तटरक्षक दल आणखी मजबूत करणार : संरक्षणमंत्री

0
132
गस्ती नौकांचे अनावरण करताना संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर. सोबत मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व इतर (छाया : प्रदीप नाईक)

२०१७ पर्यंत १८४ गस्तीनौका आणि १०० विमाने होणार ताफ्यात दाखल
देशाची किनारी सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत करण्यासाठी भक्कम पावले उचलली असून २०१७ पर्यंत भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात १८४ गस्तीनौका आणि १०० विमानांची संख्या वाढविण्यात येईल अशी माहिती संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल मुरगाव बंदरात आयोजित कार्यक्रमात बोलताना दिली.मुरगाव बंदरात भारतीय तटरक्षक दलाच्या चार गस्ती नौकांचे जलावतरण केल्यानंतर संरक्षणमंत्री प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते ‘आयजीसीएस अमोघ’, ‘आयजीसीएस अमेय’ आणि जलदगती गस्तीनौका ‘आयजीसीएस सी-४१३’ आणि ‘आयसीजीएस सी-४१४’ या गस्ती नौकांचे जलावतरण झाले.
२६/११ सारखा भीषण दहशतवादी हल्ला घडविण्याचा दहशतवाद्यांचा कुटील डाव नव्या वर्षाच्या शुभारंभी तटरक्षक दलाच्या जवानांनी उधळून लावल्याने ते अभिनंदनास पात्र असल्याचे गौरवोद्गार काढत संरक्षणमंत्री म्हणाले की, तटरक्षक दलाच्या इतिहासात एकाच वेळी चार गस्तीनौका समर्पित करून केंद्र सरकारने कार्यक्षमता सिद्ध केली आहे. पुढील महिन्यात आणखी दोन गस्तीनौका तटरक्षक दलाच्या ताफ्यात सामील होणार असल्याचे ते म्हणाले.
देशातील जहाजबांधणी कंपन्यांनी तटरक्षक दल किंवा नौदलासाठी बांधणार्‍या जहाजावर अत्यावश्यक सामग्रीची निर्मिती देशातच करण्याचा सल्ला त्यांनी दिला. त्यामुळे इतर राष्ट्रांवर अवलंबून राहण्याची पाळी येणार नसल्याचे ते म्हणाले. कोची शिपयार्ड आणि लार्सन अँड टुब्रो या कंपनीने तटरक्षक दलासाठी चांगले काम केल्याचे सांगून भविष्यात गोवा शिपयार्डलाही तटरक्षक दल आणि भारतीय नौदलासाठी जहाजे बांधणीचे काम मिळणार असल्याची ग्वाही श्री. पर्रीकर यांनी आपल्या भाषणात दिली. या सोहळ्यास मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, सभापती राजेंद्र आर्लेकर, उपसभापती अनंत शेट, आमदार कार्लुस आल्मेदा, तटरक्षक दलाचे व्हाइस ऍडमिरल अनुराग थक्रीयाल, भारतीय तटरक्षक दलाच्या गोवा विभागाचे उपमहासंचालक मनोज बाडकर, एमपीटीचे अध्यक्ष सिरील जॉर्ज, ऍडमिरल शेखर मित्तल आदी मान्यवरांची उपस्थिती होती.