सुरक्षा रक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न
कामावरून कमी केल्यामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून येथील आझाद मैदानावर धरणे धरणार्या सुरक्षा रक्षकांना काल तेथून हलवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केल्यानंतर काल दुपारी तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी भावनाविवश झालेल्या शाबी पेडणेकर या सुरक्षा रक्षकाने गोळ्या घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असता तणावात भर पडली. मात्र, पणजी पोलिसांनी त्यापूर्वीच पेडणेकर याला ताब्यात घेतल्याने संभाव्य अनर्थ टळला. संघर्षानंतर नमते घेत आंदोलकांनी आझाद मैदान सोडले.कामावरून काढून टाकलेले सुरक्षारक्षक व १०८ या रुग्णवाहिका कर्मचारी आझाद मैदानावर गेल्या कित्येक दिवसांपासून धरणे धरत होते. मात्र, पणजी शिगमोत्सव समितीला तेथे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करायचे असल्याने तेथे धरणे धरणार्या वरील या कर्मचार्यांना तेथून हलवण्यासाठी काल मोठा पोलीस फौजफाटा पाठवण्यात आला असता तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले.
उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक उमेश गावकर, उपअधीक्षक सेराफीन डायस यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा आझाद मैदानावर आला असता सुरक्षा रक्षकानी जागा सोडण्यास नकार दिला. तर १०८ च्या कर्मचार्यांनी मात्र जास्त आढेवेढे न घेता तेथून जाण्याची तयारी दाखवली आणि सुरक्षा रक्षकांनी आपल्या नेत्यांसह यावेळी पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरवात केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. महिला पोलिसांनी यावेळी धरणे धरलेल्या काही महिलांना तेथून हलवण्याचा प्रयत्न केला असता किरकोळ धक्काबुक्कीचाही प्रकार घडला. पोलिसांनी यावेळी त्यांना १७ मार्चपर्यंत आझाद मैदानावर बसता येईल, असे सांगून त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. शेवटी नमते घेत त्यांनी आझाद मैदानावरून कांपाल फुटबॉल मैदानापर्यंत निषेध फेरी काढली. तसेच १७ मार्चपर्यंत कांपाल मैदानावर धरणे धरण्याचा निर्णय घेतला. यावेळी या सुरक्षा रक्षकांबरोबर त्यांचे नेते अजितसिंह राणे व स्वाती केरकर हजर होत्या.