मडगावच्या विराट हिंदू संमेलनात वक्त्यांची हाक या देशात हिंदू बहुसंख्य असूनही त्यांच्यावर अत्याचार होतात. कित्येक वर्षांपासून चालू असलेले अत्याचार चालूच राहिल्यास या देशात हिंदू अल्पसंख्याक बनल्याशिवाय राहणार नाही. हिंदू धर्म टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी जात-प्रांत भेद विसरून संघटित होण्याची हाक प्रमुख वक्त्यांनी काल फातोर्डा येथे भरलेल्या विश्व हिंदू परिषदेच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष जयंतीनिमित्त आयोजित हिंदू संमेलनात दिली.फातोर्डा येथील क्रीडा सराव मैदानावर हे संमेलन भरले होते. पाऊस व उन्हाची पर्वा न करता दुपारी ३.३० वा.पासून रात्रौ ८ वाजेपर्यंत संमेलन चालले. या संमेलनात कोकण प्रांताचे सचिव ऍड. दीपक गायकवाड, ह. भ. प. मंगला वागळे, बाळ महाराज, पुष्पराज स्वामी, स्वामी विज्ञानानंद, काडसिध्देश्वर महाराज हे उपस्थित होते. देश स्वतंत्र झाल्यानंतर हिंदूवर आक्रमणे व्हायला सुरवात झाली. पाकिस्तान, श्रीलंका, मलेशिया, दक्षिण आफ्रीकेत हिंदूवर आक्रमणे झाली. त्याचवेळी हिंदूचे रक्षण करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेची स्थापना झाल्याचे सांगून स्वामी विज्ञानानंद म्हणाले की, हिंदू म्हणून ओळख राहण्यासाठी गेली पन्नास वर्षे देशविदेशांत कार्य सुरू आहे. इतर धर्माशी कोणतेच वैमनस्य नसून या देशांत राहणारे ख्रिश्चन, मुसलमान आमचे बंधू आहेत. परंतु हिंदू धर्माला या कट्टर धर्मवाद्यांनी गुलाम बनविण्याचे सत्र सुरू केले आहे. आज इतर धर्माचे लोक संघटित आहेत; पण हिंदू संघटित नाहीत. राजकारणी स्वत:च्या स्वार्थासाठी फूट पाडतात. १९४७ पासून आजपर्यंत हिंदूवरच आक्रमण झाले व ही परिस्थिती अशीच चालू राहिली तर हिंदू अल्पसंख्याक बनेल अशी भीती दीपक गायकवाड यांनी व्यक्त केली. शिवाजी व संभाजीने हिंदू धर्माच्या रक्षणासाठी त्याग केला. त्यांचे स्मरण करणे आमचे कर्तव्य आहे. देशावर जेव्हा ग्लानी येते तेव्हा अवतारी पुरुष जन्माला येतात. शिवाजी हे अवतारी पुरुष होते, असे बाळ महाराज यांनी सांगितले. हिंदू कोणावरही हल्ले करीत नाहीत. मात्र दुसर्यांनी हल्ले केल्यास ते खपवून घेतले जाणार नसल्याचे बाळ महाराज म्हणाले. सेवालाल स्वामी, मंगला कांबळे यांचीही भाषणे झाली. विश्व हिंदू परिषदेच्या सत्संग विभागाचे केंद्रीयमंत्री दादा वेदक यांनी विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या कार्याची माहिती दिली. कालच्या विराट हिंदू संमेलनात अयोध्येत प्रभू रामचंद्रांचे मंदिर उभारणे, हिंदू धर्मियांना संघटीत करणे आणि गोवंश हत्या बंदी कायदा करण्यासाठी काम करण्याचे तीन महत्त्वपूर्ण ठराव संमत झाले. ध्वजपूजन, गोपूजन करून कार्यक्रमाला सुरवात झाली. गोवा विभागाचे अध्यक्ष संतोष महानंदू नाईक यांनी स्वागत केले. श्री. अशोक चौगुले यांनी आंतरराष्ट्रीय स्थरावरील हिंदू परिषदेच्या कार्याची माहिती दिली. सूत्रसंचालन डॉ. अनिता तिळवे यांनी केले. एकनाथ नाईक यांनी आभार मानले.