– अनिल पै
गोमंतपुत्रांनी कला, साहित्य, शिक्षण, उद्योग, आरोग्य, विज्ञान व तंत्रज्ञान तसेच अनेक क्षेत्रांत आपल्या ज्ञानाने व विद्वत्तेने जगात कीर्ती मिळवलेली आहे व गोव्याबरोबर भारताचे नाव जगात उज्ज्वल केलेले आहे. त्यांतीलच एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विद्वान पद्मभूषण डॉ. जुझे परेरा. प्रकांड पंडित, विद्वान, इतिहास संशोधक, धर्म–संस्कृती व कलेचे अभ्यासक, कोंकणीचे निष्ठावंत भक्त असलेल्या डॉ. जुझे परेरा यांना भारत सरकारने पद्मभूषण देऊन त्यांचा जो गौरव केलेला आहे तो यथोचितच आहे. तसे पाहू गेल्यास त्यांना हा पुरस्कार यापूर्वीच मिळायला हवा होता.
यावर्षी थोर व्यंगचित्रकार क्रि. मारियो मिरांडा यांनाही मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांच्या कामाची नोंद घेतली गेली. डॉ. जुझे परेरा यांच्याशी माझा अनेकदा संबंध आलेला आहे. कोंकणी भाषा, कोंकणी लेखक व इतर साहित्यावर आमच्या नेहमीच चर्चा होत असत. त्यांना पद्मभूषण मिळाल्याचे जाहीर होताच मला अत्यानंद झाला.
डॉ. जुझे परेरा ही तत्त्वनिष्ठ व्यक्ती. हातात घेतलेले कोणतेही कार्य तळमळीने पूर्ण करण्याची जिद्द आणि निरपेक्ष सेवाभाव हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे गुण. अशा या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या थोर विद्वानाचा व साहित्यिकाचा जन्म २२ जानेवारी १९३१ या दिवशी मुंबई येथे झाला. १९५९ साली त्यांनी मुंबई येथे झेवियर महाविद्यालयात ‘प्राचीन भारतीय इतिहास आणि संस्कृती’ या विषयावर प्रबंध लिहून पी.एचडी. मिळवली. त्याआधी १९५१ साली संस्कृत हा विषय घेऊन त्यांनी बीएची पदवी विशेष गुणांनी प्राप्त केली होती.
१९७० ते १९७६ या सहा वर्षांत त्यांनी आपल्या ज्ञानाचा व कार्याचा विस्तार केला. न्यूयॉर्क शहरात असलेल्या प्रसिद्ध फॉरडेम विद्यापीठात सहप्रोफेसर म्हणून त्यांनी काम केले व त्याच काळात विद्याध्ययन करून आपल्या ज्ञानात आणखी भर टाकली. १९७६ ते १९८६ ही दहा वर्षे ते असोसिएट प्रोफेसर होते, व त्यांची विद्वत्ता, गाडे ज्ञान व अनुभव पाहून १९८६ मध्ये धर्मशास्त्राचे प्रोफेसर म्हणून त्यांना बढती मिळाली.
त्यांनी आपली ज्ञानसाधना कित्येक वर्षे निष्ठेने चालविली. १९५९–६० यावर्षी इन्स्टिट्यूट सुपीरियोर दि इश्तादुश उल्त्रामारीना, लिस्बन येथे त्यांनी पूर्व–पश्चिम सांस्कृतिक संबंधावर अध्यापन केले. १९६१ साली लंडन विद्यापीठात ‘भारतीय कलेचा इतिहास’ या विषयावर त्यांनी साहाय्यक संशोधक म्हणून काम पाहिले व याच विषयावर त्याच संस्थेत संशोधक फेलो म्हणून १९६२ ते १९६६ पर्यंत कार्यरत राहिले. ‘भारतीय कलेचा इतिहास’ या विषयावर त्यांनी अमेरिकन अकादमी व बनारस, वाराणशी या संस्थांत रिर्चस असोसिएट म्हणून काम केले. लिस्बन येथे असताना ग्रंथालयात बसून त्यांनी गोव्यासंबंधीची पुस्तके वाचून काढली. गोव्याची थोर परंपरा, संस्कृती, तसेच कला व भाषेसंबंधी जे साहित्य होते ते त्यांनी गोळा करून त्याचा अभ्यास केला.
