>> दीड हजार राखीव पोलीस तैनात
दक्षिण गोव्यातील लीला गोवामध्ये होणार्या ब्रिक्स शिखर परिषदेला आठ दिवस बाकी असून तयारीसाठी युद्धपातळीवर सरकारी यंत्रणा कार्यरत आहे. काल गोवा पोलिसांच्या राखीव पोलीस दलातील १५०० पोलिसांची नियुक्ती केली. काल सकाळी हे पोलीस दक्षिण गोव्यातील मडगाव पोलीस मुख्यालयात दाखल झाले. पोलिस अधीक्षक शेखर प्रभुदेसाई यांनी दाभोळीपासून लीलाबीचपर्यंत व महामार्गावर त्यांची नियुक्ती केली. पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी धमकी दिल्याने आठ दिवस अगोदर पोलीस तैनात केले असून ठिकठिकाणी उपनिरीक्षक, निरीक्षकाची नेमणूक केली आहे.
ब्रिक्स परिषदेच्या संरक्षणासाठी दीड हजार पोलीस पुरेसे असून गोवा पोलीस दल सक्षम आहे. पूर्ण तयारी आम्ही केली असल्याचे अधीक्षक श्री. प्रभुदेसाई यानी सांगितले. दक्षिण गोव्यातील विविध पोलीस स्थानकांवरील अधिकार्यांची विविध नाक्यावर नियुक्ती केली आहे. तसेच अतिरिक्त जिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी, अधिक्षक, वीज व बांधकाम खात्याचे अभियंते, उपजिल्हाधिकारी यांची नेमणूक केली आहे. गेल्या चार दिवसांपासून हे अधिकारी नियुक्त केलेल्या जागेवर जाऊन तेथील कामाची पहाणी करत आहेत. या परिषदेत पाच देशांचे राष्ट्रप्रमुख सहभागी होणार असल्याचे सुरक्षा व वाहतूक सुरक्षेसाठी धावपळ करत असून पोलीस मुख्यालयात वाहतूक पोलिसांच्या बैठका होत आहेत. जिल्हाधिकारी इमारतीत दररोज विविध खातेप्रमुखांच्या अधिकार्यांची बैठक घेऊन प्रगतीचा आढावा घेत आहे.
नेत्यांना बुलेटप्रूफ गाड्या
उरीतील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेताना भारतीय कमांडोनी पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेला दहशतवादी तळ व असंख्य दहशतवाद्यांचा खात्मा यामुळे ब्रिक्स परिषदेत सहभागी होणार्या विविध राष्ट्रांच्या नेत्यांना पक्के संरक्षण देण्याचा आदेश आल्याने आठ दिवस अगोदर संरक्षण दिले आहे. विविध नेत्यांच्या संरक्षणासाठी विमानतळ ते केळशीपर्यंत बुलेटप्रूफ गाड्यांचा ताफा तैनात केला आहे. सुरक्षेचा भाग म्हणून परिषद काळात दक्षिण गोव्यात मासेमारी व जलक्रीडावर बंदी घातली आहे. दि. १५ ते १७ ऑक्टोबरपर्यंत मासेमारी व जलक्रीडा बंद राहणार आहे.
रस्ता रुंदीकरण-सौंदर्यीकरण
दाभोळी ते केळशीपर्यंत रस्ते रुंदीकरण व डांबरीकरण, सौदर्यीकरण, वीजेचे दिवे, पाणीपुरवठा या कामावर अंतिम हात फिरवला जात आहे. मोबाईल, फोनसेवा सुरक्षित होण्यासाठी मोबाइल टॉवर उभारण्याचे काम चालू आहे. रस्त्यावरील सर्व अडथळे हटवले असून झाडे कापून टाकली. तसेच रस्त्यालगत असलेल्या झोपड्या, बांधकामे हटविली आहेत. जिल्हाधिकारी स्वप्निल नाईक या तयारीत व्यस्त आहेत.
दरम्यान, याठिकाणी रस्ता रुंदीकरणासाठी उपटून टाकण्यात आलेली झाडे फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई तसेच गोवा फरवर्ड पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दुसर्या जागी नेऊन लावली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.