हे सरस्वती, नमन तुझ्या पदकमली!

0
5554

– रमेश सावईकर

विद्यार्थ्यांसाठी या धार्मिक उत्सवाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. विद्याध्ययनासाठी सरस्वती पूजनाचा मुहूर्त शुभ मानण्याची रुढी पूर्वीपासूनच आहे. पाटी, वही व पुस्तक, पेन, पेन्सील यांचे पूजन करून नंतर विद्याभ्यासास सुरुवात केली जाते.

भारतीय संस्कृतीतील ज्या श्रेष्ठ देव-देवता आहेत त्यांच्या पूजनोत्सवाना विशेष महत्त्व आहे. आपल्या देशात विविध राज्यांतील प्रमुख असे सण वेगळे तसे त्यांचे रूपही आगळे वेगळे आहे. धर्मानुसार, सण-त्यौहार आहेत तसे ते साजरे करण्याची परंपरा, रूढी वेगवेगळ्या आहेत. तथापि देवदेवतांच्या सणाना भक्तगणांमध्ये जो उत्साह, उमेद, आनंद, भक्ती आदी भाव व्यक्त होतात ते मात्र एकाच दर्जाचे उच्च पातळी गाठणारे, आध्यात्मिकतेच्या अधिष्ठानाशी संबंधित असेच असतात. काळ बदलला. माणसे बदलली. नव्या पिढीतील लोकांची जीवनपद्धती बदलली, तथा त्यांची संस्कृतीतील सणा-उत्सवांशी असलेली भक्तिभावना बदललेली नाही. किंबहुना अजिबात कमी न होता अभिवृद्धित होत गेली हे विशेष!
आश्‍विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी तिथीपर्यंतचे नऊ दिवस ‘नवरात्री’ उत्सव म्हणून दुर्गामातेची भक्ती केली जाते. महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी या तिन्ही देवतांची रुपे दुर्गामातेमध्ये सामावली आहेत. या त्रिदेवींपैकी एक म्हणजे ज्ञान, विज्ञान, चातुर्य, कळा आदिंची देवता म्हणजे सरस्वती देवी. वैदिक काळापासून ते आजतागायत हिंदू धर्मपरंपरा रुढींनुसार श्रीसरस्वती देवी किंवा श्रीशारदादेवी ही एक श्रेष्ठ देवी मानली गेली आहे. अन्य देव-देवतांच्या पूजा-अर्चा दैनंदिन होतात, तसे पूजन श्रीसरस्वती देवीचे करण्याची प्रथा नाही. तथापि मोठ्या शुभकार्यारंभी श्रीगणपतीसह श्री सरस्वती देवीला ज्ञान-संगीत आणि कला यांची देवता मानून तिची भक्ती करतात. भारत, नेपाळशिवाय जपान, व्हिएतनाम, बाळी (इंडोनेशिया) आणि म्यानमारमध्येही या देवतेची मूर्ती-मंदिरे आहेत.
सरस्वती या शब्दाची व्युत्पत्ती सृ= वाहणे, हलणे या धातूपासून झालेली आहे. त्याचा अर्थ ‘गतिमती’ असा आहे. आध्यात्मिक अर्थाने ती निष्क्रीय ब्रह्माचे सक्रीय रूप असून तिला ब्रह्मा-विष्णू-महेश या त्रिवर्गांना गती देणारी शक्ती म्हटले आहे.
ऋग्वेदात तिला नदीचे मानवी रूप मानले आहे. आणि एके ठिकाणी देवतांची राणी म्हटलेले आहे. उपनिषदात सरस्वतीची वाणीशी एकरूपता दर्शविली आहे. तिचा वाग्देवी असा उल्लेख होऊ लागला. कालांतराने वाणीची स्फूर्तीदेवता आणि विज्ञान व साहित्य यांची अधिष्ठात्री बनली. तिला चौसस्ट कलांची तज्ज्ञ मानली आहे. पुराण काळात तिची महती मातृदेवता म्हणून वर्तविली जाऊन सर्व संकल्पनातून सर्वश्रेष्ठ माता, विद्यादेवता, शारदा अशी तिची प्रतिमा तयार झाली. गायत्री मंत्रात एकरूप झाल्यानंतर ही गायत्री-वाग्देवी सरस्वती बनून राहिली. ऋग्वेद ते पुराणकाळ या दीर्घ काळात नदी-नदी देवता, वाक् – वाणी आणि अखेर मातृदेवता – विद्यादेवता या तीन प्रमुख भूमिका आढळतात. ऋग्वेदात या देवतेला…
‘अम्बितमे नदीतमे देवितमे सरस्वती’… असा उल्लेख आढळतो.
