– डॉ. मनाली पवार
(सांतइनेज, पणजी)
लहान वयातच आजारांची सुरुवात झाल्यास त्याचे दुष्परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात. स्पर्धेच्या या युगात जसे अन्न व शिक्षण पुरविण्याची जबाबदारी पालकांवर आहे, तशीच किंबहुना त्यापेक्षा थोडी जास्तच जबाबदारी मुलांना खेळाची गोडी लावण्याची व नियमित व्यायाम करण्यास प्रवृत्त करण्याची आहे.
नुकताच परवा राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा झाला जो भारताचे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवशी जाहीर झाला आहे. भारताची क्रीडा संस्कृती वाढावी, खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, तसेच देशाच्या कानाकोपर्यात खेळाची जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी हा दिवस साजरा केला जातो. इतर देशांसारखा आजही आपण खेळाचा गांभीर्याने विचार करत नाही. परंतु आज चित्र बदलताना दिसते आहे.
आपल्या मुलांची सर्वांगीण वाढ उत्तम व्हावी, असे प्रत्येक पालकाला वाटत असते आणि त्यासाठी ते प्रयत्नांची शिकस्त करीत असतात. मागच्या ५०-६० वर्षांत जीवनशैलीत इतक्या वेगाने बदल घडले आहेत व जीवनाला इतका वेग आला आहे की बिचार्या मानवी शरीराला त्याच्याशी जुळवून घेताना अगदी नाकी नऊ आले आहेत.
जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा. अगदी शाळा-शाळांमध्येही चुरस. याचाच परिणाम म्हणून शाळेच्या वेळेव्यतिरिक्त ज्यादा कोचिंग क्लासेस सुरू झाले. अशा कारणाने मुलांचा बराचसा वेळ शाळा, क्लासमध्ये अभ्यास एके अभ्यास यातच जातो. सध्या यावर्षी कोविद-१९च्या महामारीत मुले घरी आहेत. यावर्षी तीच तर्हा. ऑनलाइन अभ्यासाचा इतका मारा चालला आहे की बस्स, विचारूच नका. दिवसभर मुलांच्या हातात तो मोबाइल, टॅब किंवा लॅपटॉप. हालचाल तर नाहीच नाही, उलट अतिपौष्टीक खाण्याचा मारा. ईम्युनिटी वाढवण्याच्या नावाखाली एकसारखे मुलांना अतिपौष्टीक खायला देणे, पण व्यायाम, खेळ खेळण्याची गरज, महत्त्व मात्र आपण मुलांना सांगत नाही. परिणामी या लॉकडाऊनचा काळ बर्याच मुलांना भावलेला, त्यांच्या आकारमानावरून दिसतो आहे. अतिखाण्याचा मारा पचविण्यासाठी लागणार्या व्यायामाचा अभाव असल्यामुळे त्याचा दुष्परिणाम शरीरावर होतो व मुलांच्या लठ्ठपणाचे प्रमाण सातत्याने वाढते आहे.
लठ्ठपणाचे अनेक शारीरिक व मानसिक दुष्परिणाम मुलांच्या शरीरावर आज अगदी लहानपणापासूनच पाहायला मिळतात. लठ्ठपणामुळे शरीरातील संप्रेरकांचे (हॉर्मोन्स) संतुलन बिघडते. इन्स्युलीनसारखी संप्रेरके अधिक प्रमाणात उत्पन्न होतात. वयात येण्यासाठी लागणारी संप्रेरके लहान वयातच तयार होऊ लागतात व अकाली पौगंडावस्था येताना आढळते.
आधुनिक वैद्यकीय शास्त्राने हे सिद्ध केले आहे….
- स्थूलतेमुळे मुलांना लहान वयातच डायबिटीजसारखे अत्यंत कष्टप्रद रोग जडतात.
- मुले लवकर वयात येतात व त्यामुळे त्यांची उंची खुंटते.
- या स्थूलतेमुळे मुलांच्या एकाग्रतेवर व स्मरणशक्तीवर परिणाम होतो.
- बालपणातील तरतरीतपणा नाहीसा होऊन मुले अगदी निरुत्साही बनतात. म्हणूनच आपल्या आयुर्वेद शास्त्रात बर्याच रोगांवर औषध म्हणजे ‘व्यायाम’ असे सांगितलेले आहे.
व्यायाम ः
शरीराला बळ प्राप्त होण्यासाठी व बळ वाढविण्यासाठी केलेली विशिष्ट प्रकारची हालचाल किंवा क्रिया म्हणजे हालचाल होय.
लाघवं कर्मसामर्थ्यं दीप्तोग्निमेदसः क्षयः|
विभक्तघनगात्रत्वं व्यायामादुपजायते ॥
- व्यायामामुळे शरीराला हलकेपणा येतो.
- श्रम, कष्टाची कामे करण्याचे सामर्थ्य वाढते.
