बार्सिलोना क्लबला करणार लिऑनेल मेस्सी रामराम

0
136

>> आयपीएल टीम केकेआरने दिली खास ऑफर

बार्सिलोना फुटबॉल क्लब आणि स्टार खेळाडू लिऑनेल मेस्सी यांचे गेल्या २ दशकांपासून असलेले खास नाते तुटण्याच्या वाटेवर आहे. येत्या काळात मेस्सी बार्सिलोनाला रामराम करण्याची शक्यता आहे. याबाबत त्याने संघाला पत्र पाठवले असून क्लब सोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

‘द गार्डियन’ने आपल्या अधिकृत ट्विट हँडलवर याबाबत माहिती दिली आहे. यासोबत त्यांनी बार्सिलोना सोडल्यावर मेस्सी कुठे जाईल असेही म्हटले आहे. याला इंडियन प्रिमिअर लीग (आयपीएल) ची फ्रेंचाईजी कोलकाता नाइट रायडर्सने (केकेआर) भन्नाट उत्तर दिले आहे. केकेआरने मेस्सीचा फोटो शेअर केला आहे. मात्र, या फोटोत मेस्सी केकेआरच्या जर्सीत दिसत आहे. ‘महाशय मेस्सी, तुम्हांला स्वतःला जांभळ्या-सोनेरी रंगांच्या जर्सीत पाहायला आवडेल का?’, असा सवालही केला आहे.

दरम्यान, सिझन ट्रॉफित बायर्न म्यूनिककडून मानहानिकारक पराभव स्वीकारावा लागल्यापासून मेस्सी नाराज आहे. यामुळेच त्याने क्लब सोडण्याची इच्छा व्यक्त केली. याला बार्सिलोना क्लबनेदेखील दुजोरा दिला आहे. मेस्सीकडून तसे एक पत्र मिळाल्याचे क्लबने सांगितले. मात्र, मेस्सीला क्लब सोडणे सोपे नाही. तो कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता आहे. क्लबने देखील तसे संकेत दिले आहे. अर्जेंटिनाच्या या स्टार खेळाडूला मर्जीने क्लब सोडू देणार नाही, असे बार्सिलोना क्लबने म्हटले आहे.

क्लब मेस्सीला सोडू इच्छित नाही. त्याने आपल्या कारकिर्दीचा शेवट याच क्लबमध्ये करावा, असेही बार्सिलोना क्लबने म्हटले आहे. मेस्सीने पाठवलेल्या पत्रात क्लब सोडण्याची इच्छा व्यक्त केली असून त्यात त्याने एक कलम देखील नमूद केले आहे. त्यानुसार तो आपल्या मर्जीने क्लब सोडू शकतो. मात्र, याचा अवधी जून महिन्यात संपल्याचे क्लबने म्हटले आहे.