हिंदू प्राचीन वाङ्‌मयात तिचा अनेक नावांनी उल्लेख केला आहे. ब्राह्मणी (ब्रह्मशक्ती), ब्राह्मी (विज्ञान देवता), भराडी (इतिहास-देवता), वाणी आणि वाचि (संगीत, वाणी-प्रभावी वत्क्ृत्व) वर्णेश्‍वरी (वर्णांची अक्षर देवता), कविजिव्हाग्रहीवासिनी (कवीच्या जिभेवर नाचणारी) ही त्यांपैकी काही महत्त्वाची नावे आहेत. ‘महाभारत’ या ग्रंथात सरस्वतीला ‘वेदांची माता’ म्हटले आहे.
सरस्वती शुभवस्त्र नेसलेली, कमळावर विराजमान झालेली शुभ्रज्योत्स्ना मयुरावर आरूढ झालेली विद्येची देवता म्हणजे प्रकाश, ज्ञान आणि सत्याचे प्रतीक आहे. शुभ्र रंग हा सत्वगुण, शुद्धता, सत्य ज्ञान व शहाणपण यांचे प्रतीक मानले आहे.
सरस्वतीच्या चार हातांपैकी एका हातात पुस्तक आहे. विश्‍वात्मक, आध्यात्मिक व सत्य ज्ञानाचे ते प्रतीक आहे. दुसर्‍या हातात माला आहे. त्यातून तपःशक्ती, आध्यात्मिक दृष्टी प्रतित होते. तिसर्‍या हातात जलकुंभ आहे जो बरोबर-चूक, स्वच्छ-अस्वच्छ, गुण-अवगुण यांना वेगळे करण्याची शक्ती दर्शवितो. तर चौथ्या हातात सरस्वतीने ‘वीणा’ वाद्य धारण केले आहे. विज्ञान व कलांच्या विविध शाखांची ती प्रतिकात्मक शक्ती आहे.
ती ‘अनुरागा’शी संबंधित आहे. त्यातून संगीत कलेतील पारंगतता, प्रेम व वाचा शक्ती दर्शविते. ज्या माणसाची वाणी रसाळ, शुद्ध आहे, वाणीतून ज्ञान-तत्त्वज्ञान ऐकायला मिळते, त्याचा उल्लेख करताना सरस्वती त्याच्या जिभेवर आहे असे आपण म्हणतो.
सरस्वतीच्या पदाजवळ हंस पक्षी चित्रित केलेला दिसतो. हंस हा पवित्र पक्षी असून मिश्रणातून दूध व पाणी वेगळे करण्याची शक्ती त्याच्यात आहे. चांगले-वाईट, सत्य-असत्य वेगळे करण्याची ती शक्तीदेवता आहे. हंस व मयूर पक्षी ही तिची आवडती वाहने आहेत. म्हणून तिला हंसवाहिनी असेही म्हटले जाते.
सरस्वती देवता ही भारतीय संस्कृतीमध्ये श्रेष्ठ मानली गेली असली तरी ती नित्य पूजेसाठीची देवता म्हणून प्रचलित नाही. हिंदू धर्मांत आश्‍विन शुक्ल पक्षातील प्रतिपदा ते नवमी या नऊ रात्री नवरात्रोत्सवातील सप्तमी, अष्टमी व नवमी अशा तीन तिथींना सरस्वती पूजनोत्सव साजरा करण्याची प्रथा आजही चालू आहे. ‘जैन धर्मांत’ ती ‘श्रुती देवी’ तर बौद्ध धर्मांत ‘प्रजापरमिता’ या स्वरूपात आढळते. बौद्ध वाङ्‌मयात तिचा उल्लेख महासरस्वती, आर्यव्रजा, वज्रवीणा, वज्रशारदा अशा भिन्न नावांनी केलेला आढळतो.
