दोनापावला येथील खासगी इस्पितळात उपचार घेत असलेले केंद्रीय आुयष मंत्री व उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांची प्रकृती काल दुपारी खालावली, त्यामुळे नवी दिल्लीच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या इस्पितळातील तज्ज्ञ डॉक्टरांचे तसेच संरक्षण मंत्रालयाच्या डॉक्टरांचे एक पथक तातडीने काल संध्याकाळी गोव्यात दाखल झाले. पाच सदस्यीय डॉक्टरांचे हे पथक खास विमानाने दाबोळी विमानतळावर काल संध्याकाळी साडे सातच्या सुमारास उतरले.
श्रीपाद नाईक यांना श्वास घेण्यास काल दुपारी त्रास जाणवू लागल्याने व त्यांच्या शरीरातील प्राणवायूचे प्रमाण खाली आल्याने त्यांना हाय फ्लो नॉन इन्व्हेसिव्ह व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते अशी माहिती सूत्रांनी दिली.
सुदिन इस्पितळात
मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांना ताप आल्याने पुन्हा दोनापावल येथील खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. २१ रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता, परंतु ताप आल्याने त्यांना पुन्हा इस्पितळात हलवण्यात आले आहे.