- जाठराग्नी प्रदीप्त होतो.
- मेदाचा (चरबी) क्षय होतो.
- अवयव पीळदार व बांधेसूद होतात.
- आळस नष्ट होतो.
- थकवा, ग्लानी, तहान, शीतोष्ण वातावरण हे सहन करण्याची क्षमता येते व आरोग्य उत्तम राहते.
सर्वांगसुंदर व्यायाम म्हणजे मैदानी खेळ खेळल्याने होतो. या लॉकडाउनच्या काळात बाहेर मैदानात खेळण्यास मनाई असली तरी घरातल्या घरात दोरी-उड्या, सायकल चालवणे, एका जागेवर धावणे, पकडा-पकडीचा खेळ, फुगड्यांसारखा खेळ जो आपली संस्कृतीही जपण्यासाठी उपयुक्त, तसाच व्यायामाचा व्यायाम व खेळाचा खेळही होतो. योगासनांसारखा खेळ प्रकार तर शरीर व मनाला बलवान बनवतो.
आधुनिक काळामध्ये फक्त सुटीच्या दिवसात व्यायाम किंवा व्यायामाची शिबिरे सर्वत्र पाहायला मिळतात. एक किंवा दोन महिने अचानक खूप व्यायाम करून उंची वाढविणे किंवा स्थूलपणा कमी करण्याची ही कल्पना शिबिर संचालकांनी पैसे कमवण्याच्या दृष्टीने जरी यशस्वी होत असली तरी शरीरासाठी ते अपायकारक ठरू शकते. सर्वच गोष्टी (क्रॅश कोर्स)च्या माध्यमातून घडत नाहीत. व्यायामाचे, खेळाचे सर्व फायदे मिळविण्यासाठी नियमित व्यायाम किंवा खेळणेच आवश्यक आहे. दिनक्रमामध्ये जेव्हा वेळ मिळेल तेव्हा टीव्हीसमोर, मोबाइलमध्ये वेळ न घालवता आबाल-वृद्धांनी त्या वेळेचा व्यायाम करण्यामध्ये विनियोग केल्यास सर्वांचेच आरोग्य उत्तम राहील हे मात्र नक्कीच. तहान लागल्यावर विहीर न खोदता पहिल्यापासूनच व्यायाम केल्यास उंची वाढते. बांधा सुडौल होतो व आरोग्यसंपन्न जीवन व्यतीत करता येते. कुठल्याही महामारीला आपण आरोग्यपूर्ण तोंड देऊ शकतो.
मुलांच्या योग्य वाढीसाठी व निरोगी आरोग्य राखण्यासाठी संप्रेरकांचा वाटा मोठा आहे. संप्रेरकांचा विकार झालेली मुले खुजी राहतात व त्यांच्या वाढीचा वेग मंदावतो. संप्रेरके ही अंतस्रावी ग्रंथींचे स्राव असून त्यांची विविध कार्ये आहेत. मुलांच्या नैसर्गिक वाढीसाठी थायरॉइड हॉर्मोन, ग्रोथ हॉर्मोन त्याचबरोबर वयात येण्याच्या सुमारास सेक्स हॉर्मोन्सची आवश्यकता असते. ही सर्व संप्रेरके मुलांच्या शरीरात नैसर्गिकरीत्याच तयार होत असतात. परंतु संप्रेरकांचा स्राव नियमित होण्यासाठी व्यायामाची, खेळाची आवश्यकता आहे. व्यायामामुळे ग्रोथ हॉर्मोन्सची उत्पत्ती होते. या ग्रोथ हॉर्मोनमुळे हाडांची लांबी वाढते व मुलांची उंची वाढायला मदत होते. व्यायामाच्या अभावामुळे स्थूलतेबरोबर शरीरातील इन्स्युलीनचे प्रमाण वाढते व काही वर्षांनी स्वादुपिंडावर ताण येऊन डायबिटीज होतो.
अशा आजारांवर आज अर्थातच वैद्यकीय उपचार आहेतच. पण हे आजार होऊ नयेत व झाल्यानंतरसुद्धा व्यायामाला पर्याय नाही. म्हणजेच मैदानी खेळाच्या व्यायामाच्या अभावामुळे आरोग्य बिघडते व ते सर्व वयोगटांमध्ये सत्य आहे. लहान वयातच या आजारांची सुरुवात झाल्यास त्याचे दुष्परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात. स्पर्धेच्या या युगात जसे अन्न व शिक्षण पुरविण्याची जबाबदारी पालकांवर आहे, तशीच किंबहुना त्यापेक्षा थोडी जास्तच जबाबदारी मुलांना खेळाची गोडी लावण्याची व नियमित व्यायाम करण्यास प्रवृत्त करण्याची आहे. खेळण्याची संधी उपलब्ध करून देण्याची आहे.