वेळकाढूपणामुळेच कॉंग्रेसची वाताहत!

0
140

– गुरुदास सावळ

कॉंग्रेसश्रेष्ठींचे निरीक्षक चेल्लाकुमार यांना जाहीर आव्हान देणारे सांताक्रूझचे कॉंग्रेस आमदार बाबूश मोन्सेरात यांची कॉंग्रेसमधून हकालपट्टी करण्याचा निर्णय गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीने घेऊन आता महिना उलटला तरी बाबूश अजून कॉंग्रेसमध्येच आहेत. बाबूश यांची हकालपट्टी धसास लावण्यासाठी फालेरो स्वतः दिल्लीला जाऊन आले; मात्र बाबूश यांचे कोणीच काही वाकडे करू शकलेला नाही. कॉंग्रेसच्या या वेळकाढू धोरणामुळेच पक्षाची पुरी वाताहत झालेली आहे. याच पद्धतीने कॉंग्रेसचा कारभार चालू राहिला तर कॉंग्रेसचे पुनरुज्जीवन होण्याची सुतराम शक्यता दिसत नाही.गोवा मुक्तीनंतर गोमंतकीय जनतेने कॉंग्रेसला साफ झिडकारले होते. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासारखे उत्तुंग नेतृत्व कॉंग्रेसकडे असताना गोमंतकीय जनतेने कॉंग्रेसला नाकारले. त्यानंतर तब्बल सतरा वर्षे मगोने गोव्यावर राज्य केले. युगो पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन झाल्यावरच गोव्यात कॉंग्रेसला सत्ता काबीज करता आली. त्यानंतर मगोचे महत्त्व कमी होत गेले आणि भाजपा वाढत गेला. २०१२ च्या निवडणुकीत कॉंग्रेसचे पानिपत झाले आणि भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले. चर्चिल आलेमांव, बाबूश मोन्सेरात यांच्यासारख्या नेत्यांनी कॉंग्रेसची पुरती बदनामी करून टाकली. दिगंबर कामत मुख्यमंत्री असताना भ्रष्टाचाराचा कळस झाला. त्यामुळे चर्चने आपली मते एकगट्ठा भाजपाच्या झोळीत टाकली. त्यामुळेच हा चमत्कार घडू शकला. भाजपा सरकारकडून लोकांच्या फार मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र खाणबंदी न उठल्याने गोवा सरकारच्या महसुलावर फार मोठा परिणाम झाला आणि लोकांचा अपेक्षाभंग झाला. केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी कितीही आश्‍वासने दिली तरी गोव्यातील खाणी चालू हंगामात सुरू होण्याची शक्यता दिसत नाही. त्यामुळे कळत-नकळत लोकांच्या मनात भाजपाविरोधी वातावरण तयार होऊ लागले आहे, हे भाजपा नेत्यांनाही मान्य करावेच लागेल. भाजपाविरोधी वातावरण निर्माण झाले तरी त्याचा लाभ कॉंग्रेसला मिळणार नाही, कारण बाबूश यांची हकालपट्टी करण्याची घोषणा होऊनही कोणतीच कारवाई होत नाही. लुईझिन फालेरो दिल्लीला जाऊन आले तरी अजून बाबूश कॉंग्रेसमध्येच आहेत. त्यामुळे कॉंग्रेसबद्दल नकारात्मक भूमिका वाढत चालली आहे.
