५८८ नवे रुग्ण; मात्र गोव्याच्या सीमा खुल्या

0
305

>> २ बळींमुळे एकूण मृत्यू १९४

राज्यात सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी काल आत्तापर्यंतचे उच्चांकी नवे ५८८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. राज्यातील कोरोना रुग्णांची सध्याची संख्या ३९६२ झाली असून एकूण रुग्ण संख्या १८,००६ झाली आहे. राज्यात आणखी २ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून कोरोना बळींची संख्या १९४ झाली आहे. राज्यात आत्तापर्यंत २ लाख २ हजार २३९ स्वॅबच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली असून १८,००६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

आणखी दोन मृत्यू
कोरोना गंभीर आजारी रुग्णांचे मृत्यूसत्र सुरूच आहे. पेडणे येथील ७० वर्षे वयाच्या पुरुष रुग्णांचे गोमेकॉमध्ये काल निधन झाले. घोगळ मडगाव येथील ७० वर्षाच्या पुरुष रुग्णाचे मडगाव येथील कोविड इस्पितळात सोमवारी निधन झाले.

२५६ कोरोनामुक्त
राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह आणखी २५६ रुग्ण बरे झाले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या १३ हजार ८५० एवढी झाली आहे. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या २५६ रुग्णांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला असून होम आयसोलेशनखालील रुग्णांची संख्या ५६०९ एवढी झाली आहे.
आरोग्य खात्याने ३५०६ स्वॅबचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले. तर, कोविड प्रयोगशाळेतून ३२७१ स्वॅबच्या नमुन्यांचा अहवाल जाहीर करण्यात आला आहे. प्रयोगशाळेत ४९१ स्वॅबच्या नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे.

राज्यात १३ ऑगस्टला ५७० पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. काल १ सप्टेंबरला ५८८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. ऑगस्ट महिन्यात एकूण साडेअकरा हजार पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून ९३६६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे झाले आहेत.

श्रीपाद नाईक नॉन कोविड वॉर्डात
दोनापावल येथील खासगी इस्पितळात कोरोनावर उपचार घेणार्‍या केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांना कोविड वॉर्डातून नॉन कोविड वॉर्डात हालविण्यात आले आहे. एम्सच्या डॉक्टरांच्या सूचनेनुसार केंद्रीय मंत्री नाईक यांनी नॉन कोविड वॉर्डात दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. केंद्रीय नाईक गेल्या १३ ऑगस्टपासून खासगी इस्पितळात कोरोनावर उपचार घेत आहेत. केंद्रीय मंत्री नाईक यांचा कोविड अहवाल पॉझिटिव्ह आहे. त्यांच्याकडून दुसर्‍याला कोरोनाचा फैलाव होणार नसल्याने नॉन कोविड वॉर्डात हालविण्याची सूचना करण्यात आली आहे.

पेडणे तालुक्यात पाचवा बळी
पेडणे तालुक्यात कोरोनाने काल पाचवा बळी घेतला. यापूर्वी तांबोसे, उगवे, पार्से आणि केरी या गावातील चार नागरिकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला. काल दि. १ रोजी हळर्ण येथील ७४ वर्षीय नागरिकाला आपला जीव गमवावा लागला. दरम्यान, पेडणे तालुक्यात एकूण ५६४ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

सरकारी कर्मचार्‍यांना
प्लाझ्मासाठी आवाहन
जिल्हाधिकार्‍यांनी कोरोना विषाणूच्या बाधेतून बरे झालेल्या विविध खात्यातील सरकारी कर्मचार्‍यांना प्लाझ्मा दानासाठी प्रवृत्त करण्यासाठी प्रयत्न करावा, अशी सूचना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल केली. राज्य सरकारच्या विविध खात्यातील १ हजारपेक्षा जास्त कर्मचारी कोरोना विषाणूच्या बाधेतून बरे झाले आहेत. जिल्हाधिकार्‍यांनी विविध खात्याशी समन्वय साधण्याची सूचना मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केली आहे.

सभापतींच्या प्रकृतीत सुधारणा ः राणे

गोमेकॉत उपचार घेणारे सभापती राजेश पाटणेकर यांची प्रकृती आता बर्‍यापैकी सुधारली असून आता ते डॉक्टर आपणाला कधी डिस्चार्ज देतात त्याची वाट पाहत असल्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी काल सांगितले.आपण काल गोमेकॉत जाऊन पाटणेकर यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यांच्या प्रकृतीत आता बर्‍यापैकी सुधारणा झाली असल्याचे राणे म्हणाले. दरम्यान, गोमेकॉतील १२२ वॉर्डचे रुपांतर कोविड वॉर्डात करण्यात येत असून आरोग्यमंत्री विश्वजजित राणे यांनी काल गोमेकॉत जाऊन या वॉर्डची पाहणी करून आवश्यक त्या सूचना केल्या.

आंतरराज्य वाहतूक, मद्यालये, रेस्टॉरंट सुरू
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार गोवा सरकारने आंतरराज्य वाहतुकीवरील निर्बंध मागे घेतले असून आंतरराज्य वाहतुकीला कालपासून सुरुवात झाली आहे. कर्नाटक सरकारने आंतरराज्य वाहतुकीला मान्यता दिलेली आहे. तथापि, महाराष्ट्र सरकारने आपल्या सीमा खुल्या केलेल्या नाहीत. धारबांदोडा तालुक्यातील मोले आणि काणकोण तालुक्यातील पोळे तपासणी नाक्यावरून आंतरराज्य मालवाहतूक, खासगी वाहनांच्या वाहतुकीला सुरुवात झाली आहे. आंतरराज्य बससेवेला सुरुवात झालेली नाही.

महाराष्ट्र सरकारने पत्रादेवी, दोडामार्ग या भागातील सीमा आंतरराज्य वाहतुकीसाठी खुल्या न केल्याने महाराष्ट्रात जाणार्‍यांची गैरसोय होत आहे.

रेस्टॉरंट, मद्यालये सुरू
राज्यात मद्यालये, रेस्टॉरंट, तार्वेन सुरू करण्यास मान्यता देण्यात आल्याने व्यावसायिकांनी आपली आस्थापने सुरू करण्यास कालपासून सुरूवात केली आहे. दरम्यान, मद्यालयामध्ये मास्कचा वापर न करणार्‍याला ग्राहकाला मद्यांचे वितरण करू नये, अशी सूचना अबकारी आयुक्तांनी एका आदेशाद्वारे केली आहे.
अनलॉक-४ मध्ये राज्यात मद्यालये, रेस्टॉरंट सुरू करण्यास मान्यता दिल्यानंतर नियमावलीचे पालन करून व्यावसायिकांनी आपली मद्यालय, रेस्टॉरंट, तार्वेन खुली करण्यात सुरुवात केली आहे. ग्राहकांची संख्या जास्त नसल्याने मद्यालय, रेस्टॉरंट मालकांकडून ग्राहकांना मर्यादित सेवा देण्यात येत आहे. राज्यातील घाऊक मद्यविक्री यापूर्वीच सुरू करण्यात आली आहेत.

कदंबची आंतरराज्य सेवा सुरू
राज्य सरकारच्या मान्यतेनंतर कदंब वाहतूक मंडळाची आंतरराज्य प्रवासी बससेवा सुरू केली जाणार आहे, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष कार्लुस आल्मेदा यांनी दिली.