संजीवन

0
124
  • पौर्णिमा केरकर

वेदना नात्यांची वीण पक्की करते, जगण्याचा अर्थ उलगडून दाखवते, सर्जकतेची वाहक बनून नावीन्याची कास धरते. आपल्या जिवाभावाच्या माणसांना मनाकाळजात कायमस्वरूपी स्थान बहाल करते. आपण सोसतो ते खरेच आपले एकट्याचेच दुःख असते का?

जगण्यातून एकेक व्यक्ती वजा होत गेली की लक्षात येतं, मागं उरलेल्यांना आपल्या आयुष्यात आता वेदनांना मिरवत-सजवत जीवनाची वाटचाल करावी लागणार. खरेतर वेदनांचे आणि मानवी संवेदनांचे खूप जवळच नाते आहे. किंबहुना ही पराकोटीची वेदनाच नाती वृद्धिंगत करते. असे असले तरी ही चिरवेदना जगणेच उद्ध्वस्त करते. जीवन जगत असताना जगण्याचं वास्तव आपल्याला जाणवतच नसते. सगळीच माझी माणसं माझ्या सभोवताली असतीलच, असा विश्वास मनाच्या एका कोपर्‍यात दबा धरून बसलेला असतो. त्याला सहजपणाने तडा जाऊ दिला जात नाही. जगण्याच्या वेगवान प्रवाहात हे वास्तव विसरले जाते. खरेतर सजीवतेचा कधी ना कधी अंत होणार असतो. नावीन्याचा आनंद या शेवटामध्ये भरून राहिलेला आहे. अंधार होतो म्हणूनच तर उजेडाचे सामर्थ्य लक्षात येते. जीवनातील विसंगती, अनाकलनीयत्व, गूढता, भीती, रहस्य अशा गोष्टींनी मन कधीकधी सैरभैर होते. काही आठवणी असतात… कितीही प्रयत्न केला तरी त्यांना मनातळातून उखडता येत नाहीत. त्या जेवढ्या काढून बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करू तेवढ्याच त्या खोल खोल रूतत जातात.

संजू, तुझ्या आठवणीही अशाच. वरून कितीही खपली धरली तरी आतून जिवंत ठसठसणारी सल कायमच ठणकत राहते. स्वप्नातही विचार केला नव्हता की तू अशी अचानक सगळ्यांनाच दूर करून चटका लावून, वर्मी घाव घालून निघून जाशील. तुझी माझी भेट झाली त्यामध्ये काही अवघ्या तासांचंच अंतर होतं. ती भेट शेवटची असेल याचा साधा विचारही त्यावेळी मनाला शिवला नव्हता. पण जे अघटित घडलं ते सत्य होतं. परंतु या वास्तवाला पचवणं खूपच कठीण आहे हे तर श्वासागणिक जाणवत राहतं. आपली माणसे आपल्यापासून दुरावली की ती तीव्रतेने आठवत राहतात. सावरकर म्हणायचे… संसार माणसे करतात, तसाच तो पशुपक्षी, प्राणी, कुत्री, मांजरे इ. निसर्गातील सजीव घटकही कमी-अधिक फरकाने करतात. इथे माणूस वेगळा आहे. तो गुंतवून घेतो स्वतःचे सर्वस्व कुटुंबातील प्रत्येक घटकात. त्याचीच मग गुंतवळ होते, जगण्याचा भोवराच होतो. जेव्हा कोठे स्थिरस्थावर व्हायला येतं त्याचवेळी निघून जाण्याची वेळ येते. तगमग-तडफड होते आतून आतून जीवाची! तुम्ही दोघंही गेलात आणि खरं सांगते जगण्याचे वास्तव समोर उभे ठाकले. वर्तमान खुणावू लागले. मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीशी सादर व्हावे ही समर्थांची ओळ पुन्हा पुन्हा आठवू लागली. आयुष्याचा हिशेब करणे मी शिकले. जेवढे जगणार त्यात सकारात्मकता असणार, थोडेसे का असेना समाजासाठी करणार… या आठवणी आठवून आठवून मन उद्ध्वस्त होते. वेदनेचा ओरखडा चरचरतो. अगतिक हतबलता, अवसान गळून पाडते.

दोन वर्षे भराभर निघून गेली. सगळे काही जागच्या जागीच आहे, पण त्यात तुम्ही नाही. यातना देऊन गेलात. तुमच्या यातना किती असतील? त्यांची आठवण जगू देत नाही.
जीवन कोठे कधी येऊन थांबेल सांगता येत नाही. संजू, तुझ्या अकाली निघून जाण्याने तुझे स्वयंपाकघर अनाथ झाले गं! तुझे आयुष्य गुंतवले होतेस स्वयंपाकघरात. निगुतीने केलेले पदार्थ, कोणाला काय आवडते हे लक्षात ठेवून तू सारे काही करायचीस. बघवत नाही तुझी गॅसशेगडी… खूप जिव्हाळा लावून भरलेला प्रत्येक डबा, सुनेसुने झालेले देवघर… विचार करत राहिले की देवाचासुद्धा राग येतो. त्याच्यासाठी एवढे करूनही त्याने वाचवले नाही तुला असेच वाटते. मग पुन्हा असेही वाटते की खूप गोंडस, हुशार, समंजस, शांत, संयमी मुलांना जन्म दिलास. तीही त्याचीच कृपा. मग जे हातातून सुटून गेले… जो देह जीवनातील वरवरच्या आवरणातून नाहीसा झाला त्याच्यासाठी आकांत करायचा की रजत-रोहितचे भावजीवन जोपासायाचे?
मला पक्के माहीत आहे की तू घुटमळत असशील त्यांच्याभोवती. एरव्ही म्हणून त्रागाच करून घ्यायचीस. अंगावर कधी दागिने घालून मिरवले नाहीस की कधी एखादी नवीकोरी साडी अंगभर लपेटून वावरली नाहीस. जगण्याची कसली तरी अनामिक भीतीच तुला वाटत असावी. सतत चिंता, काळजी… सगळ्यांचेच विचार डोक्यात घेऊन जगलीस. आठवणींचा एखादा एकांत जेव्हा आता मला भेटतो ना तेव्हा तर संजू, मला कधीकधी तुझा हेवाच वाटतो. कारण तुम्ही दोघे सोबतीने गेलात. कोणाला कोणाची वेदना नाही. ती तर आमच्याच वाट्याला. खूप खूप खोल काळीज चिरत जातात, आठवणी तारखांचेच संदर्भ जास्त सतावतात. ३० ऑगस्ट हा तुझा जन्मदिवस.