कॉंग्रेसच्या नाकर्तेपणाचा लाभ मगोला मिळत आहे. दीपक ढवळीकर यांचे सहकार खाते काढून घेतल्याने मगोला सहानुभूती मिळाली. भाजपाचा विरोध असतानाही मगोने सदस्य नोंदणी मोहीम चालूच ठेवली. गेल्या विधानसभा निवडणुकीत मगोच्या वाट्याला आलेल्या सर्व मतदारसंघांत मगोने सध्या सदस्यनोंदणीची मोहीम उघडली आहे. दाबोळी मतदारसंघाचे कॉंग्रेस आमदार मॉविन गुदिन्हो यांनी भाजपाशी जवळीक सुरू करताच मगोने त्यांना कडाडून विरोध केला. २०१२ विधानसभा निवडणुकीत ही जागा मगोला सोडली होती, त्यामुळे ही जागा मगोलाच मिळायला हवी असा आग्रह मगोने धरला. त्यामुळे मॉविन यांचा भाजपा प्रवेशाचा बेत रहीत झाला. अन्यथा, एव्हाना मॉविन भाजपाचे आमदार आणि मंत्रीही बनले असते. माविन आगामी निवडणूक कुठ्ठाळी मतदारसंघातून लढविणार हे स्पष्ट झाले आहे. माथानी साल्ढाणा यांच्या आकस्मिक निधनामुळे त्यांच्या पत्नी श्रीमती अलिना यांना भाजपाने तिकीट दिले. मॉविननी मदत केल्याने श्रीमती साल्ढाणा बिनविरोध निवडून येऊन मंत्रीही बनल्या. मात्र कुठ्ठाळीतील मूळ भाजपा कार्यकर्ते किंवा भाजपा नेत्यांशी त्या एकरूप होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे सांकवाळ मतदारसंघ मगोला देण्यात आला, हे उघड आहे. भाजपा नेते आपल्याला सतावत असल्याचा आरोप श्रीमती साल्ढाणा यांनी केला आहे. दोन वर्षांनी होणार्‍या विधानसभा निवडणुकीत श्रीमती अलिना साल्ढाणा यांना भाजपाने तिकीट नाकारले तर आश्‍चर्य वाटायला नको.
जिल्हा पंचायत निवडणुकीत युती नको अशी भूमिका भाजपाच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी घेतली होती. त्यामुळे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी राजकीय डावपेच आखून भाजपा, मगो आणि गोवा विकास पार्टीची युती केली. त्याशिवाय आवेर्तान फुर्ताद आणि बेंजामिन सिल्वा यांनाही या युतीत सामील करून घेतले. मिकी पाशेको यांनी गोवा विकास पार्टीतर्फे उभ्या केलेल्या उमेदवाराला कायतू सिल्वानी विरोध केलेला असला तरी सासष्टीत कॉंग्रेस विरोधकच बाजी मारू शकतात. फोंडा तालुक्यात मगोचे तीन आमदार असल्याने मगोला जास्त जागा मिळाल्या आहेत. सांगे, केपे, धारबांदोडा व काणकोण तालुक्यात भाजपा उमेदवार बाजी मारणार का याकडे लोकांचे लक्ष आहे. त्यामुळे युतीचा परिणाम दक्षिण गोव्यात किती दिसेल हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
जिल्हा पंचायत निवडणूक पक्षीय पातळीवर लढविण्याचा निर्णय भाजपा सरकारने घेतल्याने कॉंग्रेस त्याला विरोध करत आहे. देशातील बहुतेक सर्व राज्यांत जिल्हा पंचायत व ग्रामपंचायत निवडणुकाही पक्षीय पातळीवर घेण्यात येतात. कॉंग्रेस सरकारनेच हे कायदे केलेले आहेत. त्यामुळे पक्षीय पातळीवर निवडणूक लढविण्यास विरोध करण्याचा कॉंग्रेसला कायदेशीर तसेच नैतिकही अधिकार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांत राजकीय पक्षांचा धुडगूस नको म्हणून मगो पक्षाने हा कायदा आणला होता. पहिल्या निवडणुकीत गोव्यात कॉंग्रेस सत्तेवर आली असती तर इतर राज्यांत लागू असलेले कायदेच गोव्यात लागू झाले असते. पहिली निवडणूकच पक्षीय पातळीवर झाली असती. त्यामुळे पक्षीय पातळीवर निवडणूक लढविण्यास विरोध करण्याचा कोणताही अधिकार कॉंग्रेसला नाही. १८ मार्चला होणार्‍या जिल्हा पंचायत निवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार निवडून येण्याची शक्यता नसल्याने ही निवडणूक न लढविण्याचा निर्णय पक्षाने घेतला. कॉंग्रेसचे बहुतेक उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. ते निवडून आले तर आमचे अमुक उमेदवार निवडून आल्याचे जाहीर करून प्रदेश कॉंग्रेस त्याचे श्रेय घेणार आहे. त्यांचे उमेदवार पराभूत झाले तर आमचे उमेदवारच नव्हते, त्यामुळे पराभव होण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही असा दावा करायला कॉंग्रेस नेते मोकळे आहेत.
