Home बातम्या युतीद्वारे नवसंजीवनी

युतीद्वारे नवसंजीवनी

0

निवडणूक आयोगाच्या मान्यतेच्या नव्या निकषांमुळे अस्तित्वाचे संकट उभे राहिलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षापुढे आता युतीशिवाय पर्याय उरलेला नाही. स्वतःची मतसंख्या निवडणूक आयोगाच्या निकषांना उतरवायची असेल तर युतीद्वारे अधिकाधिक जागा लढवूनच ती वाढवता येणे शक्य आहे. कॉंग्रेससोबत पाच वर्षे सत्तासोबत केल्यानंतर तो पक्ष सर्वांत भ्रष्टाचारी असल्याचा साक्षात्कार मगो नेत्यांना आता निवडणूक तोंडावर असताना घडला. पण असा साक्षात्कार घडूनही या मंडळींनी शेवटच्या क्षणापर्यंत कॉंग्रेसशी पुन्हा युती करण्यासंदर्भात बोलणी का सुरू ठेवली होती या प्रश्नाचे उत्तर कोण देणार? संधिसाधूपणा हेच मगो पक्षाचे तत्त्व उरले आहे की काय? या संधिसाधूपणानेच तर मगोचे अस्तित्व जवळजवळ संपवले. गोवा मुक्तीनंतर या प्रदेशाच्या जडणघडणीचा पाया ज्या पक्षाने आणि त्याच्या द्रष्ट्या नेत्यांनी रचला, त्या पक्षाची आधी कॉंग्रेसने आणि नंतर भाजपाने वाताहत केली. ही वाताहत करण्यात वरील दोन्ही पक्षांचा जेवढा वाटा होता, त्याहून अधिक पक्षातून वेळोवेळी फुटून निघालेल्या नेत्यांचा होता.

मगोच्या तिकिटावर निवडून यायचे आणि सत्तेच्या उगवत्या सूर्याला दंडवत घालत पक्षावर लाथ घालून बाहेर पडायचे या संधिसाधू वृत्तीने मगोला संपवले. पक्षाची मदार ज्या नेत्यांच्या हाती होती, त्यांची शक्ती पक्षावर स्वतःची पकड ठेवण्यातच खर्ची पडली. आता भाजपाशी हातमिळवणी करण्याच्या प्रयत्नात मगो आहे. भाजपाला कॉंग्रेसविरोधी मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी युती हवी आहे, परंतु मगोला ती स्वतःचे चिन्ह वाचवण्यासाठी होणे गरजेचे आहे. गेल्या पाच वर्षांत मगोची एकंदर कार्यपद्धती पाहिली तर ढवळीकर बंधूंनी पक्षाच्या वाढीसाठी काही केल्याचे दिसले नाही. वास्तविक गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्यामुळे पक्षाच्या मतांमध्ये वाढ दिसून आली होती. पक्षाला नवसंजीवनी देण्याचे त्यांनी मनात आणले असते सहज करू शकले असते. परंतु मगोने ना आपले पारंपरिक जनसमर्थन टिकवण्याचा प्रयत्न केला, ना पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याच्या दिशेने प्रयत्न केले. केवळ सत्तासुख उपभोगण्यालाच प्राधान्य दिले गेले आणि त्यासाठी शैक्षणिक माध्यमासारख्या महत्त्वाच्या प्रश्नांवर पक्षाच्या तात्त्विक भूमिकेशीही तडजोड होत राहिली. भाऊसाहेब बांदोडकरांची जन्मशताब्दी ही वास्तविक पक्षासाठी नवसंजीवनी मिळवण्याची फार मोठी संधी होती, पण ती वाया घालवली गेली. मगो आता भाजपाशी युतीसंदर्भात बोलणी करीत असला तरी स्वतःची विश्वासार्हता त्या पक्षाने पूर्णपणे घालवलेली आहे. उद्या निवडून आल्यानंतर नव्या समीकरणांत मगोचे नेते कोणत्या बाजूने राहतील याविषयी जनताच साशंक आहे. केवळ ढवळीकर बंधूंभोवतीच जर पक्ष केंद्रित राहणार असेल, तर गोव्याच्या राजकीय, सामाजिक इतिहासात मोलाची कामगिरी बजावलेल्या या बहुजनांच्या पक्षाच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह उभे राहील. राष्ट्रपती राजवट टाळण्यासाठीच आपण गेल्यावेळी कॉंग्रेसची साथ दिल्याचे मगोचे स्पष्टीकरण पटण्याजोगे नाही. सत्तेच्या हव्यासामुळेच नेत्यांनी मगोला कॉंग्रेसच्या दावणीस बांधले हे खरे वास्तव आहे. पक्षाची किंमत मोजून सत्ता उपभोगली खरी, परंतु आता त्याचा जाब मतदारांना द्यावाच लागणार आहे. भाजपापाशी दहा जागांचा प्रस्ताव मगोने दिलेला आहे, परंतु भाजपाने त्यांना दहा जागा का द्याव्यात? अशी कोणती कामगिरी मगोने केलेली आहे? असे स्वबळावर निवडून येऊ शकण्याजोगे किती प्रबळ उमेदवार पक्षापाशी आहेत? त्यामुळे भाजपा जर जागावाटपाबाबत ठाम राहिला तर मगोला आपल्या अपेक्षांना मुरड घालून निमूटपणे जेवढ्या जागा वाट्याला येतील तेवढ्यावर समाधान मानून राहावे लागेल, कारण शेवटी गरज त्यांना आहे. पक्षाचे ‘सिंह’ हे चिन्ह वाचवणे ही मगो नेत्यांची आजच्या घडीस मुख्य गरज आहे. पक्षाला ऊर्जितावस्था आणण्याचा काही कृतिकार्यक्रम मगो नेतृत्व आखणार आहे की नाही? की केवळ आगामी सत्तेत वाटेकरी होण्यापुरतेच स्वतःला सीमित ठेवले जाणार आहे? व्यक्तिकेंद्रित राजकारणात पक्ष संपला तर त्याहून मोठा अपराध नसेल. त्यामुळे युतीच्या संधीचे सोने करीत पक्षाला नवसंजीवनी देणेच हितकारक असेल.