उमेदवारी देण्यासाठी निवडून येण्याची क्षमता हा महत्त्वाचा निकष आहे. त्यामुळेच कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचे भवितव्य मतदारच ठरवतील असे सांगून राज्यसभेचे खासदार शांताराम नाईक यांनी कुटुंबातील सदस्यांवर उमेदवारी देण्याच्या पक्षाच्या निर्णयाचे समर्थन केले.
भाजप आपले अस्तित्व दिवसेंदिवस गमावत असून भाजपने लोकसभेत वेगवेगळ्या विषयांवर अनेकदा कामकाज रोखले त्यांची वाटचाल फॅसिझमकडे आहे, त्यामुळे गोव्यात मतदार भाजपला थारा देणार नाहीत, असा दावा शांताराम नाईक यांनी केला. गोमंतकियांना ‘हिटलरभाई’ नको आहे, असे ते म्हणाले.
विरोधी नेते मनोहर पर्रीकर यांनी मुख्यमंत्री असतानाही राजधानी पणजी शहरातील विकासाचा विचार केला नाही. रोजगारपूर्व प्रशिक्षण योजनेच्या नावाखाली अनेक युवकांना अधांतरी ठेवण्याचे कृत्य केले. कॉंग्रेसने त्यांच्या भवितव्याचा विचार करून त्यांना नोकर्यांमध्ये सामावून घेतल्याचे नाईक यांनी सांगितले. त्यामुळे पर्रीकर यांना प्रचारसभांमध्ये नोकर्यांचे आश्वासन देण्याचा मुळीच अधिकार नाही, असे ते म्हणाले.
मंत्र्यांच्या लाचखोरीबाबत मौन
नोकर्यांसाठी मंत्र्यांना पैसे दिल्याच्या विजय सरदेसाई यांनी केलेल्या आरोपावर नाईक यांना पत्रकारांनी विचारले असता कायद्यानुसार लाच देणे व घेणे हे दोन्ही गुन्हेच असल्याचे सांगून अधिक भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला.