भारतीय क्रीडा क्षेत्राची वाटचाल प्रगतीकडे

0
373

धीरज गंगाराम म्हांबरे

सर्व भागांतून विविध क्रीडा प्रकारातून खेळाडू पुढे येण्याची आवश्यकता आहे. हा बदल घडला तरच देशात क्रीडा संस्कृती रुजण्यास मदत होणे शक्य आहे. काही अनिष्ट बाबी या क्षेत्रातून हद्दपार करण्यात आल्यास सच्च्या खेळांडूंना संधी मिळून ते त्याचे सोने करतील असा विश्‍वास प्रत्येक क्रीडाप्रेमीला वाटतो आहे.

हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद ज्यांचा खेळ पाहून स्वतः हकुमशहा ऍडोल्फ हिटलर याने त्यांना जर्मनीकडून खेळण्याचे खुले निमंत्रण दिले होते त्यांची २९ ऑगस्ट रोजी जयंती. त्यांच्या या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. देशात सर्वत्र या दिवशी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात येतो. याच निमित्ताने देशाच्या क्रीडा क्षेत्राच्या कामगिरीवर व पुरस्कारांवर थोडक्यात टाकलेली नजर.

सर्वोच्च क्रीडा पुरस्कार खेलरत्नची सुरुवात १९९१-९२ साली झाली. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो. अर्जुन पुरस्कार १९६१ पासून देण्यात येतात. यानंतर १९८५ सालापासून प्रशिक्षकांसाठीच्या द्रोणाचार्य पुरस्कारांना प्रारंभ झाला. ध्यानचंद यांच्या नावाने जीवनगौरव पुरस्कार देण्यास २००२ सालापासून सुरुवात करण्यात आली. यंदा कोरोना काळामुळे व्हर्च्युअल पद्धतीने या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

ब्रटिशांनी निर्माण केलेले क्रिकेटचे वेड भारतीयांच्या मनात आजतागायत आहे. जगातील जेमतेम १०-१५ देश क्रिकेटच्या या प्रवाहात असताना क्रिकेटच्या या धुंदीत इतर खेळांना देश जवळपास विसरलाच होता. ऑलिंपीकमधील पदकांचा दुष्काळ हेच दर्शवितो. खंडप्राय देशाची लोकसंख्या १३० कोटी असतानाही भारतात अपेक्षेप्रमाणे क्रीडा संस्कृती अजून रुजलेली दिसत नाही. तसे असले तरी यात कासवगतीने हा होईना मागील दशकभरापासून बदल होताना दिसत आहे. केंद्र सरकारने देशातील क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी गांभीर्याने केलेला विचार व रणनीती आखताना सूत्रबद्धरित्या आखलेल्या योजना परिणामकारक ठरत आहेत. या योजनांचे फलित चार-पाच वर्षांत नव्हे तर दहा वर्षांनी नक्कीच दिसणार आहे. खेळाला गावागावात पोहोचवण्यासाठी ग्रामीण भागातील खेळाडूंना मोठे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सुरू केलेली खेलो इंडिया ही स्पर्धा, खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स भारताला ऑलिंपिक संबंधित खेळांमधील मोठे खेळाडू मिळवून देण्यासाठी मदत करणार आहे. टार्गेट ऑलिंपिक पोडियमसारखी योजना तर खेळाडूंसाठी वरदान ठरत आहे. आता ज्युनियर खेळाडूंनादेखील या योजनेचा भाग बनवून केंद्र सरकारने आपली दूरदृष्टी दाखवून दिली आहे. या योजनेद्वारे खेळांडूंना भरघोस आर्थिक मदत देऊन त्यांना केवळ आपल्या क्रीडा प्रकारावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. खेळाडूंना आर्थिक चणचण भासणार नाही याची दक्षता घेत सरकार हा स्तुत्य उपक्रम राबवत आहे. प्रगत प्रशिक्षणासाठी खेळाडूंना विदेशात जाऊन तज्ज्ञ प्रशिक्षकांचे मार्गदर्शन मिळावे यासाठी सुसूत्रता देखील आणण्यात आली आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी यासाठी घेतलेला पुढाकार प्रशंसनीय आहे, यात शंका नाही.

