गोव्यासारखा समान नागरी कायदा देशात का नसावा? – देशमुख

0
209

>>नवप्रभाच्या संपादकांना कै. बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार प्रदान

 

समान नागरी कायदा पूर्वीपासून गोव्यात आहे. या छोट्याशा राज्यात जर हा कायदा असू शकतो, तर या देशात तो का राबवला जाऊ शकत नाही? असा सवाल औरंगाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बी. एन. देशमुख यांनी काल आविष्कार फाऊंडेशन, कोल्हापूरतर्फे संस्कृती भवनच्या सभागृहात झालेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्यात केला. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. संजय पवार, प्रमुख पाहुणे व वरळी – मुंबईचे आमदार सुनील शिंदे, विशेष निमंत्रित औरंगाबादचे उद्योजक श्रीकांत शेळके, इंदूर, मध्य प्रदेश येथील विद्युत मंडळाचे तांत्रिक संचालक डॉ. मुरहरी केळे, स्वागताध्यक्ष एम. बी. शेख, संस्थेचे कार्याध्यक्ष सुनील पाटील, जिल्हाध्यक्ष दत्तात्रेय सूर्यवंशी, मानद संचालक गजानन जाधव, कायदा सल्लागार ऍड. सूर्यकांत कडाकणे आदी उपस्थित होते.
न्या. बी. एन. देशमुख यांच्या हस्ते जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून रोपट्याला पाणी घालून या कार्यक्रमाचे अनोख्या पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. या सोहळ्यात इंडियन रेड क्रॉसच्या गोवा शाखेचे अध्यक्ष गौरीश धोंड व प्रख्यात चकोते उद्योगसमूह, नांदणी – कोल्हापूरचे अध्यक्ष अण्णासाहेब चकोते यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दैनिक नवप्रभाचे संपादक श्री. परेश प्रभू यांना यावेळी कै. बाळशास्त्री जांभेकर स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गोव्यातील एक सेवाभावी डॉक्टर विनयकुमार रायकर यांना धन्वंतरी पुरस्काराने, तर गोव्याचे उद्योजक अनिल खंवटे यांना उद्योगश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. अन्य पुरस्कारांच्या मानकर्‍यांमध्ये पुण्याचे उद्योजक बाबासाहेब आतकिरे, औरंगाबादचे सेवाभावी डॉक्टर अमोल हावळे, जिल्हा परिषद, सिंधुदुर्गचे शिक्षणाधिकारी रत्नाकर धाकोरकर, कर्नाटक डोंगरी ग्रासीया संघटनेचे अध्यक्ष सुब्राव माळी – गोसावी, कुडाळचे गुणवंत शिक्षक श्यामसुंदर सावंत, पुण्याचे चार्टर्ड अकौंटंट भूषण शहा, गंभीर मुंदिनकेरी, प्रसिद्ध माईंड ट्रेनर विकास लोखंडे, आजर्‍याच्या उद्योजिका सौ. प्रतिमा परुळेकर, सोलापूरच्या गीताई प्रतिष्ठानच्या डॉ. विद्या एकतपुरे आदींचा समावेश होता.
न्यायमूर्ती श्री. देशमुख यांनी आपल्या भाषणात पुढे सांगितले की, समाजात नवे आदर्श शोधून त्यांना प्रकाशमान करण्यासाठी या पुरस्कारांचे महत्त्व आहे. असे सन्मान आपल्या देशाला पुढे घेऊन जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
वरळी – मुंबईचे शिवसेनेचे आमदार श्री. सुनील शिंदे म्हणाले, समाजातील रत्नांची पारख करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देणे हा या पुरस्कारांमागील संस्थेचा स्तुत्य हेतू आहे व हे पुरस्कार खर्‍या अर्थाने सुयोग्य व्यक्तींनाच दिले जातात.
आविष्कार फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री. संजय पवार यांनी स्वागत केले. स्वागताध्यक्ष एम. बी. शेख यांनी प्रास्ताविक केले. या सोहळ्याला गोव्याबरोबरच महाराष्ट्राच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने श्रोत्यांची उपस्थिती होती.
ह्रदयस्पर्शी मनोगतांनी उपस्थित हेलावले
पुरस्कार प्राप्त झालेल्यांची ह्रदयस्पर्शी मनोगते सर्वांनाच अंतर्मुख करून गेली. अनेक पुरस्कार विजेत्यांनी हलाखीच्या परिस्थितीत जिद्दीने फार मोठी झेप घेतल्याचे त्यातून जाणवल्याने उपस्थित हेलावले. आजकालच्या इतर पुरस्कारांप्रमाणे या पुरस्कारांसाठी अर्ज करावे लागत नाहीत, तर समाजातील विविध क्षेत्रांत चांगले काम करणार्‍यांना रत्नपारख्याच्या नजरेने हुडकून एका तटस्थ समितीद्वारे त्यांची विविध टप्प्यांत छाननी करून मगच अंतिम निवड केली जाते, त्यामुळे या पुरस्कारांचे महत्त्व असल्याची माहिती स्वागताध्यक्ष एम. बी. शेख यांनी आपल्या भाषणात दिली.