Home बातम्या भिडू रिंगणात

भिडू रिंगणात

0

कॉंग्रेस – राष्ट्रवादी आणि भाजपा – मगो युतीचे घोडे अखेर गंगेत न्हाल्याने राजकीय रणधुमाळीस आता तोंड फुटणार आहे. कॉंग्रेसने आपली २२ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आणि लागोपाठ भाजपानेही आपले २२ उमेदवार जाहीर केले. त्यामुळे काही मतदारसंघांतील लढतींचे चित्र स्पष्ट झाले आहे. मांद्रे मतदारसंघात दयानंद सोपटे आणि डिचोलीत राजेश पाटणेकर निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसवासी झाले, तरी त्यांना तिकीट दिले जाणार की नाही या शंकेला पूर्णविराम देत दोघांनाही उमेदवारी देत कॉंग्रेसने पक्षनिष्ठेपेक्षा जिंकून येण्याच्या क्षमतेलाच पक्षाचे प्राधान्य असेल याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. पक्षाच्या निष्ठावंतांमधील अस्वस्थतेचा त्यामुळे या निवडणुकीत स्फोट होणे अटळ आहे. डिचोली गट कॉंग्रेस समितीने राजीनामे सादर करून बंडाचा बिगुल वाजवला आहेच. अनेक मतदारसंघांमध्ये विविध राजकीय पक्षांपुढे यावेळी अशा बंडाळीचे आव्हान उभे असणार आहे. भाजपाने निवडणूक जवळ येताच पक्षाचे एकेकाळचे ज्येष्ठ नेते डॉ. सुरेश आमोणकर यांना पक्षात स्वगृही परत आणले, परंतु साखळीतून उमेदवारी मात्र प्रमोद सावंत यांना बहाल केली आहे.

निवडणूक तोंडावर असताना पक्षात आलेले सत्यविजय नाईक यांना वाळपईत, विष्णू वाघ यांना सांत आंद्रेत उमेदवारी दिली गेली आहे. कॉंग्रेस आणि भाजपाची भिस्त आपल्या काही विद्यमान आमदारांवर कायम असल्याचे दिसते. कॉंग्रेसने चर्चिल आलेमाव यांना त्यांच्या इच्छेनुरुप नावेलीची उमेदवारी बहाल केली. ‘एका कुटुंबातील एकालाच उमेदवारी’ या गेल्यावेळी कटाक्षाने पाळल्या गेलेल्या तत्त्वाला जाहीरपणे हरताळ फासत सत्तरीत राणे पितापुत्राला, दक्षिणेत आलेमाव बंधूंना उमेदवारीचे वाटप झाले. भाजपानेही आपले गेल्यावेळचे खंदे आमदार दामू नाईक, लक्ष्मीकांत पार्सेकर, फ्रान्सिस डिसोझा, दिलीप परुळेकर, अनंत शेट, महादेव नाईक, तवडकर आदींची लोकप्रियता पुन्हा आजमावण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यांच्या कॉंग्रेसप्रवेशाच्या वावड्या सातत्याने उडवल्या जात होत्या, त्या मिलींद नाईक यांनाही पक्षाने फेर उमेदवारी दिली आहे. कॉंग्रेसनेही विद्यमान आमदारांना फेरउमेदवारी दिली, परंतु सांताक्रुझमध्ये मामींचा पत्ता काटला. बाबूश मोन्सेर्रात यांचा पक्षावर कसा प्रभाव आहे, ते त्यामुळे दिसून आले. उमेदवारी निश्‍चित होत असताना बाबूश यांच्यावर प्राप्तीकरखात्याचे छापे पडले, जमीन रूपांतरणासंबंधी त्यांच्यावर गंभीर आरोप झाले, परंतु त्या सर्वांकडे कानाडोळा करीत त्यांना उमेदवारी दिली गेली आहे. दयानंद नार्वेकर मंत्रिपद न मिळाल्याने अस्वस्थ होऊन गेल्या वेळी सरकारवर सातत्याने शरसंधान करीत आले. विधानसभेतही स्वतःच्या सरकारवर तोंडसुख घेत आले, परंतु त्यांनाही कॉंग्रेसने उमेदवारी बहाल केलेली आहे. भाजपाशी युती झाल्याने मगोचे काम यावेळी सोपे झाले आहे. आठ मतदारसंघ त्यांना मिळाले आहेत, ज्यापैकी पाच जागांवर त्यांनी आपले उमेदवार उभे केले. भाजपाला त्यामुळे केपेची जागा मगोसाठी सोडावी लागली. इतर जागांवर पक्षापाशी सक्षम उमेदवारच नव्हते, त्यामुळे भाजपाचा युती झाल्याने काही विशेष तोटा झाला आहे असे म्हणता येणार नाही. राजधानी पणजीत मनोहर पर्रीकर आणि यतीन पारेख अशी रोचक लढत होणार आहे. पर्रीकर यांची धडाडी आणि कर्तबगारी यांना मतदार प्राधान्य देणार की यतीन पारेख यांच्या सौम्य, समंजस व्यक्तिमत्त्वाची मोहिनी त्यांच्यावर पडणार हे दिसेलच. मात्र, बाबूश यांचे समर्थन यतीन यांना लाभदायक ठरण्याऐवजी तोट्याचेच ठरू शकते. या निवडणुकीचे लक्षात येणारे एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे अनेक मतदारसंघांवर पक्षांनी उमेदवार लादले आहेत. कोणाला ऐनवेळी पक्षात घेऊन, तर कोणाचा मतदारसंघाशी संपर्कही नसताना आणि कोणा उमेदवाराच्याच इच्छेखातर असे मतदारसंघांमध्ये उमेदवार लादले गेले असल्याने त्याचे परिणाम म्हणून बंडखोरी अटळ आहे. त्या बंडखोरीचा किती असर होतो आणि विरुद्ध गटाला त्यातील किती मते स्वतःच्या पारड्यात मिळवता येतात, त्यावर पारडे कोठे झुकेल हे अवलंबून असेल. या सार्‍या घुसळणीतून शेवटी मतदाराच्या हाती काय लागणार, त्याला स्थिर व विकासाभिमुख सरकार मिळणार की पुन्हा त्रिशंकूचे त्रांगडेच सतावणार हाच प्रश्न आता उरला आहे.