रोड रोलरचा ब्रेक निकामी झाल्याने भीषण दुर्घटना; लाखोंची हानी
म्हापसा न्यायालयाजवळील उतरणीवर काल सायंकाळी ४ वाजता रोड रोलरचा ब्रेक निकामी होऊन झालेल्या भीषण अपघातात रोड रोलरने दुचाकी स्कूटरला धडक दिल्याने ललिता संतोष मडगावकर (५०) ही गंडाळ, उसकई – बार्देश येथील दुचाकीस्वार महिला जागीच ठार झाली तर तिचा मुलगा शुभम मडगावकर (१९) हा जखमी झाला. या भीषण अपघातात एकूण दहा दुचाकी वाहनांचा चक्काचूर झाला तर एका चारचाकी वाहनाचेही नुकसान झाले आहे. दोन दुकानेही या अपघातात मोडली असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना एवढी मोठी होती की, या अपघाताची माहिती म्हापशाबरोबरच जवळपासच्या परिसरात पसरताच हजारो लोकांनी घटनास्थळी धाव घेतली.रोड रोलर चालकाच्या ब्रेक निकामी झाल्याचे लक्षात येताच त्याने मोठमोठ्याने ओरडत एका हाताने स्टेअरिंग धरून दुसर्या हाताने लोकांना बाजूला व्हा असे ओरडून सांगत रोड रोलर सावरण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या प्रयत्नाला यश न आल्याने तो म्हापसा पालिकेच्या उतरणीवर असलेल्या मिनेझिस औषधालयाच्या बाजूला मंगेश फोटो स्टुडिओजवळील रस्त्याच्या बाजूला कलंडला. त्यामुळे रस्त्याच्या बाजूला असलेल्या मंगेश फोटो स्टुडिओ व एका टेलरिंग दुकानाचे नामफलक मोडले तसेच या ठिकाणी उभ्या करून ठेवलेली पाच दुचाकी वाहने या रोड रोलरच्या खाली चिरडून चक्काचूर झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. या अपघातात एकूण दहा दुचाकी वाहने चिरडली गेली तर एक चार चाकी वाहनाला धक्का लागून नुकसानी झाली.
दहा दुचाक्यांचा चक्काचूर
या अपघातात रोड रोलरखाली चिरडलेली वाहने जीए ०३ डी – २७४६ पल्सर मोटार सायकल, जीए ०५ के ३८८१ टीव्हीएस स्कूटर, जीए ०३ पी ९१६० चारचाकी वाहन, जीए ०३ एए ८७७७ मोटरसायकल, जीए ०३ ए – ०३६७ पल्सर मोटारसायकल, जीए ०३ एल ७३११ ड्युरो मोटारसायकल, जीए ०७ जे २७२६ यामाहा मोटारसायकल, जीए ०२ एम्. ५२९७ यामाहा, जीए ०१ जी ८३९९ बुलेट, जीए ०३ ई ८८५४ मोटारसायकल या वाहनांचा एकदम चक्काचूर झाला. त्यामुळे वाहन चालकांना लाखो रुपयांचे नुकसान सोसावे लागले आहे. तसेच काही दुकानदारांचेही नुकसान झाले आहे.
म्हापसा न्यायालयाजवळील उतरणीवर ब्रेक निकामी झालेला रोड रोलर बसू चल्लाप्पा खरेनवथ (२८) हा गोकाक-कर्नाटक सध्या राहणारा मडगाव येथील युवक चालवत होता. ब्रेक फेल झाल्याचे लक्षात येताच प्रसंगावधान सांगून त्याने एका हाताने स्टिअरिंग धरून दुसर्या हाताने रस्त्यावरून ये-जा करणार्या वाहन चालक व लोकांना बाजूला राहण्याचे ओरडून सांगण्याचा प्रयत्न केल्याने अनेकांचे प्राण वाचले.
तातडीने मदतकार्य
या अपघाताची माहिती मिळताच म्हापसा पोलीस, म्हापसा वाहतूक पोलीस व अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली आणि पाहणी केली. यावेळी म्हापसा पोलीस स्थानकाचे पोलीस उपअधीक्षक महेश गावकर, निरीक्षक तुषार वेर्णेकर, इतर पोलीस उपनिरीक्षक, हवालदार पोलीस मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच म्हापसा अग्निशामक दलाचे अधिकारी बॉस्को फेर्रांव, दलाचे जवान हनुमंत हळदणकर, अशोक मिशाळ, विष्णू गावस, नामदेव तारी, नारायण चोडणकर, नरेंद्र शेट्ये, जितेंद्र सिनारी, रामा नाईक, संतोष तानावडी, प्रदीप गावकर यांनीही घटनास्थळी जाऊन रस्त्यावर पडलेल्या ऑईलवर फोम टाकून नंतर क्रेनच्या सहाय्याने ती साफ केली.
या अपघाताची माहिती म्हापसा शहर आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांना कळताच हजारो लोकांनी एकच गर्दी केल्याने सुमारे दीड तास वाहनांची कोंडी झाली होती. हा अपघात एवढा मोठा होता की जर समोरून येणारी वाहने या रोल रोलरपासून बाजूला झाली नसती तर त्यात अनेकजण सापडून ठार झाले असते.
चालकामुळे टळला अनर्थ
रोड रोलरचे ब्रेक निकामी झाल्याचे लक्षात येताच चालक बसू चल्लाप्पा खरेनवथ याने प्रसंगावधान साधून एका हाताने स्टिअरिंग धरून दुसर्या हाताने रस्त्यावरून ये-जा करणार्या वाहन चालक व लोकांना बाजूला राहण्याचे ओरडून सांगितल्याने अनेकांचे प्राण वाचले. नपेक्षा मोठा अनर्थ झाला असता.
चालकाला अटक
म्हापसा पोलिसांनी या अपघातास कारणीभूत ठरलेला रोड रोलरच्या चालक बसू यल्लाप्पा खरेनवथ याला अटक केली असून पुढील तपास म्हापसा पोलीस निरीक्षक तुषार वेर्णेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हरिष देसाई करीत आहेत.