पर्येतील कॉंग्रेसच्या सभेवर दगडफेकीमागे भाजपचा हात

0
84

>> विश्वजीत राणे यांचा सरळ आरोप

२६ रोजी पर्ये-सत्तरी येथील श्री भूमिका मंडपात कॉंग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या सभेवर दगडफेक करण्याची जी घटना घडली त्यामागे भाजपचा हात असून भाजप कार्यकर्त्यांनीच विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे यांना लक्ष्य करण्यासाठी हा हल्ला केल्याचा आरोप कॉंग्रेस आमदार विश्वजीत राणे यांनी काल येथे पत्रकार परिषदेत केला. सुदैवाने प्रतापसिंह राणे हे या सभेला न पोचल्याने या हल्ल्यातून बचावल्याचे त्यांनी सांगितले.
सत्तरी तालुक्यात कॉंग्रेस पक्षाला मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला आहे. ते पाहून भाजपच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. त्यामुळेच भाजप आता गुंडगिरी करू लागला आहे. पर्ये-सत्तरी येथे कॉंग्रेस पक्षाची सभा शांततापूर्ण रितीने चालू होती. यावेळी हल्लेखोरांनी येऊन अचानकपणे दगडफेक सुरू केली, असे राणे म्हणाले. काही वर्षांपूर्वी सालेली येथे एका युवकाची हत्या करण्यात आली होती. त्याला ठार मारणार्‍या युवकांना त्यावेळच्या भाजप कार्यकर्त्यांनी आश्रय दिला होता. तेच लोक आता गुंडगिरी करू लागले असल्याचे राणे म्हणाले.
सत्तरीतील प्रत्येक पंचायतीतून कॉंग्रेसच्या सभांसाठी किमान ५०० लोक हजर राहत असतात आणि त्यामुळेच विरोधकांचा जळफळाट होऊ लागलेला असून ते आता हिंसक कृत्ये करू लागले असल्याचे राणे यांनी नमूद केले. सत्तेवर आल्यापासून आतापर्यंत भाजप युवकांना नोकर्‍या देऊ शकलेला नाही. ज्या युवकांना नोकर्‍या दिल्या आहेत ते कंत्राटी पध्दतीवर असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले. हल्लीच नोकरभरतीसाठी जाहिरात दिली होती. पण नंतर ती नोकरभरतीही स्थगित केल्याचे राणे म्हणाले. भाजपला डोळ्यांपुढे पराभव दिसू लागलेला असून त्यामुळेच विरोधकांवर हल्ला करणे, त्यांना ब्लॅकमेल करणे असे प्रकार त्यांनी चालवले असल्याचे प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी यावेळी बोलताना सांगितले. असहिष्णुतेची नवी संस्कृती भाजपने देशात आणली असून या हल्ल्याचा तसेच असहिष्णुतेचा कॉंग्रेस निषेध करीत असल्याचे फालेरो म्हणाले.