>> आम आदमी पक्षाची कुंकळ्ळी येथे जाहीर सभा
गोमंतकीयांनी आम आदमी पक्षास सत्ता दिल्यास गोव्याची वैभवशाली संस्कृती जोपासण्यास सरकार प्राधान्य देईल. तसेच चारित्र्यहीनता, गुन्हेगारी, धर्मांध व भ्रष्टाचार या देशाला पोखरणार्या चार गोष्टींविरोधात लढा देईल. असे आश्वासन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काल कुंकळ्ळी येथील आम आदमी पक्षाच्या जाहीर सभेत दिले. कुंकळ्ळी बसस्थानकाजवळ भरलेल्या या जाहीर सभेला यावेळी सुमारे १० हजार लोकांची उपस्थिती होती. यावेळी श्री. केजरीवाल यांनी ‘आप’ला विजयी केल्यास एल्विस गोम्स यांना मुख्यमंत्री बनविण्यात येईल असे जाहीर केले.
भाजप व कॉंग्रेस हे एकाच कुटुंबातील भ्रष्टाचारी घटक असल्याचे सांगून श्री. केजरीवाल यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी भ्रष्टाचारी असल्याचे आपणाकडे भक्कम पुरावे आहेत. आदित्य बिर्ला, सहारा यांचकडून करोडो रुपये घेतल्याचे पुरावे आयकर खात्यात नोंद झाले आहे. याची कागदपत्रे आपल्याकडे आहेत असा दावा केला. मोदींनी धनाढ्य लोकांची ८ लाख कोटी रुपयांची कर्जे माफ केली व ते प्रकरण पचवण्यासाठी नोटाबंदी केली. नोटाबंदीने बहुसंख्य सर्वसामान्य नागरिकांना पैशांसाठी दिवसेंदिवस बँकेच्या दरवाजाबाहेर रांगेत उभे राहण्यास भाग पाडले. विजय मल्ल्याचे ११०० कोटी रुपयांचे कर्ज माफ करून आपण धनिकांना संरक्षण देत असल्याचे त्यांनी दाखवून दिल्याचा आरोप केजरीवाल यांनी यावेळी केला. गुजरातचे मुख्यमंत्री असताना सहारा व बिर्लाकडून २५ कोटी रुपये घेतल्याचा पुरावा आपल्याकडे असल्याचे केजरीवाल यावेळी म्हणाले. एका बाजूने भ्रष्टाचार करायचा आणि दुसर्या बाजूने दिल्लीच्या विकासासाठी निधी अडवून ठेवण्याचे धोरण राबवायचे. तरीही दिल्लीवासीयांच्या सहकार्याने शिक्षण, आरोग्यक्षेत्रात अनेक विकासकामे केल्याचा दावा केजरीवाल यांनी यावेळी केला. यावेळी केजरीवाल यांनी, आपचे सरकार आल्यास गोव्यातील भाजप व कॉंग्रेस सरकारमधील भ्रष्टाचारी व्यक्तींवर कारवाई करेल असे आश्वासन दिले. यावेळी बोलताना वाल्मिकी नाईक यांनी उपस्थितांना आम आदमी पक्षास २६ जागा द्या असे आवाहन केले. तर त्यानंतर बोलताना श्री. गोम्स म्हणाले की, २६ नको स्वच्छ तसेच पारदर्शी आपचे सरकार येण्यासाठी ३५ उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले. यावेळी डॉ. ऑस्कर रिबेलो, डॉ. लार्सन फर्नांडिस यांनीही विचार मांडले. यावेळी दिल्लीचे पंकज गुप्ता उपस्थित होते.