किरण बेदी, केजरीवाल यांचे उमेदवारी अर्ज

0
99

दिल्ली विधानसभा निवडणूक
दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजप, आम आदमी पक्ष आणि कॉंग्रेस या तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी काल आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. भाजपच्या उमेदवार किरण बेदी यांनी कृष्णानगरमधून, आपचे अरविंद केजरीवाल यांनी नवी दिल्लीमधून तर कॉंग्रेसचे अजय माकन यांनी सदरबझार मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केले.भाजपवासी झालेल्या किरण बेदी यांनी रॅली काढून अर्ज भरला. यावेळी भाजपाचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. तर अरविंद केजरीवाल यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले.
दिल्लीतील भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार बेदी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर तोंडभरून स्तुतीसुमने उधळली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही अतिशय शिस्तबद्ध संघटना असून देश घडविण्यामागे त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे सांगून त्यांच्यामुळेच देश एकसंध असल्याचे त्या म्हणाल्या. दिल्लीत निवडणुका घोषित झाल्यानंतर भाजपात प्रवेश करून बेदी यांना मुख्यमंत्रीपदाची उमेदवार जाहीर केल्याने आरएसएस नाराज असून या पार्श्‍वभूमीवर त्यांच्या या वक्तव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. केजरीवाल यांनी किरण बेदी यांना चर्चेचे खुले आव्हान दिले असून आपला लढा हा कोणत्याही एका पक्षाविरोधात नाही तर भ्रष्टावार व महागाईविरोधात असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, कॉंग्रेसचे नेते अजय माकन यांनी किरण बेदी आणि केजरीवाल संधीसाधू असल्याची टीका करत दोघेही एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, समाजसेवक अण्णा हजारे यांनी बेदी भाजपवासी झाल्याविषयी विचारले असता राजकारण घाणेरडे असल्याचे सांगून बेदीविषयी बोलण्यास स्पष्ट नकार दिला.
किरण बेदी केजरीवालांपेक्षा श्रीमंत
उमेदवारी दाखल करतेवेळी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी एकूण २.०९ कोटी रुपयांची संपत्ती असल्याची माहिती दिली आहे. तर माजी आयपीएस अधिकारी आणि भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात एकूण ११.६५ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे म्हटले आहे.