लुईझिन फालेरो यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाली तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी सगळे आमदार आणि प्रमुख नेते जमले होते. सर्व कॉंग्रेसजन संघटित होऊन पक्षबांधणीचे काम करतील अशी अपेक्षा होती. स्वागतसोहळा आटोपल्यानंतर हे नेते परत फिरकलेच नाहीत. बाबूशनी तर केवळ स्थानिक नेतेच नव्हे तर चेल्लाकुमार आणि दिग्विजय सिंग यांनाही आव्हान दिले. त्यामुळे पोटनिवडणुकीत कॉंग्रेस उमेदवाराचा दारूण पराभव झाला. कॉंग्रेस नेत्यांनी प्रामाणिकपणे काम केले नाही. सर्व ज्येष्ठ नेते केवळ छायाचित्र काढण्यापुरतेच प्रचाराला फिरले. मतांसाठी लोकांच्या घरात फिरण्याचे काम सुरेंद्र फुर्ताद यांनीच केले. त्यामुळे त्यांची मते वाढली नाहीत. कॉंग्रेस पक्षात अंतर्गत धुसफूस ही नेहमीच असायची. १९८० मध्ये कॉंग्रेस सत्तेवर आली तेव्हा डॉ. विली डिसौझा यांना मुख्यमंत्री व्हायचे होते. मात्र मडगावचे आमदार बाबू नायक यांनी अशा पद्धतीने फासे टाकले की प्रतापसिंह राणे मुख्यमंत्री बनले. राणे यांना हटवून आपण मुख्यमंत्री बनण्यासाठी डॉ. विलींनी तब्बल तीन वर्षे कारवाया केल्या, मात्र त्यांना यश आले नाही. डॉ. विलीनी आपल्या कारवाया गुप्तपणे चालू ठेवल्या, मात्र श्रेष्ठींवर कधी आरोप केले नाहीत. कधी आव्हान दिले नाही. ३० पैकी २७ आमदार डॉ. विलींकडे असूनही मुख्यमंत्रिपद मिळत नाही हे स्पष्ट झाल्यावर त्यांनी कॉंग्रेसचा राजीनामा देऊन गोवा कॉंग्रेस हा स्वतःचा नवा पक्ष काढला. मात्र जनतेने त्यांना झिडकारले.
१९८० मध्ये सुरू झालेली ही गटबाजी आजही चालू आहे. मात्र कोणत्याच नेत्याने कॉंग्रेस पक्षाला कधी आव्हान दिले नव्हते. कॉंग्रेसने चर्चिल आलेमांव, फ्रान्सिस सार्दिन, मॉविन गुदिन्हो, दयानंद नार्वेकर आदी बड्या नेत्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली आणि मोठ्या मानाने त्यांना परत पक्षात घेतले. बाबूश यांनी कॉंग्रेसच्या विरोधात तीनदा बंड केले आणि प्रत्येक खेपेला कॉंग्रेसने त्याना माफ करून पक्षात परत घेतले आणि मंत्रिपद बहाल केले. सत्ता टिकविण्यासाठी कॉंग्रेसने ही लाचारी पत्करली. बाबूश यांच्यावर कारवाई करण्यास कॉंग्रेस घाबरत आहे. गोवा प्रदेश कॉंग्रेसने एकमताने निर्णय घेऊनही बाबूश यांची हकालपट्टी होत नाही. कॉंग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांच्याशी निकटचे संबंध असलेले लुईझिन फालेरो हे प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष असूनही बाबूश यांच्यावर कारवाई होत नाही. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी सध्या सुट्टी प्रकरणात गुंतलेले असले तरी बाबूश यांची हकालपट्टी करण्यास त्यांना वेळ नाही ही गोष्ट मनाला न पटणारी आहे. बुडत्याचा पाय खोलात अशीच परिस्थिती सध्या कॉंग्रेसची झाली आहे हे खरे.