Home बातम्या मोरजीत घराला आग

मोरजीत घराला आग

0

अग्नीशामन दलाचे बंब उशिरा पोचल्याने बांदेकरवाडा मोरजी येथील शशिकला आस्कांवकर यांची खोली भस्मसात होऊन दीड लाख रुपयांचे नुकसान झाले, शेवटी स्थानिक लोकांनीच आग विझवली.

सविस्तर माहितीनुसार बांदेकरवाडा मोरजी येथील शशिकला आस्कांवकर या महिलेच्या राहत्या घराला ३१ रोजी सायंकाळी ५.३० वाजता आग लागली. त्यात खोलीत असलेले किमती सामान, ज्यात सोन्याच्या पाटल्या, चार बांगड्या, सोन्याची साखळी, दोन कानातील कुंडका व एक अंगठी यांचा समावेश होता, याशिवाय किंमती सामान जळून खाक झाले. यामुळे सुमारे दीड लाख रु. चे नुकसान झाले.

पेडणे अग्निशामन दलाचा बंब इतरत्र गेल्याने म्हापसा कार्यालयास ६.१५ मि. कळवले. त्यानंतर म्हापसा येथून अग्निशामन दलाचा बंब ६.४५ वा. पोचला, बंब वेळेवर पोचत नसल्याने स्थानिक मुकूंद यशवंत बांदेकर, निलेश पेडणेकर, नवनाथ बांदेकर, प्रभाकर बांदेकर, नंदू कोरगावकर, बाळू शेटगावकर, बाळा पेडणेकर, किशोर आस्कांवकर, संगीता आस्कांवकर व यशश्री तांडेल या स्थानिकांनी अग्निशामन दलाचा बंब येण्यापूर्वी आग आटोक्यात आणली. मात्र, पूर्णपणे खोलीतील सर्वसामान जळून खाक झाले.

अन्यथा अनर्थ घडला असता

शॉर्ट सर्कीटमुळे आग लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ज्या खोलीत ही आग लागली त्या खोलीत सदर महिला राहत होती. आग लागताच आरडाओरडा केल्याने घरातील व शेजार्‍यानी धाव घेऊन वयोवृद्ध महिलेला खोलीबाहेर काढले. आत गॅस सिलिंडर होता. धोक्याचे गांभीर्य ओळखून स्थानिकांनी गॅस सिलिंडर बाहेर काढला. अन्यथा भडका उडून पूर्णपणे घर खाक झाले असते.