पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठी रस्सीखेच चालू आहे, हे खरे आहे. त्यामुळे उमेदवार जाहीर करणे लांबणीवर टाकले आहे. दि. ४ फेब्रुवारीपर्यंत उमेदवार जाहीर केले जाईल. धोरणात्मक निर्णय म्हणून यावेळी विद्यमान आमदारही उमेदवार जाहीर करण्याचे टाळल्याचे ते म्हणाले.
उत्तर गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांना पर्वरी मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास पक्षश्रेष्ठींनी मान्यता दिलेली नाही. त्याचा पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही, असे पार्सेकर यांनी एका प्रश्नावर सांगितले.
नाईक भाजपचेच असून ते पक्षाचे सक्रीय नेते आहेत. त्यांना उमेदवारी न दिल्याने नाराज बनलेल्या कार्यकर्त्यांचे मन वळविल्याचे त्यांनी सांगितले.
भाजप – मगो युती रोखण्याचा प्रयत्न
मगो-भाजप युती रोखण्यासाठी कॉंग्रेसने जोरदार प्रयत्न चालविले असून या विषयावर रणनीती ठरविण्यासाठी कॉंग्रेसच्या राष्ट्रीय नेत्यांनी सल्लामसलतीसाठी उत्तर गोव्यातील एका बलाढ्य कॉंग्रेस नेत्याला दिल्लीत बोलावून घेतल्याचे कळते.
मिळालेल्या माहितीनुसार कॉंग्रेसच्या तीन विद्यमान आमदारांना उमेदवारी न देण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतल्याचे समजते. या प्रकारामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.