Home बातम्या सांगेलीचा गिरोबा

सांगेलीचा गिरोबा

0

– लाडोजी परब

वेदकाळातील वाङ्‌मयात खेड्यांचे महत्त्व वर्णिले आहे. प्राचीन काळात खेडी गावांपेक्षाही महत्त्वाची मानली जात. वेदांमध्ये खेड्यांचा उल्लेख वारंवार आढळतो. इ. स. पूर्व चौथ्या व पाचव्या शतकातील बहुतांशी कथांत प्राचीन खेड्यांच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय जीवनाचे वर्णन आढळते. खेड्यांचा इतिहास अभंग आहे, तसेच येथील चालीरीती आणि परंपरेच्या वाटा कलात्मक आणि अद्भुत, अगम्य संस्कृतीच्या दिशेने जातात. काही परंपरा अशा आहेत की त्याची उत्तरेही सापडत नाहीत. त्याला अंध:श्रद्धाही म्हणू शकत नाही. कारण त्यातून निर्माण होणार्‍या परिणामांचे दाखले वेळोवेळी मिळतात. ग्रामीण भाग रूढी, परंपरांनी जखडलाय ही बाब काही अंशी खरी असली तरी त्या संस्कृतीतून संस्कारांचे बीज गावागावांत पेरले गेले आहे. तिथे अद्भुतता आहे. अगम्यता आहे. आणि समाजमन त्या घटनांशी बांधील आहे. अशाच काही घटना आणि संस्कृतीशी नाळ असलेल्या गोष्टींची या सदराद्वारे ओळख करून देत आहोत.

कोकणातील मंदिरे म्हणजे तेथील जनतेची भक्ती आणि भावनांशी जोडलेला जिव्हाळ्याचा संबंध! प्रत्येक देवस्थानात वैविध्यता आहे. गूढता आहे. ती गूढता विज्ञानाच्या दुर्बिणीतून शोधणेही शक्य नाही. कलियुगात ‘चमत्कार’ होत नाहीत, पण या गूढतेलाच ‘नमस्कार’ केल्यावाचून पर्याय नाही. कोकणातील देवस्थाने तेथील स्थानिक लोकांच्या भावनेशी आणि श्रद्धेशी निगडीत असल्याने त्या श्रद्धेवरच वर्षानुवर्षे लोक जगत आले आहेत. श्रद्धा डोळस असावी, असा सल्ला तज्ज्ञ देतात. पण या श्रद्धेतून चांगलेच होणार असेल तर ती श्रद्धा बाळगण्यामागे गैर काय? अंगारा, लिंबू, टाचणी, बळी देण्यासाठी कोंबडे या गोष्टी गैर मानणे साहजिकच आहे. अशा गोष्टींसाठी अंध:श्रद्धा निर्मूलन समितीने कडाडून विरोध केला आहे. गावातील उत्सव हे देवस्थानांशी निगडीत असतात. उत्सवांतून अनेक धार्मिक, सामाजिक हितसंबंध दृढ होतात. या हितसंबंधांमुळे गावातील एकोपा आजही टिकून आहे. हा एकोपा निर्माण होण्यामागे गावची श्रद्धास्थाने आणि तेथील परंपरा यांचा घनिष्ठ संबंध आहे.

सावंतवाडी तालुक्यातील सांगेली गाव! दरवर्षी गिरोबाचे पाषाण (फणसाच्या झाडाच्या खोडापासून बनवलेले) भाविकांकडून तयार केले जाते. नवीन पाषाण प्रतिष्ठापित केल्यानंतर जुने पाषाण विशिष्ट तटबंदीच्या ठिकाणी ठेवले जाते. कित्येक वर्षे येथे पाषाण ठेवले जाते. पण भाविकांना २१ पाषाणांचेच दर्शन घडते. एक पाषाण दरवर्षी काशिला जाते, ही लोकांची भावना आहे. मग २१ पाषाणांची २२ पाषाणे कधीच होत नाहीत, हे गूढ म्हणजे येथील दैवी चमत्कारच नसावा काय?

