Home बातम्या स्वातंत्र्य चळवळ आणि भाषा आंदोलनातील लखलखता तारा निखळला

स्वातंत्र्य चळवळ आणि भाषा आंदोलनातील लखलखता तारा निखळला

0

कॅजिटन परेरा

सत्तरी तालुक्यातील स्वातंत्र्यसैनिक जयसिंगराव व्यंकटराव राणे यांना अखेरचा सलाम करण्यासाठी आम्ही काही समाजवादी मित्रमंडळी गेल्या मंगळवारी त्यांच्या अंत्यदर्शनाला जाऊन आलो. त्यावेळी झटकन त्यांचा जीवनपट नजरेसमोर येऊन गेला.

सुमारे ६५ वर्षांपूर्वी मुंबई विद्यापीठाची बी.. पदवी प्राप्त करून नंतर एम..पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेला जयसिंगराव हा सत्तरीतील मराठा समाजातील तरुण मानमरातबाची नोकरी न करता गोव्यात परतला आणि त्याने सरळ शेतकर्‍याचे जीवन स्वीकारले. वडिलांच्या आग्रहामुळे त्याने बडोदा महाराजांच्या सैनिकी विद्यालयात मिलिटरी शिक्षण घेतले होते. ते शिक्षण म्हणजे मराठा समाजाचा एक मानाचा अलंकारच होता. त्या जोरावर त्यांना उत्तम हुद्याची नोकरी सहज मिळवता आली असती. परंतु कोणापुढे हात पसरायचा नाही, आपला हात कोणाच्या तरी वर पाहिजे. याचक असण्यापेक्षा दाता असावे असा निग्रह करून सत्तरीतील सोनाळ या गावी त्यांनी एक डोंगर टेकडी विकत घेतली व तेथेच सन्मानाने ते आपल्या पायावर उभे राहिले.

त्याकाळी अडगळीत आणि जंगल असलेल्या सोनाळ गावी रस्ते नव्हते, वीज नव्हती, आजच्या सारखी दूरध्वनीची सुविधा नव्हती. तेथे पूल नसल्यामुळे वाहने जातयेत नव्हती की डॉक्टरची सोयही नव्हती. झोपडीवजा चहाचे साधे हॉटेल नव्हते की छोटे दुकानही नव्हते. त्यांचे हे उपद्व्याप पाहून त्यांच्या मित्रांनी त्यांना विक्षिप्तही म्हटले. परंतु त्या टेकडीवर जयसिंगरावांनी माडपोङ्गळी लावल्या. नंतर आंबे, काजू, ङ्गणस, अननसे, नाचणी यांची लागवड करत राहिले. सातत्याने वीस वर्षे कष्ट उपसल्यानंतर त्यांना कायमचे उपजीविकेचे साधन मिळाले. त्या गावात त्यांचे कुटुंब मजेत व आनंदाने निसर्गाच्या सान्निध्यात उभारी घेत राहिले. कुणापुढे हात न पसरता, इतर तरुणांना स्वावलंबनाचे धडे देत ते सत्तरीतील एक आदराचे स्थान बनले. पदरी शिक्षण होते. त्यातही वाचनलेखन चालू होतेच. नवनवीन पुस्तके वाचण्याची त्यांना आवड होती. त्यामुळे ज्ञानात भर पडत होती. लोक त्यांच्याकडे चर्चा करण्यासाठी, मार्गदर्शन घेण्यासाठी येत होते. ती एक तेथील सर्व सामाजिक कार्यांमधील प्रमुख व्यक्ती होती. गोवा मुक्तीनंतरचे त्यांचे जीवन हे असे होते.

मुक्तीअगोदर १९५४ च्या सुमारास जयसिंगराव राणे गोवा स्वातंत्र्यसंग्रामात उतरले. त्यांचे हे ओढले जाणे साहजिकच होते. त्यांचे रक्त मराठा लढवय्या समाजाचे. त्यातही त्यांनी सैनिकी शिक्षण घेतलेले. तारुण्याची खुमखुमी होती. सळसळते रक्त होते. काहीतरी करून दाखविण्याची जिद्द होती अन् पोर्तुगिजांविषयीचा राग नसानसांत भरला होता. अनेक वेळा त्यांनी पोर्तुगिजांविरुद्ध उठाव करण्याच्या योजना मनात आखल्या. त्याच दरम्यान ते मुंबईमध्ये राष्ट्रीय कॉंग्रेसच्या कचेरीत येजा करायचे. तेथे स्वातंत्र्यसेनानी पीटर अल्वारिस यांच्याशी त्यांचा परिचय झाला. ते गोव्याच्या मुक्तीसाठी सत्याग्रही म्हणून त्यांच्याबरोबर गोव्यास जाण्यास तयार झाले.

