ग्रामस्थांनी साळ येथे एलइडी बल्ब वितरणाचा कार्यक्रम उधळला

0
97

>> नेहमीच्या वीज समस्येमुळे विरोध

 

डिचोली मतदारसंघातील साळ पंचायत क्षेत्रात काल आयोजित करण्यात आलेला एलईडी बल्ब वितरणाचा कार्यक्रम मेणकुरे व साळ येथील संतप्त नागरिकांनी गेल्या तीन दिवसांपासून वीज गायब असल्याचा मुद्दा उपस्थित करून उधळून लावला. सरकारचा कार्यक्रम असताना आमदार व जिल्हा पंचायत सदस्यांना आमंत्रण न दिल्याने कार्यक्रम करता येणार नाही असाही पवित्रा काही नागरिकांनी घेतल्याने मोठ्या संख्येने जमलेल्या नागरिकांना बल्ब वितरण कार्यक्रम रद्द झाल्याने खाली हात परतावे लागले.
गेले तीन चार दिवस धुमासे, साळ, मेणकुरे येथील वीज गायब झाल्याने नागरिक त्रस्त होते. परवा रात्री पहाटे ४ पर्यंत नागरिकांनी रात्र जागवली. वीज न आल्याने संतापलेल्या जिल्हा पंचायत सदस्य संजय शेट्ये यांनी अधिकार्‍यांना धारेवर धरले. पोलिसानाही पचारण करावे लागले होते. मात्र, वीज अधिकारी तिथे फिरकले नसल्याने मेणकुरेचे जिल्हा सदस्य व नागरिक संतप्त झाले होते.
काल सकाळी साळ गावात वीज खात्याने अभियंता बल्ब वितरण कार्यक्रमास आले असता त्यांना विरोध करण्यात आला. वीज गायब झाल्याने कुणीच लक्ष देत नाही. मात्र बल्ब कसले वाटता असा सवाल जिल्हा पंचायत सदस्य संजय शेट्ये नागरिकांनी विचारत अधिकार्‍यांना भंडावून सोडले. यावेळी पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. उपअधिक्षक रमेश गावकर यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कार्यक्रमाच्या ठिकाणी आलेले सभापती अनंत शेट यांनाही नागरिकानी वीज समस्या तसेच सरकारच्या कार्यक्रमात आमदार व जिल्हा सदस्यांना आमंत्रण दिले नसल्याचे लक्षात आणून दिले त्यासाठी नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करताना गुरुवारपर्यंत वीज मंत्र्यांनी भेट घेऊन देण्याचे आश्‍वासन दिले. मात्र, नागरिकांनी कार्यक्रम करण्यास विरोध केला. राजेश पाटणेकर, वल्लभ साळकर यानी जिल्हा सदस्य व नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु अखेर नागरिक निर्णयावर ठाम राहिल्याने कार्यक्रम रद्द करावा लागला.