खेळांची केंद्रस्थाने

देशात नानाविध खेळ खेळले जातात परंतु, प्रत्येक खेळाची आपापली केंद्रस्थाने आहेत जसे गोव्यात फुटबॉललाच अधिक प्राधान्य दिले जाते. इतरही खेळ गोव्यात म्हणावा तसा विस्तार करण्यात अजूनपर्यंत यशस्वी झालेले नाहीत. पंजाब-हरियाणामधील कुस्तीपटू व कबड्डीपटू, ईशान्य भारतातील बॉक्सिंगपटू, दक्षिणेतील धावपटू , हैदराबाद-बंगळुरूमधील बॅडमिंटनपटू अशी केंद्रस्थाने निर्माण झाली आहेत. ईशान्य भारतात एखादा उच्च दर्जाचा बॅडमिंटनपटू सापडल्याचे किंवा गोव्यात क्रिकेट खेळून भारतीय संघात पोहोचलेला खेळाडूदेखील ऐकिवात नाही. त्यामुळे या केंद्रस्थानांचा विस्तार होणे आवश्यक आहे. गोमंतकीय मानले जाणारे दिलीप सरदेसाई आणि पारस म्हांबरे यांना मुंबईला गेल्यानंतरच संधी मिळाली ही वस्तुस्थिती आहे. सर्व भागांतून विविध क्रीडा प्रकारातून खेळाडू पुढे येण्याची आवश्यकता आहे. हा बदल घडला तरच देशात क्रीडा संस्कृती रुजण्यास मदत होणे शक्य आहे. काही अनिष्ट बाबी या क्षेत्रातून हद्दपार करण्यात आल्यास सच्च्या खेळांडूंना संधी मिळून ते त्याचे सोने करतील असा विश्‍वास प्रत्येक क्रीडाप्रेमींना वाटतो आहे.

खेळाचे व्यवसायीकरण

भारतात इंडियन प्रीमियर लीगच्या उदयानंतर खेळाच्या व्यावसायिकरणाला वेग आला. क्रिकेटसाठी आयपीएल आल्यानंतर बॅडमिंटनसाठी प्रीमियर बॅडमिंटन लीग, फुटबॉलसाठी इंडियन सुपर लीग, कबड्डीसाठी प्रो कबड्डी आदी लीग स्पर्धा सुरू झाल्या. प्रचंड पैसा, विविध उद्योगसमुहांनी केलेली कोट्यवधींची गुंतवणूक या जोरावर यातील अनेक लीग फोफावल्या. राष्ट्रीय स्तरावर किंवा आपल्या राज्याकडून खेळण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरू न शकलेल्या लहान-लहान गावांतील प्रतिभेला वाव मिळविण्याचे व्यासपीठ या द्वारे तयार झाले. या खेळांची लोकप्रियता वाढली, टीव्ही वाहिन्यांची टीआरपी वाढली. पण, या सर्वांप्रमाणेच या खेळांचा दर्जा वाढला काय् या प्रश्‍नाचे उत्तर अजून सापडलेले नाही.

