नाईट रायडर्सचा ट्रायडंटस्‌वर संस्मरणीय विजय

0
87

>> कायरन पोलार्डने २८ चेंडूंत चोपल्या ७२ धावा

कर्णधार कायरन पोलार्ड याने केवळ २८ चेंडूंत ९ षटकार व २ चौकारांसह चोपलेल्या ७२ धावांच्या बळावर त्रिनबागो नाईट रायडर्सने बार्बेडोस ट्रायडंटस्‌विरुद्ध पराभवाच्या दाढेतून विजय खेचून आणला. कॅरेबियन प्रीमियर लीग टी-ट्वेंटी स्पर्धेतील हा १७वा सामना शनिवारी रात्री खेळविण्यात आला.
बार्बेडोसने विजयासाठी ठेवलेले १४९ धावांचे लक्ष्य त्रिनबागोने १९.५ षटकांत गाठत स्पर्धेतील सलग सहाव्या विजयासह आपली विजयी वाटचाल सुरूच ठेवली.

त्रिनबागोने या सामन्यात नाणेफेक जिंकून धावांचा पाठलाग करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजी करणे कठीण असलेल्या खेळपट्टीवर बार्बेडोसचा सलामीवीर शेय होपला जुळवून घेणे कठीण गेले. १० चेंडूंत ४ धावा करून तो बाद झाला. जॉन्सन चार्ल्स (३७ चेंडूंत ४७) व काईल मायर्स (३७ चेंडूंत ४२) यांनी दुसर्‍या गड्यासाठी ५१ धावांची भागीदारी रचली. सिल्सच्या फुलटॉल चेंडूवर चार्ल्स झेलबाद झाल्याने ही जोडी फुटली. कर्णधार जेसन होल्डर केवळ ३ धावांचे योगदान देऊ शकला तर न्यूझीलंडच्या कोरी अँडरसनच्या अपयशाची मालिका सलग सहाव्या लढतीतही सुरूच राहिली. त्याला केवळ ६ धावा करता आल्या. ऍश्‍ले नर्स (९ चेंडूंत १९), राशिद खान (६ चेंडूंत १२) व मिचेल सेंटनर (३ चेंडूंत नाबाद ८) यांनी तळात फटकेबाजी करत बार्बेडोसला निर्धारित २० षटकांत ७ बाद १४८ धावांपर्यंत पोहोचविले. त्रिनबागोकडून जेडन सिल्स, अकिल हुसेन व सिकंदर रझा यांनी प्रत्येकी २ तर फवाद अहमदने १ गडी बाद केला. खेळपट्टीचे संथ स्वरुप पाहता गोलंदाजांसाठी ही धावसंख्या पुरेशी होती.

धावांचा बचाव करण्यास उतरलेल्या बार्बेडोस संघाच्या गोलंदाजांनी संघाला शानदार सुरुवात करून दिली. सलामीवीर टिओन वेबस्टर (५) व कॉलिन मन्रो (०) यांना कर्णधार होल्डरने तंबूचा रस्ता दाखवला. यावेळी २ षटकांत त्रिनबागोच्या केवळ ६ धावा झाल्या होत्या. डॅरेन ब्राव्हो (६) व टिम सायफर्ट (४) हे मधल्या फळीतील फलंदाज तंबूत परतल्यानंतर त्रिनबागो ८ षटकांत ४ बाद ३६ असा चाचपडत होता. वाढत असलेल्या आवश्यक धावगतीच्या दबावाखाली दुसरा सलामीवीर लेंडल सिमन्स (३२) डावातील १५व्या षटकात बाद झाला तेव्हा त्रिनबागोच्या पराभवाची औपचारिकता बाकी होती.

