सहाराच्या ‘एमव्ही क्वींग’जहाजातून मोठ्या प्रमाणात तेल गळती

0
136

मुरगाव बंदरातील वेस्टर्न इंडिया शिपयार्डमध्ये सहारा इंडियाच्या ‘एमव्ही क्वींग’ या जहाजातून आता मोठ्या प्रमाणात तेल गळतीला सुरुवात झाली असून, भारतीय तटरक्षक दलाचे ‘समुद्र प्रहरी’ या जहाजाने या तेल गळतीमुळे पसरत असलेला तेलाचा तवंग इतरत्र समुद्रात पसरू नये म्हणून वेस्टर्न इंडियाच्या धक्क्यापासून काही अंतरावर सभोवताली संरक्षक ‘बूम फोम’ सोडून तेल गळती न पसरण्यासाठी कसोशीने प्रयत्न चालविले आहेत.

येथील वेस्टर्न इंडिया शिपयार्डमध्ये दुरुस्तीसाठी म्हणून आलेले आणि गेली अडीच वर्षे दुरुस्तीविना पडून राहिलेल्या सहारा इंडियाच्या ‘एमव्ही क्वींग’ या जहाजाच्या तळाला भगदाड पडल्याने चार दिवसांपूर्वी बुडताना वाचले
होते.
जहाज एका बाजूने कलंडून राहिल्याने या जहाजात असलेल्या इंधनाची गळती सुरू झाली होती. जेव्हा हे जहाज पूर्ववत आपल्या पूर्वस्थितीत उभे राहिले, त्यावेळी या जहाजात भरलेले पाणी छोट्या दोन दरवाजांतून वाहत बाहेर येऊ लागले. तेव्हा या पाण्यासह त्यातील तेल बाहेर येऊ लागल्याने इंधन गळती लागल्याचे सर्वांच्या लक्षात आले. याची माहिती एमपीटी भारतीय तटरक्षक दल आणि राज्य शासनाला मिळताच त्यांची भंबेरी उडाली. तेल समुद्रात पसरू नये म्हणून तातडीने उपाय योजना आखण्यास सुरूवात केली आहे. तसेच तटरक्षक दलाने खास प्रदूषण नियंत्रण राखणारी तसेच ‘बूम फोम’ द्वारे तेल गळतीवर नियंत्रण राखणारी नौका समुद्र प्रहरी मुंबईहून आणली आहे.
दरम्यान, काल ‘एमव्ही क्वींग’ या जहाजातून मोठ्या प्रमाणात तेल गळती दिसून आली. जहाजातून पाण्यासहीत तेलाचा थर मोठ्या प्रमाणात बाहेर येत असून या जहाजातून बाहेरून तेलाचा मोठा थर निर्माण झाला आहे. तसेच तेलामुळे पाण्याचा रंग एकदम काळा झाल्याचे दिसत आहे. या जहाजांतून पाण्याबरोबर आता आतील खूर्च्याही बाहेर फेकल्या जात असून त्या समुद्रात तरंगताना दिसतात. काल सकाळी हे एमपीटीच्या अधिकार्‍यांनी या जहाजाकडे येऊन पाहणी केली तेव्हा तेलगळती मोठ्या प्रमाणात होत असल्याचे त्यांना दृष्टीस पडले.
दरम्यान, आधी थकीत वेतन द्या नंतरच या जहाजातील इंधन उसपा करा असा पवित्रा घेतलेल्या वेस्टर्न इंडिया कामगारांची एमपीटीचे अध्यक्ष आय. जयकुमार यांनी कामगारांच्या शिष्टमंडळा समवेत पुन्हा एकदा बैठक घेऊन त्यांची मनधरणी केली. तसेच या तेल गळतीमुळे उद्भवणार्‍या परिस्थितीचे कथन करून त्यांना तेल उसपा कामाला अडथळा न आणण्याची विनंती केली. अखेर कामगारांनी आपला पवित्रा बदलून तेल उपसाला परवानगी दिली यामुळे वेळ न दवडता काल सकाळपासून तटरक्षक दलाच्या ‘समुद्र प्रहरी’ या जहाजाच्या मदतीने तेल गळतीवर नियंत्रण राखण्याचे काम सुरू करण्यात आले.