पेडण्यातही काळे बावटे दाखवून मुख्यमंत्र्यांचा भाभासुमंकडून निषेध

0
105

केरी (पेडणे) पंचायतीत एलईडी बल्ब वितरणाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर जात असताना भाभासुमं, मांद्रे विभाग व पेडणे तालुका शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काळे बावटे व काळी टीशर्ट परिधान करून निदर्शने केली. काल सकाळी १० वा. केरी तेरेखोल पंचायतीत एलईडी बल्ब वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री येणार असल्याची चाहूल भाभासुमंच्या कार्यकर्त्यांना लागताच सकाळी ९.३० वा.च्या दरम्यान भाभासुमं मांद्रे विभागाचे कार्यकर्ते व शिवसेनेचे कार्यकर्ते केरी रवळनाथ मंदिराच्या समोरील रस्त्याच्या बाजूला जमा झाले.

यावेळी भाभासुमंचे कार्यकर्ते निदर्शने करणार असल्याचा सुगावा पोलिसांना लागताच पेडणेचे पोलीस निरीक्षक संजय दळवी फौजफाट्यासह दाखल झाले. त्यानी रस्त्यावर अडथळे निर्माण न करण्याचा सल्ला भाभासुमंच्या कार्यकर्त्यांना दिला. यानंतर १०.१५ च्या दरम्यान मुख्यमंत्री कार्यक्रमाला आले असता भाभासुमंच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करण्यास सुरवात केली. त्यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात काळे बावटे दाखवून घोषणा देऊन परिसर दुमदुमून सोडला. यावेळी भाभासुमं मांद्रे विभागाचे कार्यकर्ते विनायक च्यारी, स्वरुप नाईक, सुखानंद नाईक, महादेव कांबळी, शिवसेनेचे कार्यकर्ते तथा केरी तेरेखोल पंचायतीचे पंच सदस्य आनंद शिरगावकर, लक्ष्मण ओटवणेकर, मॉर्गन त्रावासो, सिध्दार्थ नागोजी, दिवाकर आरोलकर, साईदास नागोजी, निखिल गाड व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.