बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला आहे. पाटणामध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास मुंबई पोलिसांकडे वर्ग करा, अशी मागणी एका याचिकेच्या माध्यमातून अभिनेत्री रिया चक्रवर्तीने केली होती. त्यावर काल सर्वोच्च सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. पाटणा येथे दाखल झालेला एफआयआर सर्वसमावेशक असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने यावेळी सांगितले. सुशांतच्या मृत्यूसंदर्भात भविष्यात नोंदविण्यात येणार्या इतर कोणत्याही खटल्यांचा तपास सीबीआयने करावा असेही निर्देश न्यायालयाने दिले.
दरम्यान, न्यायालयाच्या या निकालाचे भारतीय जनता पक्षाने स्वागत केले आहे. सुशांतसिंह प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देणे ही सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारच्या पक्षपाती भूमिकेविरुद्ध एकाप्रकारे दाखवलेली नाराजी असल्याचे मत भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी व्यक्त केले.