पुरस्कारांचे राजकारण

राष्ट्रीय पुरस्कार निवड समितीमध्ये नावाजलेली अनुभवी नावे असली तरी भारतातील असे एकही क्षेत्र नाही ज्यात राजकारणाने शिरकाव केलेला नाही. क्रीडा क्षेत्रदेखील याला अपवाद नक्कीच नाही. भारताचे नाव संपूर्ण जगात गाजवत असलेला भालाफेकपटू नीरज चोप्रा याचे खेलरत्नसाठी डावलण्यात आलेले नाव हे याचेच मूर्तिमंत उदाहरण आहे. ज्या आशियाई क्रीडा स्पर्धा व राष्ट्रकुल स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर मनिका बत्रा हिने अर्जुन पुरस्कार जिंकला त्याच मनिकाला या जुन्या पुराण्या कामगिरीसाठीच खेलरत्न पुरस्कार दिला जातो यापेक्षा हास्यास्पद व खेदजनक बाब दुसरी नसेल. भविष्यात भारताला ऑलिंपिक पदक मिळवून देण्याचा प्रबळ दावेदार असलेल्या नीरजला प्रोत्साहित करण्याऐवजी त्यांना निराश करण्याचा ठेकाच घेतल्याचे यावरून दिसते. पॅरालिंपिक उंच उडीपटू मरियप्पन थंगवेलू याचे उदात्तीकरण का करण्यात येते हे देखील समजण्यापलीकडे आहे. २०१६ रिओ ऑलिंपिकमधील सुवर्णपदकासाठी पद्मश्री व अर्जुन पुरस्कार दिल्यानंतर चार वर्षांपूर्वीच्या त्याच्या प्रदर्शनासाठी त्याला खेलरत्न दिला जातो हे थोडे धक्कादायकच म्हणावे लागेल.

माजी दिग्गजांची उपेक्षाच

सध्याच्या मॉडर्न युगातील खेळाडूंना त्यांच्या कामगिरीसाठी खेलरत्न, अर्जुन पुरस्कार, प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्कार दिला जातो. परंतु, माजी खेळाडूंचे काय याबाबत सरकारने अधिक गांभिर्याने विचार करणे गरजेचे आहे. रोहित शर्मासारख्या क्रिकेटपटूला खेलरत्नसाठी पात्र ठरतो मग राहुल द्रविड, सुनील गावसकर, पीटी उषा का नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मात्र भविष्यातील धोका ओळखून २००९ सालीच ‘हॉल ऑफ फेम’ स्थापन करून यात वर्तमान युगात कार्यरत नसलेल्या परंतु, क्रिकेटसाठी मोठे योगदान दिलेल्यांचा समावेश करण्यास सुरुवात केली. केंद्र सरकारने यापासून बोध घेत क्रीडा पुरस्कारांमध्ये थोडे फेरफार केले नाहीत तर पुढील दशकभरानंतर देशाच्या राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त खेळाडू-प्रशिक्षकांपेक्षा आयसीसीची यादी अधिक परिपूर्ण असेल.

ध्यानचंदना भारतरत्न पुरस्कार कधी?

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसाठीची प्रक्रिया सुरू होताच दरवर्षी विचारण्यात येणारा प्रश्‍न म्हणजे भारताला ऑलिंपिकसारख्या खेळाच्या महाकुंभात हॉकीमध्ये तब्बल ८ सुवर्णपदके जिंकून दिलेल्या ध्यानचंद यांना भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेला भारतरत्न पुरस्कार कधी दिला जाणार. दरवर्षी या प्रश्‍नाकडे जाणुनबुजून डोळेझाक करण्यात येते. ध्यानचंद हे या पुरस्कारासाठी पात्र नाहीत का? त्यांची कामगिरी त्यांना भारतरत्न देण्यासाठी पुरेशी नाही का? १९५६ साली ध्यानचंद यांना भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण देऊन गौरवण्यात आले होते. ऑलिंपिकेत्तर क्रीडा प्रकार असलेल्या क्रिकेटमधील कामगिरीसाठी सचिन तेंडुलकरला भारतरत्न दिला जातो तर राष्ट्रीय खेळ असलेल्या व देशाचे नाव उज्ज्वल केलेल्या हॉकीतील ऑलिंपिकमधील कामगिरीसाठी ध्यानचंद यांना भारतरत्न पुरस्कार देण्याऐवजी केवळ त्यांच्या नावाने फक्त राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जावा ही भारतीय क्रीडा क्षेत्रातील शोकांतिकाच म्हणावी लागेल.