आपल्या आवडीच्याच विषयांवर डॉ. जुझे परेरा यांनी संशोधन केले आहे असे नव्हे, तर त्यांनी काही ग्रंथही लिहिलेले आहेत. त्या ग्रंथांची देश–विदेशांतील तज्ज्ञांनी वाखाणणीही केलेली आहे. धर्मशास्त्र, वास्तुशास्त्र, भाषाशास्त्र, शास्त्रीय संगीत, लोकसंगीत, इतिहास यां सारख्या विषयांवर त्यांचे असामान्य प्रभुत्व आहे. या कार्यांची व त्यांच्या विद्वत्तेची दखल घेऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांचे सन्मान झालेले आहे. कोंकणी भाषा आणि साहित्य यांची योग्यता, त्यांचा दर्जा सिद्ध करण्यासाठी त्या भाषेला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम डॉ. जुझे परेरा यांनी ज्या पद्धतीने केलेले आहे, त्याचे मूल्यमापन करणे कठीण आहे. त्यामुळेच प्रत्येक गोमंतकीयाला व गोव्यापासून मुंबई, कर्नाटक व केरळ येथे पसरलेल्या लाखो कोंकणी सुपुत्रांना त्यांचा अभिमान वाटतो. ‘कोंकणी मंदाकिनी’ हे पुस्तक लिहून १३ व्या शतकापासून १८ व्या शतकापर्यंत कोंकणी साहित्याचा प्रवाह अखंडितपणे वाहतो आहे हे त्यांनी पुराव्यांनिशी दाखवून दिलेले आहे.
कोंकणी साहित्याच्या सशक्तीकरणावरही त्यांनी ग्रंथ लिहिले आहेत. ‘कोंकणी मंदाकिनी’ व आणखी एक पुस्तक कोंकणी अकादमीने प्रसिद्ध केलेले आहे. कोंकणी लोकसंगीत, भाषा आणि साहित्य हे त्यांच्या विशेष आवडीचे आणि अभिमानाचे विषय आहेत. मांडो यावर त्यांनी संशोधन केलेले असून मांड्याची रचना केलेली आहे. ते जगात जेथे–जेथे गेले, तेथे–तेथे त्यांनी विद्वानांच्या अंतःकरणात कोंकणीबद्दल आदराचे स्थान निर्माण करण्याचे महान कार्य केले आहे.
अधूनमधून ते गोव्यात येत आणि कुडतरी येथे राहत. इथे त्यांची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी पाहायला मिळे. हाफ पँट व टी–शर्ट घालून, तसेच जुनी सायकल घेऊन ते बाजारात येत. त्या सायकलला पुढे लटकलेली एक पिशवी असायची आणि मागच्या बाजूला फावड्यापासून गवंडी कामाची साधने. ते उत्कृष्ट चित्रकार, तसेच सिमेंटची नक्षीदार कामे करणारे कलाकार आहेत. बोर्डा–मडगाव येथील सेंट ज्योकीम चॅपेल आणि फातोर्डा येथील अवर लेडी ऑफ रोझरी चॅपलमधील अनेक चित्रे रंगवून व सिमेंटची कोरीव कामे करून त्यांनी आपल्या कलेची एक झलक पेश केली आहे. गोव्यात आल्यावर ते कलामग्न राहतात. विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी आपल्या मित्रांना भेटत असतात. नम्रता व साधेपणा हा त्यांचा स्थायिभाव आहे.
त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर २७ पुरस्कार प्राप्त झाले आहे. दक्षिण भारतात तसेच वाराणशी येथे झालेल्या संस्कृत संमेलनात, परिसंवादात भाग घेऊन त्यांनी वेद, उपनिषदे, पुराणे यांवर भाषणे दिलेली आहे. अनेक विद्यापीठांतून त्यांनी असंख्य विद्यार्थ्यांना संस्कृतच्या वैभवशाली ग्रंथांचा परिचय करून दिला आहे. हिंदू, जैन व बौद्ध धर्मांवर त्यांनी सखोल अभ्यास केला असून कोणत्याही धर्माच्या तत्त्वावर ते बोलू शकतात. त्यावर त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिलेली आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन आमच्या ‘कुळागर प्रकाशना’चा २००० वर्षाचा पुरस्कार डॉ. जुझे परेरा यांना देऊन त्यांचा सन्मान केला याचा मला रास्त अभिमान वाटतो. आता तर त्यांना भारत सरकारने पद्मभूषण देऊन जो गौरव केलेला आहे तो समस्त गोमंतकीयांचाच गौरव ठरावा. गोव्याची कला व संस्कृती केवढी प्रगल्भ व वैभवशाली आहे हे ज्यांनी दाखवून दिले, त्याच गोमंतकात गोवा सरकारकडून इंग्रजीकरणाच्या नावाने ती कला व संस्कृती नष्ट करण्याचा जो प्रयत्न केला जात आहे त्याचे दुःख डॉ. जुझे परेरा यांना निश्चितच असेल.