नोटाबंदी निर्णयानंतर विरोधकांनी सरकारला धारेवर धरले असल्याने त्यांची बोलती बंद करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या सर्व खासदार व आमदारांना त्यांच्या बँक खात्यांचे तपशील सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार ८ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंतच्या बँक खात्यांचे व्यवहार भाजप खासदार व आमदारांना सादर करावे लागतील.
१ जानेवारीपर्यंत पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याकडे तपशील सादर करावा लागेल. काळा पैसा व बनावट नोटांना चाप लावण्यासाठी मोदी सरकारने ८ नोव्हेंबर रोजी ५०० व १००० रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द केल्या होत्या. या निर्णयानंतर अनेकांनी त्यांच्याकडील बेहिशेबी पैसा मोठ्या प्रमाणात विविध प्रकारे बँक खात्यांमध्ये जमा करण्यास सुरूवात केली होती. मोदींच्या या धाडसी निर्णयानंतर देशभरात गोंधळ माजला होता. पैसे काढण्यासाठी लोकांना बँकांसमोर ताटकळत राहावे लागत आहे. दरम्यान, आता मोदींचा आदेश भाजप खासदार व आमदार कशा प्रकारे पाळतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.