‘आयटीबी बर्लीन- २०१५’ महोत्सवात पुरस्कार
बर्लीन येथील ‘आयटीबी बर्लीन- २०१५’ या आंतरराष्ट्रीय पर्यटन महोत्सवात गोव्याला विवाह व मधुचंद्र यासाठी उत्कृष्ट स्थळ म्हणून जागतिक पुरस्कार प्राप्त झाला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या प्रवास संघटनेचे महासचिव तालेब रिफाई यांच्या हस्ते गोवा पर्यटन विकास महामंडळाचे संचालक निखिल देसाई यांनी हा पुरस्कार बर्लीन येथे स्वीकारला. पॅसिफिक ट्रॅव्हल रायटर्स असोसिएशनतर्फे हा पुरस्कार दिला जातो.बार्लीन येथे सुरू असलेल्या पर्यटन महोत्सवात गोव्यासह भारतातील १८ राज्यांनी भाग घेतला आहे. गोव्याने या महोत्सवात सुंदर असे स्टॉल उभारले असून त्यातून गोव्याची संस्कृती, खाद्यसंस्कृती, साहसी पर्यटन, पर्यावरण पर्यटन व विशेष महोत्सव याचे सुरेख दर्शन घडवण्यात आले आहे. गोव्याला हा पुरस्कार प्राप्त झाल्याने आपणाला अतिव आनंद झाला असल्याचे पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर यांनी प्रतिक्रीया व्यक्त करताना म्हटले आहे. हा पुरस्कार अत्यंत प्रतिष्ठेचा असा आहे. या पुरस्कारामुळे गोवा हे श्रीमंतांची लग्ने व मधुचंद्र यासाठीचे उत्कृष्ट असे स्थळ आहे, यावर शिक्कामोर्तब झाल्याचे मंत्री परुळेकर म्हणाले. आयटीबी बर्लीनमध्ये आम्ही यशस्वीपणे सहभागी झालो, असे सांगतानाच आता मिळालेल्या पुरस्कारामुळे गोव्याच्या पर्यटनाला चालना मिळू शकेल, असा विश्वास परुळेकर यांनी व्यक्त केला. आपण पर्यटनमंत्री म्हणून सुत्रे हातात घेतल्यापासून पर्यटन क्षेत्रात गोव्याला चांगले यश मिळाले हे सांगण्यास आपणाला अभिमान वाटत असल्याचे ते म्हणाले. गोवा पर्यटन विकास महामंडळाचे चेअरमन नीलेश काब्राल यांनीही गोव्याला वरील पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ‘नॅशनल जोगरॉफिक’ या चॅनलने हल्लीच गोव्याला जगातील सहावे उत्कृष्ट ‘नाईट लाईफ डेस्टिनेशन’ हे प्रमाणपत्र दिले होते. त्या पाठोपाठ आता हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे, असे काब्राल म्हणाले. या पुरस्कारामुळे गोव्याच्या पर्यटनाला चालना मिळणार असल्याचे ते म्हणाले. पर्यटन संचालक अमेय अभ्यंकर म्हणाले की गोव्याला मिळालेला हा पुरस्कार अत्यंत प्रतिष्ठेचा असा आहे. गोव्याला विवाह व मधुचंद्रासाठीचे स्थळ म्हणून चालना देण्यासाठी आम्ही जे प्रयत्न केले होते; त्या प्रयत्नांना यश आल्याचे या पुरस्कारामुळे स्पष्ट होत आहे. या महोत्सवात भारतातील जी अन्य राज्ये सहभागी झाली आहेत त्यात केरळ, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश राज्यस्थान, तामीळनाडू आदी राज्यांचा समावेश आहे.