संशयित आरोपीला अटक
सडा-वास्को येथे एका १० वर्षीय शाळकरी मुलीवर बलात्काराची घटना घडली असून याप्रकरणी मुरगाव पोलिसांनी मूळ वेंगुर्ला येथील आणि सध्या सडा येथे राहणार्या मंगेश वाडेकर या तरुणाला अटक केली आहे.मुरगाव पोलीस निरीक्षक कपिल नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, बलात्काराची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. दुर्दैवी १० वर्षीय शाळकरी मुलगी संशयित मंगेश वाडेकर यांच्या शेजारीच राहते. दोन दिवसांपूर्वी मंगेशने तिला आपल्या घरी बोलावून घेऊन तिच्यावर अत्याचार केले. हा प्रकार कुणाला सांगितल्यास जीवंत मारण्याची धमकीही संशयिताने पीडित मुलीला दिली. तथापि, अत्याचार घडूनसुध्दा त्या मुलीने घाबरून घरच्या लोकांना काहीच सांगितले नाही पण काल संध्याकाळी उशिरा तिच्या पोटात दुखू लागल्याने तिने घडलेला प्रकार आपल्या वडिलांना कथन केला. संबंधित मुलीच्या वडिलांनी या घटनेची माहिती शेजार्यांना दिल्यावर, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुरगांव पोलिसांत तक्रार नोंदविण्याचा सल्ला शेजार्यांनी मुलीच्या वडिलांना दिला.
त्यानुसार काल रात्री उशिरा मुरगाव पोलिसांत तक्रार दाखल झाल्यावर पीडीत मुलीला तपासणीसाठी इस्पितळात दाखल केले असता तिच्यावर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले. मुरगांव पोलिसांनी भादंसं ३७६ कलमाखाली गुन्हा नोंद केला. तसेच त्या मुलीला जीवंत मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी भादंसं ५०६ कलमाखाली आणखी एक गुन्हा संशयितावर नोंदवून त्याला गजाआड केले. याप्रकरणी पुढील तपास निरीक्षक कपिल नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.