केरी येथे स्कूटर घसरून चालक ठार
केरी-साखळी रस्त्यावर स्कूटर घसरून पडल्याने घोटेली क्र. २ येथील स्कूटरचालक लक्ष्मण कृष्ण गावस (५५) यांचा मृत्यू झाला. त्यांची मुलगी प्रतिमा लक्ष्मण गावस (२२) जखमी झाली.
वाळपई पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे लक्ष्मण सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पणजी येथे कामाला जाण्यासाठी जीए ०४ डी ३७८१ या डिओ स्कूटरने निघाले होते. गाडीच्या मागच्या सीटवर त्यांची मुलगी प्रतिमा बसली होती. मोर्ले येथे त्याची स्कूटर घसरली व रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला जाऊन आपटली. त्यात लक्ष्मण यांच्या डोक्याला जबर मार बसला. त्यानंतर त्याला १०८ रुग्णवाहिकेने साखळी शासकीय रुग्णालयात आणले व पुढील उपचारासाठी गोमेकॉ बांबोळी येथे घेऊन जात असताना वाटेत त्याचे निधन झाले.
दरम्यान, प्रतिमाला प्राथमिक उपचारानंतर घरी जाऊ दिले. घटनेचा पंचनामा वाळपई पोलीस स्थानकाचे निरीक्षक हरिष मडकईकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक चंद्रकांत नाईक यांनी केला. मयत लक्ष्मण हा पणजीत लष्कर इस्पितळात कामाला होता. तो दररोज स्कूटरने कामाला जायचा.
नावेलीत ट्रकची मोटरसायकलला धडक
मंगळवार दि. ३ रोजी नावेली डिचोली येथे झालेल्या ट्रक व मोटारसायकलच्या भीषण अपघातात मोटारसायकलच्या मागे बसलेला २२ वर्षीय युवक जागीच ठार तर मोटारसायकल स्वार गंभीर जखमी झाला आहे.
डिचोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोटारसायकल चालक मोहसीन मुल्ला (२५) साखळी व नासीर खान (२२) हे मणीपूर येथील दोघे युवक आमोण्याहून जीए-०५-टी-११०६ या क्रमांकाच्या मोटारसायकलवरून साखळीच्या दिशेने संध्या. ७.३० वा. जात होते. त्यावेळी जीए ०४-ब-८२०३ या मागोमाग येणार्या ट्रकने त्यांना नावेली येथे एका वळणावर मागून धडक दिल्याने मोटारसायकलच्या मागे बसलेला नासीर खान हा युवक जागीच ठार झाला तर मोटारसायकल चालक (२५) मोहसीन मुल्ला हा साखळी येथील युवक गंभीर जखमी झाला.
जखमीला म्हापसा येथील आझिलो इस्पितळात दाखल करण्यात आले असून मयत नासीर खान या युवकाचा मृतदेह बांबोळी येथे शवागरात ठेवण्यात आला आहे.
पंचनामा डिचोली पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक तुकाराम वाळके यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली केला असून ट्रक चालक दशरथ गोस्वामी (झारखंड ओरिसा) यास अटक करण्यात आले आहे. उपनिरीक्षक तुकाराम वाळके पुढील तपास करीत आहेत.
उसगाव ट्रक-स्कूटरची समोरासमोर टक्कर
उसगाव-तिस्क येथे हमरस्त्यावर पोलीस आऊट पोस्ट नजीक काल दुपारी ३.१५ वाजता जीए ०१ यू २७३८ नंबरचा खनिजवाहू टिप्पर ट्रक व जीए ०४ बी ९५९३ नंबरची डिओ स्कूटर यांची समोरासमोर टक्कर झाल्याने स्कूटरच्या मागे बसलेला प्रशांत गोकुळदास राणे (१८) हा युवक रस्त्यावर उसळून पडल्याने त्याचे जागच्या जागी निधन झाले.
स्कूटर चालक शंकर राणे हा जखमी झाला. इस्पितळात नेले असता प्रशांत राणे याला मृत घोषित करण्यात आले व जखमीवर उपचार केला. फोंडा पोलीस स्टेशनचे निरीक्षक सिद्धांत शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शामराव देसाई यांनी अपघाताचा पंचनामा केला. मृतदेहाचा पंचनामा उपनिरीक्षक दीपक पेडणेकर यांनी करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोमेकॉत पाठवला.
ट्रकचालक महमंद सलामत शेख मूळ राहणार बिहर याला ट्रकसह ताब्यात घेण्यात आले. खनिजवाहू ट्रक सुर्लमार्गे जात होता तर स्कूटर विरुद्ध दिशेने येत होती. पुढील चौकशी दीपक पेडणेकर करत आहे.