भारत, रशियाला संयुक्त विजेतेपद

0
105

फिडे आयोजित पहिल्यावहिल्या ऑनलाइन बुद्धिबळ ऑलिंपियाड स्पर्धेचा शेवट वादग्रस्तरित्या झाल्याने बुद्धिबळाचे संचालन करणारी जगातील सर्वोच्च संस्था असलेल्या फिडेने भारत व रशिया या दोघांना संयुक्त विजेते घोषित केले. भारताने आपल्यापेक्षा सरस असलेल्या रशियाला अंतिम फेरीच्या पहिल्या फेरीत ३-३ असे बरोबरीत रोखले. विदित गुजराती- इयान नेपोमनियाच्ची, पी हरिकृष्णा-व्लादिस्लाव आर्टेमिव, कोनेरू हंपी- कॅतरिना लागनू, हरिका द्रोणावली-आलेक्झांड्रा कोस्टेनियूक, आर प्रगानंदा-आलेक्सी सराना, दिव्या देशमुख-पोलिना शुवालोवा या पहिल्या फेरीच्या सर्व लढती लढतीत बरोबरीत सुटल्या.

दुसरी फेरीदेखील बरोबरीच्या दिशेने जात असताना बोर्ड पाच व सहावर अनक्क्रमे निहाल सरिन व दिव्या देशमुख यांना इंटरनेट कनेक्शन गेल्यामुळे पराजित घोषित करण्यात आले. बोर्ड ३वर कोनेरू हंपी हिलादेखील इंटरनेटच्या समस्येमुळे काही वेळ गमवावा लागला. रशियाने दुसरी फेरी १.५-४.५ अशी जिंकल्याचे जाहीर करण्यात आले. परंतु, या निर्णयाविरोधात भारताने फिडेकडे अधिकृत तक्रार केली. अपील केल्याच्या एका तासानंतर फिडेचे अध्यक्ष आर्काडी ड्वोरकोविच यांनी दोन्ही संघांना सुवर्णपदके देण्याचा निर्णय जाहीर केला. इंटरनेट कनेक्शन हरवले त्यावेळी दिव्या देशमुख ही विजयाच्या स्थितीत होती. रशियाने २००२ सालापासून कधीही बुद्धिबळ ऑलिंपियाड जिंकली नव्हती तर स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्याची भारताची ही पहिलीच वेळ होती.

भक्ती कुलकर्णीची दमदार कामगिरी
भारताचा या स्पर्धेसाठी टॉप डिव्हिजन पूल ‘ए’ मध्ये समावेश होता. धेंपो उद्योग समुहाची सदिच्छा दूत असलेल्या गोव्याच्या भक्ती कुलकर्णी (२३२५) हिने काळ्या मोहर्‍यांनिशी खेळताना आपल्या पहिल्या लढतीत झिंबाब्वेच्या शाबा लिंडा (१६४२) हिला पराजित केले. व्हिएतनामविरुद्धच्या दुसर्‍या व उझबेकिस्तानविरुद्धच्या तिसर्‍या फेरीत तिला संधी मिळाली नाही. इंडोनेशियाविरुद्ध झालेल्या चौथ्या फेरीत तिने मिळालेल्या संधीचे सोने करताना आपल्यापेक्षा सरस असलेल्या ओलिना वार्डा (२३४४) हिला पराभवाचा धक्का दिला. इराणविरुद्धची पाचवी फेरी ती खेळली नाही. मंगोलियाविरुद्धच्या सहाव्या व जॉर्जियाविरुद्धच्या सातव्या फेरीतही तिला संधी लाभली नाही. जर्मनीविरुद्धच्या आठव्या फेरीत तिने ओस्मानोजा फ्लिज (२१५४) हिला नमविले. चीनविरुद्धच्या नवव्या फेरीत ती खेळली नाही.