Home बातम्या उच्च माध्यमिक शिक्षक निवडणूक कामास वेठीस

उच्च माध्यमिक शिक्षक निवडणूक कामास वेठीस

0

ऐन बारावी परीक्षेच्या धामधुमीत उच्च माध्यमिक विद्यालयांतील अनेक शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचार्‍यांना जिल्हा पंचायत निवडणुकीच्या कामासाठी उपस्थित राहण्याचे आदेश गोवा राज्य निवडणूक आयोगाने दिले असून या प्रकारामुळे सर्वत्र असंतोष पसरला आहे.यापूर्वी राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा पंचायत निवडणुकांसाठी शाळा तसेच हायस्कुलांतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांचा वापर करणार असल्याचे म्हटले होते. मात्र, आता परीक्षा सुरू असताना उच्च माध्यमिक विद्यालयांतील शिक्षक तसेच इतर कर्मचार्‍यांना जिल्हा पंचायत निवडणुकीच्या कामासाठी उपस्थित राहण्याचे आदेश निघाल्याने सर्वत्र आश्‍चर्य व्यक्त होत आहे.
राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कामासाठी पाठविलेल्या नियुक्ती पत्रात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना ७ व १२ मार्च असे दोन दिवस निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमाला न चुकता उपस्थित राहावे असे म्हटले आहे. या आदेशाचे पालन न करणार्‍यांना कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचा स्पष्ट इशाराही आयोगाने आदेशात दिला आहे.
सध्या बारावीची परीक्षा सुरू असून ती १९ पर्यंत चालणार आहे. जिल्हा पंचायत निवडणुका १८ रोजी होत असून निवडणूक कामासाठी बोलावण्यात आलेले शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचार्‍यांना परीक्षेचेही काम सोपविण्यात आलेले असल्याने मोठा घोळ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. बारावीच्या परीक्षा जिल्हा पंचायत निवडणुकांच्या दुसर्‍या दिवशी संपत असल्याने परीक्षा काळात उच्च माध्यमिक विद्यालयांचे शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त राहणार आहेत.