परंतु, पोलार्डच्या मनात काही दुसरेच होते. पोलार्ड फलंदाजीस उतरता त्यावेळ त्रिनबागोला ४४ चेंडूंत ८७ धावांची आवश्यकता होती. हुसेन (१२) याला बाद केलेल्या हेडन वॉल्श खेळलेला पहिलाच चेंडू षटकारासाठी भिरकावत पोलार्डने आपला इरादा स्पष्ट केला. यानंतर राशिद खानने टाकलेल्या डावातील १४व्या षटकात केवळ ८ धावा आल्या. १५व्या षटकात तर सेंटनरने कमाल करताना सिमन्सच्या विकेटसह केवळ दोन धावा दिल्या. यावेळी शेवटच्या ३० चेंडूंत त्रिनबागोला ७० धावांची गरज होती. अनुभवी राशिदने सोळाव्या षटकात अटूक मारा करत त्रिनबागोला केवळ ४ धावा करून दिल्या. त्यामुळे २४ चेंडूंत ६६ धावांचे जवळपास अशक्यप्राय लक्ष्य त्रिनबागोसमोर होेते. डावातील १७वे षटक टाकण्याची जबाबदारी नवोदित हेडन वॉल्श या लेगस्पिनरला दिल्यानंतर पोलार्डने त्याला टार्गेट केले. या षटकात पोलार्डने ४ षटकार ठोकले. त्रिनबागोने या षटकात २५ धावा वसूल केल्या. रेयमन रिफरने टाकलेल्या १८व्या षटकातील शेवटच्या दोन चेंडंूंवर पोलार्डने ठोकलेल्या दोन चौकारांनंतरही त्रिनबागोला १८व्या षटकांत केवळ १० धावांवर समाधान मानावे लागले. या षटकात सिकंदर रझाची विकेटही त्यांनी गमावली. १९व्या षटकात पोलार्डच्या दोन षटकारांच्या बळावर त्रिनबागोने एकूण १६ धावा जमवल्या. शेवटच्या ६ चेंडूंत त्रिनबागोला १५ धावांची आवश्यकता असताना पोलार्डने रिफरचा पहिलाच चेंडू मिड ऑनवरून षटकारासाठी भिरकावला. दुसर्‍या चेंडूवर पोलार्ड धावबाद झाला. चार चेंडूंत ८ धावांची आवश्यकता असताना सिल्सने एक धाव घेत पिएरला स्ट्राईक दिली. पिएरने दबावाखाली षटकार लगावतानाच पुढील चेंडूवर एक धाव घेत एक चेंडू शिल्लक ठेवून त्रिनबागोला थरारक विजय मिळवून दिला.

जमैकाच्या विजयात फिलिप्स चमकला
कॅरेबियन प्रीमियर लीगमधील १८व्या लढतीत जमैका तलावाहज्‌ने सेंट किटस् अँड नेव्हिस पॅट्रियोटस्‌चा ३७ धावांनी सहज पराभव केला. सलामीवीर ग्लेन फिलिप्स याच्या ६१ चेंडूंतील समयोचित नाबाद ७९ धावा तसेच कार्लोस ब्रेथवेटचा भेदक मारा तलावाहज्‌च्या विजयाचे प्रमुख आकर्षण ठरला. जमैकाने विजयासाठी ठेवलेल्या १४८ धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना पॅट्रियोटस्‌चा डाव १९.४ षटकांत ११० धावांत आटोपला.

नाणेफेक जिंकून या सामन्यात जमैकाने फलंदाजी निवडली. ग्लेन फिलिप्स व एन्क्रुमा बोनर यांनी २८ धावांची सलामी संघाला दिली. तिसर्‍या स्थानावरील जर्मेन ब्लॅकवूडने २७ व यानंतर आलेल्या आसिफ अलीने १४ धावा केल्या. फलंदाजी करणे सोपे नसल्याचे जाणून फिलिप्सने मोजून मापून फटकेबाजी केली. चांगल्या चेंडूंना सन्मान देत त्याने खराब चेंडूंचा समाचार घेतला. आपल्या अर्धशतकी खेळीत त्याने तब्बल ६ षटकार लगावले. पॅट्रियोटस्‌कडून कॉटरेल, लेगस्पिनर इम्रान खान, ईश सोधी व रेयाद एम्रिट यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. जमैकाना २० षटकांत ६ बाद १४७ धावा केल्या. धावांचा पाठलाग करताना पॅट्रियोटस्‌चे फलंदाज ठरावित अंतराने बाद होत राहिले. सलामीवीर कायरन पॉवेल व सहाव्या स्थानी फलंदाजीस उतरलेल्या एविन लुईस यांनी प्रत्येकी २१ धावांचे योगदान दिले. जमैकाकडून कार्लोस ब्रेथवेटने ११ धावांत सर्वाधिक ३ गडी बाद केले. फिडेल एडवर्डस्, संदीप लामिछाने व वीरसामी परमॉल यांनी प्रत्येकी २ बळी घेत त्याला चांगली साथ दिली. मुजीब रहमानने १ गडी बाद केला.