गोवा बोर्डाचे कर्मचारी संपावर

0
62

>> सातवा वेतन आयोग लागू न केल्याने आंदोलन

 

सातवा वेतन आयोग सरकारी कर्मचार्‍यांना तसेच सरकारी व खाजगी शिक्षकांना लागू करण्यात आला असला तरी पालक संस्था म्हणून कार्य करणार्‍या गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातील कर्मचार्‍यांना वेतन आयोगाच्या सवलतींपासून वगळण्यात आले.
असल्याने संतप्त झालेल्या मंडळाच्या कर्मचार्‍यांना काल मंगळवार दि. २७ पासून बेमुदत संप सुरू केला आहे. तत्पूर्वी, मंडळाच्या कर्मचार्‍यांनी दि. २७ पर्यंत सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू न केल्यास शिक्षण खाते व सरकारला निवेदनाद्वारे संपावर जाण्याचा इशारा दिला होता.
सरकारने दि. ३० नोव्हेंबर रोजी अध्यादेश काढून सरकारी कर्मचार्‍यांना ७ वा वेतन आयोग लागू करण्याचे घोषित केले होते. परंतु आमच्यासारख्या स्वायत्त संस्थांना सदर आयोग नंतर लागू करण्यात येणार आहे असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. हे अन्यायकारक असून इतर सरकारी खात्याप्रमाणे आमच्या मंडळालाही वेतन आयोग त्वरित लागू करावा. त्यात भेदभाव नको अशी आमची मागणी आहे असे गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष जयंत कासार यांनी काल निदर्शन करतेवेळी पत्रकारांना सांगितले संघटनेचे अध्यक्ष कासार यांनी सांगितले, की पूर्वीच्या पाचव्या व सहाव्या वेतन आयोगाप्रमाणेच मंडळाच्या कर्मचार्‍यांना ७ वा वेतन आयोग त्वरित सरकारने लागू करावा. मंडळाचे कर्मचारी इतर सरकारी कर्मचार्‍यांप्रमाणेच काम करीत असल्याने त्यांच्याप्रमाणेच ७ वा वेतन आयोग लागू करावा अशी आमची मागणी आहे. मंडळाची स्वायत्त संस्था म्हणून वर्णी लागली असून मंडळ गोव्यातील सर्व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांचे व्यवस्थापन पाहते. अर्थात ते पालक मंडळ असून सर्व शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना विनाविलंब सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. मात्र, आमच्या बाबतीत कालांतराने निर्णय घेण्याचे सरकारने जाहीर केले असून ते चुकीचे आहे. सर्वांना समान न्याय मिळावा हीच आमची मागणी आहे असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, संघटनेच्या पदाधिकारी मंडळाचे अध्यक्ष जे. आर. रिबेलो यांनी कार्यालयात बोलावून या संबंधात चर्चा करून शिक्षण खात्याकडे पाठविलेली निवेदनाची ङ्गाइल सापडत नसल्याचे सांगितले. या प्रकरणी आपणास काहीच आश्वासन देता येत नाही. दि. ४ जानेवारी रोजी मंडळाच्या कार्यालयात सर्वसाधारण बैठक घेण्याचे ठरविले आहे.
कालपासून मंडळाचे सर्व कर्मचारी बेमुदत संपावर गेल्याने कामकाज ठप्प पडले आहे.