फातराडे वार्का येथील केप्रिकॉन बार ऍण्ड रेस्टॉरंट या शॅकमध्ये बुधवारी पहाटे ‘जी फोर’ सुरक्षा कंपनीचा सुरक्षारक्षक राजीवकुमार (२५) याचा शॅक मालक व त्यातील चार कामगारांनी खून केल्याचा आरोप असून कोलवा पोलिसांनी शॅक मालक लुसियानो दुमिंग फुर्तादोसहीत चार कामगारांना अटक केली व मारहाणीसाठी वापरलेले सामान जप्त केले.
समुद्रकिनार्यावर लुसियाना फुर्तादो केप्रिकॉन बार ऍण्ड रेस्टॉरंट आहे. त्या शेजारी डब्ल्यू इन्व्हेंस्टमेंटची जमीन आहे. त्या जमिनीत पहारा ठेवण्यासाठी कंपनीने राजीवकुमार या बिहार येथील तरुणाची नियुक्ती केली होती व दुसरा फ्रान्सिस ब्रागांझा हाही सुरक्षा रक्षक होता. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पहाटे चार वाजता राजीवकुमार शॅकमधील सर्वजण झोपल्याचे पाहून शॅकमध्ये घुसला व टेबलाच्या खणाची किल्ली काढून चोरी करण्याच्या प्रयत्नात असताना मालक लुसियानोला जाग आली. तो तात्काळ उठून तेथे आला व राजीवकुमारला त्याने पकडले. त्यावेळी त्याच्यात झटापट चालू असता लुसियानोने राजीवकुमारच्या हातातील दंडूक काढून त्याच्याच डोक्यावर मारला. त्यावेळी गंभीर होऊन राजीवकुमार खाली कोसळला. त्याचवेळी शॅकमधील मिथून उद्धाम घरतीमगर, सागर धोतुराम (पुणे), रुपेश तितूर बहादूर बिका, रमेश पुलमगर (सर्व नेपाळ) हे शॅकमधील कर्मचारी तेथे आले व चौघांनी राजीवकुमारला बेदम मारहाण केली व झोपी गेले. सकाळी ७ वाजता कोलवा पोलिसांना मालकाने खबर देताच पोलिसांनी बेशुद्धावस्थेतील राजकुमारला हॉस्पिसियु इस्पितळात नेले असता तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर कोलवा पोलिसांनी तपास सुरू केला व पाचही जणांनी केलेल्या मारहाणीत त्याचा खून झाल्याचे प्रथमदर्शनी सिद्ध झाल्यावरून पोलीस अधीक्षक अरविंद गावस, उपअधीक्षक शांबा सावंत यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली व त्यानंतर मालकासह पाचजणांना अटक केली आहे. कोलवा पोलीस निरीक्षक देवेंद्र गाड तपास करीत आहेत.