सरस्वतीची स्वतंत्र अशी थोडीच मंदिरे आहेत. त्यांपैकी शृंगेरीचे शारदाम्बा (९व्या शतकातील), गदग (कर्नाटक)चे् सरस्वती मंदिर (११व्या शतक), कुथनूर (तामिळनाडू)चे सरस्वती मंदिर (१२ वे शतक) ही मंदिरे प्रसिद्ध आहेत. सरस्वतीच्या मूळ नदीदेवतेपासून उत्क्रांत झालेले विकसित शारदा देवीचे रूप मूर्तीशिल्पातून दृग्गोचर होते.
सरस्वती शुभ्रवर्ण, शुभ्रवस्त्रधारिणी, अलंकार-विभूषित, चतुर्भुज, पुंडरिक, माला, वीणा व कमंडलू धारण करणारी असावी. पुस्तक व वीणा ही तिची प्रमुख आयुधे सर्वत्र दिसतात. मूर्तिशिल्पांत कमळ, हंस, मोर, सिंह ही तिची वाहने आढळतात. मात्र हंस आणि मोर ही तिची लाडकी वाहने आहेत.
तिचा वसंत पंचमी उत्सव भारतात साजरा केला जातो. पश्‍चिम व मध्य भारतात जैन धर्मीय लोक व काही प्रांतात बौद्ध धर्मीय लोक सरस्वतीच्या पूजनाचा उत्सव विविध प्रकारे साजरा करतात. गोवा, महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांत आश्‍विन महिन्यांतील नवरात्रीचे शेवटचे तीन दिवस सरस्वती पूजनोत्सव मोठ्या थाटात साजरा होतो. सप्तमीला सरस्वती देवीचे आवाहन, अष्टमीला पूजन करण्यात येते. अष्टमी व नवमी हे दोन दिवस शैक्षणिक संस्था, कला संस्थांमार्फत सरस्वती पूजनोत्सवानिमित्त धार्मिक, संगीत, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
विद्यार्थ्यांसाठी या धार्मिक उत्सवाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. विद्याध्ययनासाठी सरस्वती पूजनाचा मुहूर्त शुभ मानण्याची रुढी पूर्वीपासूनच आहे. पाटी, वही व पुस्तक, पेन, पेन्सील यांचे पूजन करून नंतर विद्याभ्यासास सुरुवात केली जाते.
वाणीची देवता असल्याने विद्यार्थ्यांसाठी वत्कृत्व स्पर्धा घेतल्या जातात. संगीत, नृत्य व अन्य कलांची देवता मानली गेल्याने संगीत, गायन, नृत्य, कीर्तन, सांस्कृतिक कार्यक्रमांना या उत्सवात प्राधान्य दिले जाते. काही कुटुंबांमध्ये नवरात्रात सरस्वती पूजन करण्याची परंपरा अजूनही टिकून आहे. हा उत्सव म्हणजे विद्यार्थ्यांना विद्यादेवता आणि कलावंतांना विविध कलांची अधिष्ठात्री देवतेची उपासना, भक्ती, सेवा करण्याची संधी असते. ती पार पाडल्यास सरस्वतीदेवता सुप्रसन्न होऊन शुभाशिर्वाद देते ज्यायोगे विद्यार्थी व कलावंत आपापल्या क्षेत्रात यशस्वी होतात. या गायत्री देवीला आराध्य दैवत मानून जीवनात सत्वगुणांचे आचरण केले तर जीवन यशस्वी, फलदायी, आनंदी, सुखी व समृद्ध होईल. म्हणून हे सरस्वती, हंसवाहिनी, द्रुमदलशोभिनी, सुमधुरभाषिणी अन् सर्वशक्ती देवी तुला माझा साष्टांग दंडवत!