काल मान्सूनपूर्व पावसाने दोडामार्ग तालुक्याला तडाखा दिला. विजेच्या कडकडाटासह आलेल्या पावसावेळी मळेवाडी, वझरे येथील अनंत वासुदेव शिरोडकर यांच्या घराजवळ वीज पडल्याने चारजण जखमी झाले. संध्याकाळी साडेसातच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
घराजवळच विजेचा लोळ पडल्याने घरात ओट्यावर व दरवाजाजवळ बसलेले अनंत शिरोडकर, त्यांची पत्नी आनंदी, मुलगे वासुदेव व कृष्णा हे विजेच्या धक्क्याने बेशुद्ध पडले. शेजार्यांनी त्वरित धावपळ करून जखमींना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर १०८ रुग्णवाहिकेला बोलावून त्यांना तातडीने दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डॉक्टर भगवान पितळे यांनी सांगितले. दरम्यान, विजेचा लोळ पडल्याने शिरोडकर यांच्या घरातील वीज उपकरणांचेही नुकसान झाले आहे.