सांगेलीचा गिरोबा म्हणजे भाविकांच्या श्रद्धेचे अढळ स्थान. येथे होळीचा उत्सव म्हणजे भाविकांसाठी दिवाळीच! महाराष्ट्रात होळीचा सण हा पौर्णिमेदिवशी साजरा होतो. पण सांगेलीत गिरोबा उत्सवापासूनच हा उत्सव सुरू होतो. आठ दिवस हा उत्सव असतो. कित्येक दशके ही परंपरा सुरू आहे. गांगोबा, शिदोबा, भटसाखर, खांबोबा अशी देवस्थाने गिरोबाचे भाऊ समजले जातात. गिरोबाच्या मंदिरात पोहोचल्यावर गिरोबा मंदिराच्या वैशिष्ट्यपूर्ण सागवानी लाकडी घुमटाचे दर्शन होते. भाविकांची असणारी गर्दी आणि तेथे असणारे भक्तिमय वातावरण या देवस्थानच्या महतीचे दर्शन घडवते. गिरोबा हा शुद्ध शाकाहारी देव आहे, तर खुटोबाच्या चाळ्यासाठी कोंबड्यांचा बळी देण्याची येथे परंपरा आहे. विशेष म्हणजे कौलप्रसाद घेण्यासाठी लागणारे तांदूळ मंदिरातच भातापासून तयार केले जातात. महाशिवरात्रीला सांगेलीचे मानकरी देवाचा कौल घेतात. आणि येथे असणार्‍या पाच ते सहा वाड्यातून फणसाचे झाड निवडतात. मग या झाडाच्या ठिकाणी कौल लावला जातो. देव अवसार झाड योग्य असल्याचा कौल देतो. त्यानंतर हे झाड नवीन गिरोबा असे ओळखले जाते. या झाडाची मालकी ज्याची आहे, तो वर्षभर पुढच्या गिरोबा उत्सवापर्यंत पूजा, अर्चा करतो. तो त्याचा मान असतो. ज्या वाड्यात पूजा होते, तेथेच नवस बोलले जातात. भजन, कीर्तन असतेच. होळी सणाच्या आदल्या दिवशी सांगेली येथे असलेल्या गिरीजानाथ मंदिरात पुजलेले फणसाचे झाड सकाळी मंदिराच्या गाभार्‍यातून काढले जाते. त्यासाठी गाभार्‍यावरील छप्पर काढले जाते. दरवर्षी तशी व्यवस्था असते. छप्पर काढून दरवर्षी देवाची प्रतिष्ठापना करणारे हे कोकणातील एकमेव गाव असेल. जवळपास सात फूट खोल खड्‌ड्यात फणसाचे खोड ठेवले जाते. नवीन गिरोबाची स्थापना ढोल ताशांच्या गजरात होते. झाड तोडल्यानंतर ते गुळगुळीत करण्यासाठी सुतार मंडळी येतात. गिरोबाची एक साल काढावयास मिळाली तरी हे पुण्य असते, अशी श्रद्धा आहे. रात्रौ उशिरापर्यंत साधारणत: दोन ते तीन कि. मी. जमिनीला खोड न लावता अलगद भक्तगण उचलून आणतात. त्यानंतर प्रतिष्ठापना होते. आणि वर्षभरासाठी गिरोबा स्थानापन्न होतो. उत्सवादिवशी येथे येणार्‍या प्रत्येक भक्तांना शिरवळ्या देण्याची प्रथा आहे. विशेष म्हणजे या गावाचा देव फणसापासून बनलेला असल्याने कुणीही ग्रामस्थ फणसाचे झाड विकत नाहीत. उलट आपल्याकडे देव आहे, असे समजून झाडांचे जतन होते. देवाप्रती असणारी ही श्रद्धाच गावची एक वेगळी संस्कृती बनून राहिली आहे. सावंतवाडीपासून अवघ्या १२ कि. मी. अंतरावर हे गाव वसले आहे. निसर्गरम्य परिसर आणि घनदाट वृक्षांच्या सावलीत विसावलेल्या गिरोबाचे दर्शन घेण्यासाठी एकदा अवश्य या स्थळास भेट द्यावयास हरकत नाही.