कधीच साजरा केला नाहीस. आणि आता तू नसताना मात्र त्या-त्या तारखांना चिकटलेल्या वेदनांचा उत्सव मी साजरा करते. त्यावेळी मात्र आयुष्यातून वजा झालेल्या आठवणीच पुन्हा पुन्हा भेटतात, छळतात. तुम्ही आमची सोबत सोडून अर्ध्यावरूनच गेलात. आम्हीही कधीतरी जाणारच! सरळरेषेतील आयुष्यात उलथापालथ झाली तरी जीवनाचा प्रवाह नाही अडवता येत; तो चालूच राहील. तू देहानेच आमच्या आसपास नसणार. काळीजकुपीतील स्मृती चिरंतन उरणार.

तुमच्या जाण्यामुळे मी जीवनाला समजून- उमजून जगायला शिकायचा प्रयत्न करीत आहे. कसल्या तरी अनामिक भीतीने मनाला बांधून ठेवून जगण्यापेक्षा भरभरून जगायचे… निसर्ग, माणसे, जागा, प्रदेश, देश, विदेश बघायचे. संजू, माझ्याकडे शब्द आहेत जे मला मोकळेपणाने व्यक्त व्हायला मदत करतात… सांस्कृतिक उपक्रमांत सहभागी होऊन मला या मातीचे संचित कळते. सामाजिक क्षेत्रात काम करीत असताना माणूस, त्याचे संघर्ष, वेदना कळत गेली. माझ्या वाट्याला जे दुःख आले तसेच दुःख आणखीन कोणाच्या वाट्याला आलेले आहे. माझी मुलं तरी मोठी आहेत, समंजस- शिकलेली आहेत, हा व असेच विचार जगण्याला उभारी देतात.
दोन वर्षे सरली… वर्षे अशीच सरतील. सभोवताल बदलेल. बदल ही जिवंतपणाचीच खूण असते. मुलं मोठी होतील. पण तुम्ही मात्र कायमच माझ्या, तुमच्यावर मनापासून प्रेम करणार्‍या सर्वांच्याच हृदयात अढळपदी विराजमान असणार! हेच संजीवन सकारात्मकतेला ऊर्जा पुरवेल!
नियतीवर माझा विश्वास नाही. ती तशी आहे की नाही हेही ठरवता येत नाही. पण म्हणतात की, तिचा खेळ मोठा विलक्षण असतो. एका बाजूने ती भरभरून देते तर दुसर्‍या बाजूने क्रूर होत सर्वच काही निष्ठूरतेने हिरावून घेते. उमेदीने सुरू केलेल्या आयुष्याची सुरुवात मध्यंतरीच विखुरते. उद्ध्वस्त व्हायला होते. असे कोसळून पडताना सावरायचे तरी कसे? हाच मोठा प्रश्न?? सुख-दुःखाची वीण म्हणजे जीवन. वेदनेशिवाय संवेदनेचे मळे फुलणार तरी कसे? सोसावेच लागते. या सोसण्याचाच सोस आयुष्याला कवटाळून राहतो. खूप गुंतत जाते मन
नात्या-गोत्यांत, माती-माणसांत. सभोवतालच्या प्रत्येक घटकात. त्या गुंत्यातून बाहेर पडताच येत नाही. ही आसक्ती वेदनेचे मूळ बनून खणून काढते अस्तित्वाचे पापुद्रे. भूत आणि भविष्य यांचा वेध घेताना वर्तमानाला सामोरे जाण्याचे धाडसच गौण होत चालले आहे.

सभोवतालची वेदना आपल्या नसानसांत भिनवली की दुःख कमी होत जाते, असे नुसते वाटत नाही तर ते वास्तव आहे. दुःख आता कायमच निवासाला आले आहे, त्याला कवटाळून पुढे जायचेय…
कठीण आहे पण अशक्य वाटणे हे ज्याच्या-त्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असेल. संतांनी दुःखाचे पहाड रिचवले-पचवले, वेदनांना सहजपणे अंगाखांद्यावर खेळवले. या असीम दुःखानेच त्यांना खरेखुरे जीवन कळले असावे. जीवनातील सहजता कळली की वृथा अहंकार
गळून पडतो. तो तसा गळून पडला की जीवनाला कडकडून मिठी मारता येते. वेदना नात्यांची वीण पक्की करते. वेदना जगण्याचा अर्थ उलगडून दाखवते. वेदना सर्जकतेची वाहक बनून नावीन्याची कास धरते. आपल्या जिवाभावाच्या माणसांना मनाकाळजात कायमस्वरूपी स्थान बहाल करते. आपण सोसतो ते खरेच आपले एकट्याचेच दुःख असते का?