागणार नाही.

रुग्णांचे प्राण वाचवणारी योजना
अमलात आणा ः सरदेसाई
राज्यात कोविडमुळे मृत्यमुखी पडणार्‍या रुग्णांचा आकडा वाढत चालला असून जास्तीत जास्त रुग्णांचे प्राण वाचवता येतील अशा प्रकारची योजना सरकारने अमलात आणावी, अशी मागणी काल आमदार विजय सरदेसाई यांनी केली.
आपल्या ट्विटमधून सरदेसाई यांनी म्हटले आहे की, ‘ओणम’ निमित्ताने केरळच्या मुख्यमंत्र्यांनी कोरोनासाठीची १०० दिवसांची कृती योजना जाहीर केली आहे. यापासून प्रेरणा घेऊन प्रमोद सावंत यांनी राज्यात कोरोनासाठीची कृती योजना तयार करावी व कोरोनामुळे मृत्युमुखी पडणार्‍या गोमंतकीयांचे प्राण वाचवावेत.