नॅशनल कॉंग्रेस गोवा ही पीटर अल्वारिस यांच्या मार्गदर्शनाखाली चळवळ सुरूच होती. साखळीचे शिवाजी देसाई आणि सत्तरीतील जयसिंगराव राणे हे दोघेही सुशिक्षित मराठा तरुण पीटर अल्वारिस यांचे खास विश्‍वासू बनले. १९५४ पासून सत्याग्रहींच्या तुकड्या गोव्यात धडकू लागल्या. रानटी वृत्तीच्या पोलिसांनी सत्याग्रहींवर बेछूट हल्ले केले. त्यांना जबर मारहाण केली. काहींचे प्राणही घेतले. हे सर्व पाहिल्यावर जयसिंगराव व त्यांच्या तरुण मित्रांचे रक्त सळसळायला लागले. उर्सेलिन आल्मेदा, आगुस्त अल्वारिस, शिवाजी देसाई आणि जयसिंगराव राणे यांनी पीटर अल्वारिस यांना सांगितले की, ‘सत्याग्रहाचा पोर्तुगीज सत्तेवर काहीही परिणाम होणार नाही. आम्ही सशस्त्र दल तयार करतो.’ ते चारही तरुण चांगल्या आचरणाचे होते. परंतु लढल्याशिवाय स्वातंत्र्य मिळणार नाही याबाबत ठाम होते. त्या चारही तरुणांनी लिबरेशन आर्मी ऑङ्ग गोवाही लढाऊ संघटना स्थापन केली. अर्थातच चार प्रमुख कमांडरांमध्ये जयसिंगराव हे एक होते हे सांगणे नलगे!

लिबरेशन आर्मी ऑङ्ग गोवाने गोव्यात अनेक ठिकाणी पोर्तुगीज सत्तेला धक्के दिले. सामान्य जनांना कोणताही त्रास न होता रस्ते, पूल व महत्त्वाची ठाणी, जी पोर्तुगीज सत्तेला आधारभूत होती, त्यांवर बॉम्बफेक करून उद्ध्वस्त करणे हे या आर्मीचे मुख्य ध्येय होते. या आर्मीने पोर्तुगिजांना अक्षरशः दाती तृण धरायला लावले. संताजीधनाजीप्रमाणे अकस्मात हल्ले करून पोर्तुगीज सत्तेला लिबरेशन आर्मीने जीव नकोसा करून सोडला. त्या आर्मीच्या सर्व कार्यांमध्ये जयसिंगराव महत्त्वाच्या भूमिकेत वावरले.

मुक्तीनंतरच्या काळात आम्ही यंव केलं त्यंव केलं असे सांगणारे अनेक स्वातंत्र्यसैनिक गोव्यात गावोगावी मिळतात, परंतु जयसिंगराव राणेंनी अनेक धाडसी कृत्ये करूनही कोठेही ङ्गुशारकी मारली नाही हे त्यांचे वैशिष्ट्य!

स्वातंत्र्यानंतर आलेल्या भाऊसाहेबांच्या सरकारवेळी जयसिंगराव राणे आणि गजानन रायकर हे दोघे समाजवादी आमदार म्हणून निवडून आले होते. जे जे काम आपल्याकडून होईल ते ते काम ते करीत राहिले. त्यावेळी भाऊंच्या आगेमागे त्यांना खूष करण्यासाठी अनेक आमदार घिरट्या घालीत. ते काम जयसिंगराव राणेंनी कधीच केले नाही. ‘होय भाऊ, होय भाऊम्हणत भाऊंची खुशामत करणारे मराठा तरुण आमदारही होते. होय होय करून मुख्यमंत्रीही झाले. पण जयसिंगराव त्या मार्गाने कधीच गेले नाहीत. आमच्याशी बोलताना अखेरच्या दिवसांत ते म्हणत, ‘‘अरे काय हे, सत्तरीमध्ये मराठा लाचार झाला आहे. कणाहीन झाला आहे. त्यामुळे आमची मराठी गेली याचे दुःख होते.’’

जतसिंगराव गोव्याचा इतिहास, संस्कृती आणि मराठी भाषेवर अभ्यासपूर्ण बोलत. भाषा चळवळीवेळी जयसिंगराव राणेंनी मराठीची बाजू उचलून धरली. अनेक लेख लिहून त्यांनी आपली बाजू प्रखरपणे मांडली. मराठीसंबंधी त्यांनी लिहिलेले लेख झणझणीत अंजन घालणारे होते. त्यांच्याएवढा रास्त अभिमान बाळगणारा मराठीवादी सत्तरीमध्ये दुसरा कोणी नव्हता. ‘मराठी राजभाषा का?’ या विषयावर त्यांनी लिहिलेली दोन छोटी पुस्तके मुद्देसूद आणि वास्तव सांगणारी आहेत.

मराठी राजभाषा होण्यासाठी अनेक योजना ते आम्हाला सांगत. किशोर कोलगे, विश्‍वास देसाई व मी अनेकदा त्यांना भेटून मराठीबद्दल त्यांचे विचार व योजना ऐकायचो. आम्ही महिनाभर कोणत्याही कृतीविना गप्प राहिलो तर त्यांचा ङ्गोन यायचा. सोनाळला यायचा त्यांचा आग्रह असे. साखळीचे स्वातंत्र्यसैनिक शिवाजी देसाई गेले त्यावेळी आम्हा मराठीवाद्यांवर आघात झाला होता. आता जयसिंगराव जाऊन आमच्यावर कडाच कोसळल्याचा भास होतोय. जयसिंगराव राणे हे गोवा स्वातंत्र्याची चळवळीचे, भाषा आंदोलनाचे साक्षीदार होते. आपला तो बहुमूल्य साक्षीदार आज काळाच्या पडद्याआड गेला आहे.