Home बातम्या मतदारांचा कानोसा

मतदारांचा कानोसा

0

येणार्‍या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यात मतदारांच्या मनात सलणार्‍या विषयांचा कानोसा घेण्याचा एक प्रयत्न ‘नवप्रभे’चे इंग्रजी भावंड असलेल्या ‘नवहिंद टाइम्स’ने आपल्या गावोगावच्या वार्ताहरांमार्फत नुकताच केला. वाढता भ्रष्टाचार हा मुद्दा मतदारांच्या दृष्टीने सर्वाधिक महत्त्वाचा आहे असा या सर्वेक्षणाचा निष्कर्ष आहे. जवळजवळ ६३.१५ टक्के मतदारांनी वाढत्या भ्रष्टाचाराबाबत नापसंती व्यक्त केली आहे. बेकायदेशीर खाणी, शैक्षणिक माध्यम प्रश्न हे विषयही त्या खालोखाल महत्त्वाचे आहेत, असे मत या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या मतदारांनी व्यक्त केले. आलेले निष्कर्ष खरोखर मनोज्ञ आहेत. केपे, सांगेसारख्या तालुक्यातील खाण पट्‌ट्यातील मतदार हे बहुतांशी तेथील खाण व्यवसायावर अवलंबून असल्याने बेकायदा खाणींविरुद्ध भूमिका घ्यायला तयार नाहीत, पण खनिज वाहतुकीने पीडित इतर भागांतील मतदार मात्र फोफावलेल्या बेकायदा खाण व्यवसायावर नाराज आहेत असे चित्र या सर्वेक्षणातून पुढे आले. शैक्षणिक माध्यमाचा प्रश्न निवडणुकीवर काहीही परिणाम करणार नाही, असे सरकार ठासून सांगत असले तरी जनता शैक्षणिक माध्यमाच्या विषयावर संतप्त आहे, हेही हे सर्वेक्षण सांगते.

त्या तुलनेत प्रादेशिक आराखड्यातील फेरफारांचे गांभीर्य अजूनही आम जनतेला समजलेले नाही असे दिसून येते. काही भागांतील सेटलमेंट झोनवरून वादळ उठल्याने तेथील जनतेमध्ये त्याबाबत जागृती दिसली, तरी अनेक ठिकाणी जनता आराखड्यातील नियोजित बदलांबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून आले आहे. प्रत्येक भागातील स्थानिक मुद्देही त्या त्या मतदारसंघांमध्ये महत्त्वाचे ठरत असतात. त्याप्रमाणे मये मुक्तीचा प्रश्न मये मतदारसंघात, म्हादई अभयारण्य सीमानिश्‍चितीचा विषय वाळपई आणि पर्ये मतदारसंघात असे स्थानिक विषय निवडणुकीत वरचढ ठरतील असे संकेतही या सर्वेक्षणातून मिळाले आहेत. महागाईचा मुद्दा हा खरे तर या निवडणुकीत महत्त्वाचा ठरायला हवा होता, परंतु ‘रोजचे **, त्याला कोण रडे’ या उक्तीनुसार महागाईचा मुका मार निमूट सोसण्याची सवयच जणू मतदारांना लागलेली असल्याने त्या विषयाकडे त्यांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसले. येणार्‍या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भ्रष्टाचारापासून माध्यम प्रश्नापर्यंत अनेक विषय असे ऐरणीवर जरी असले, तरी प्रत्यक्ष मतदान करताना मतदारराजा गोव्याचे हित नजरेसमोर ठेवून मतदान करणार की केवळ स्वहित नजरेपुढे ठेवणार हा खरा लाखमोलाचा प्रश्न आहे. प्रत्येक निवडणुकीत मतदारांमध्ये कोणत्या ना कोणत्या विषयांवरून असंतोष असतो, परंतु दरवेळी तो मतांतून व्यक्त होतोच असे नसते. काहींचा स्वार्थ वरचढ ठरतो, काहीजण जातीपातींच्या हिशेबाला फशी पडतात, तर कित्येक जण आमिषांना आणि आश्वासनांना भुलून मते टाकत असतात. मतदारांची ही नस आता राजकारण्यांनीही पुरेपूर ओळखलेली आहे. कोणताही राजकीय पक्ष असो वा उमेदवार असो, मतदारांवर केवळ आश्वासनांची आणि आमिषांची खैरात ज्याने – त्याने चालवलेली आहे ती त्यामुळेच. आपल्या प्रदेशाच्या, देशाच्या हिताच्या व्यापक दृष्टिकोनापेक्षा वैयक्तिक हिताचा संकुचित दृष्टिकोन ठेवूनच मतदान केले जाते हे आपल्या भारतीय लोकशाहीचे खरे दुर्दैव आहे. मतदारांच्या जगण्या – मरण्याशी निगडीत विषयांपेक्षा नको नको ते भावनिक मुद्देच अशा निवडणुकांतून वरचढ ठरत असतात. येणार्‍या निवडणुकीत काय घडणार आहे त्याची चाहूल देणारे चित्र हळूहळू उलगडू लागले आहे. राजकीय साठमारी शिगेला पोहोचलेली आहे. युतीची गणिते दिवसेंदिवस गुंतागुंतीची बनू लागली आहेत. सत्तेसाठी स्वार्थ मोकाट सुटेल अशी चिन्हे आहेत. गोव्याच्या भवितव्याची चिंता सुजाण नागरिकांना सचिंत करू लागली आहे. काही ठराविक व्यक्तींच्या आणि त्यांच्या बगलबच्च्यांच्या हाती गोव्याची सत्ता एकवटणार का, येणार्‍या सरकारला अशी उपद्रवी मंडळी गेल्या वेळेसारखीच वेठीला धरणार आहेत का, गुळाच्या ढेपेला चिकटावे तसे ठराविक खात्यांना चिकटणार्‍या महाभागांना पुन्हा तीच फायद्याची खाती मिळणार आहेत का, प्रश्न अनेक आहेत आणि उत्तर केवळ मतदानयंत्रांमध्ये दडलेले आहे. मतदान ही केवढी मोठी जबाबदारी आहे याची जाणीव मतदारांना झाली आणि ते भान ठेवून मतदान झाले तरच काही चांगले घडेल. चांगली माणसे निवडली जातील.