येत्या तीन – चार दिवसांत मोसमी पाऊस केरळमध्ये

0
76

मोसमी पावसाचे केरळमध्ये येत्या तीन – चार दिवसांत आगमन होईल अशी सुवार्ता हवामान खात्याने काल दिली. यंदा पाऊस पुरेशा प्रमाणात होईल याचा पुनरुच्चारही हवामान खात्याने केला आहे.

वायव्य भारतात यंदा सरासरीच्या १०८ टक्के पाऊस अपेक्षित असून मध्य भारत व दक्षिण भारतातही ११३ टक्के सरासरी पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याचे महासंचालक लक्ष्मणसिंह राठोड यांनी व्यक्त केला आहे.
भारतातील एकूण पावसाच्या सत्तर टक्के पाऊस हा नैऋत्य मोसमी पाऊस घेऊन येत असतो. देशातील २६ कोटी ३० लाख शेतकर्‍यांच्या दृष्टीने पावसाचे फार महत्त्व आहे. देशातील जवळजवळ अर्धी शेती केवळ पावसाच्या पाण्यावर चालते. भात, ऊस, मका, कापूस आणि सोयाबीन पिके त्यावर घेतली जातात.
पुरेशा प्रमाणात पाऊस झाल्यास त्याचा परिणाम नागरिकांच्या क्रयशक्तीवर होईल व सोने, वाहने, तसेच ग्राहकोपयोगी वस्तूंच्या खरेदीत वाढ होऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असा अंदाज अर्थतज्ज्ञ व्यक्त करीत आहेत.
गेली दोन वर्षे देशाच्या बहुतेक भागांत दुष्काळाची स्थिती असल्याने यंदा शेतकरी पावसाकडे डोळे लावून राहिले आहेत. गतवर्षी १० राज्यांनी दुष्काळ जाहीर केला होता व केंद्र सरकारने त्या शेतक़र्‍यांसाठी दहा हजार कोटींची आर्थिक मदत जाहीर केली होती.