बेतकेकर मास्तर : काही संस्मरणे

0
124

– दिलीप बेतकेकर
आबांची, म्हणजे माझ्या वडिलांची शिक्षक म्हणून कारकीर्द सुरू झाली ४ जून १९५६ मध्ये डिचोलीच्या श्री शांतादुर्गा विद्यालयात. बेतकेकर गुरूजी किंवा बेतकेकर मास्तर म्हणून डिचोलीच्या परिसरात त्यांची खरी ओळख. पण गुरूजी किंवा मास्तरपेक्षाही ते ‘आबा’ म्हणूनच अधिक परिचित. त्यांच्या शिक्षकी पेशाची खरी सुरुवात झाली ती डिचोली तालुक्यातील लाडफे गावात. आबांचे पूर्ण नाव वसंत नारायण बेतकेकर. मोठे बंधू अनंत. लाडफे गावात पोर्तुगीज काळात शिक्षक म्हणून आलेले. लाडफे गावात आत्या. त्यामुळे संबंध. मोठ्या भावाला महाराष्ट्रात सरकारी नोकरी मिळाल्यावर लाडफे गावात शिक्षक म्हणून आबा रुजू झाले. त्या काळी मराठी शाळा कोणाच्या तरी घरी किंवा देवळात चालायच्या. आबाही लाडफ्याच्या देवळात शाळा चालवायचे. माझी आईही लाडफ्याचीच. १९५६ मध्ये माझ्या जन्मानंतर आबा डिचोलीच्या श्री शांतादुर्गा विद्यालयात शिक्षक म्हणून, भट मास्तर म्हणजेच केळकर गुरुजींच्या नेतृत्वाखाली शिकवू लागले. गोवा मुक्तीनंतर १९६२ मध्ये ही शाळा सरकारी शाळा झाली. डिचोली, हातुर्ली, धुमाशे, लामगाव, व्हाळशी, वन, म्हावळिंगे अशा डिचोली तालुक्यातील विविध गावांत आबांनी विद्यादानाचे काम केले.आबा हे एक कडक शिस्तीचे, पण मुलांवर स्वतःच्या मुलांसारखीच माया करणारे शिक्षक. त्यांचा एक विद्यार्थी सांगत होता, ‘‘माझे केस वाढले होते, आबांनी चार आणे दिले आणि शाळेतून केस कापायला न्हाव्याकडे पाठवले.’’ आबा केवळ विषयाचे शिक्षक नव्हते, तर ते विद्यार्थ्यांचे शिक्षक होते.
स्वच्छता, नीटनेटकेपणा, टापटीप याच्याकडे त्यांचे कटाक्षाने लक्ष असायचे. घरी आणि शाळेत साफसफाईकडे त्यांचे विशेष लक्ष. घरी बाकी कोणीही केर काढला, तरी स्वतः हाती झाडू घेऊन सफाई केल्याशिवाय त्यांना चैनच पडत नसे. आज मलाही घरी किंवा शाळेत चपला रांगेत दिसल्या नाहीत तर भयंकर संताप येतो, तो आबांच्या शिकवणीमुळे आणि संघ शाखेवरील संस्कारांमुळे.
आबाही वेंगुर्ल्यात शिकत असताना संघ शाखेत जास्त असत. पुढे डिचोलीत गोवा मुक्तीनंतर संघ शाखा सुरू झाली. माझेही त्या शाखेवर जाणे सुरू झाले. पण सुभाष वेलिंगकर डिचोलीत शिक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर आमचे पूर्ण घर खर्‍या अर्थाने संघाचे घर झाले. सुभाष वेलिंगकरांवर आबांचा विशेष जीव. ते घरी आल्यावर दोघेही एकमेकांना मिठीच मारायचे. माझे कॉलेजचे शिक्षण पणजीत संघामुळेच शक्य झाले होते. त्यामुळे आबांच्या मनात संघाबद्दल कृतज्ञतेची जाणीव होती.
१९७५ साली देशात आणीबाणी आली. सुभाष वेलिंगकरांच्या नेतृत्वाखाली पणजीत आणीबाणी विरुद्ध सत्याग्रह झाला. मीही सत्याग्रहात होतो. आम्हाला अटक झाली. वेलिंगकरांना ‘मिसा’ खाली अटक झाली. त्यांना आग्वाद कारागृहात पाठवण्यात आले, तर आम्हाला पणजीच्या पोलीस मुख्यालयात ठेवले होते. आबा सरकारी शाळेत शिक्षक. त्यामुळे आमचे नातेवाईक चिंतेत. आबांनी सर्व नातेवाईकांना स्पष्ट व स्वच्छपणे सांगितले, ‘‘माझ्या मुलाने चोरी केली नाही, अपराध केला नाही. तो चांगल्या कामासाठी तुरुंगात गेला आहे. त्यात लाज वाटण्यासारखे काही नाही!’’
पुढे माझे पदवीपर्यंतचे शिक्षण झाल्यावर मी संघ प्रचारक म्हणून जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळचे प्रचारक दुर्गानंद नाडकर्णी, वेलिंगकर घरी आबांशी बोलायला आले. आबांनी आनंदाने परवानगी दिली. मी सर्वांत मोठा. माझ्यामागे आणखी पाच भावंडे. आबांचा तुटपुंजा पगार. त्या पगारात आठ माणसांचे कुटुंब चालविणे ही मोठी कठीण गोष्ट. त्यामुळे एक दोन वर्षे प्रचारक म्हणून काम करून मी परत घरी येऊन नोकरी करून त्यांच्या संसाराला थोडी फार मदत करावी, अशी स्वाभाविक अपेक्षा. पण मी आणखी दोन वर्षे प्रचारक म्हणून आणखी थांबणे त्यांना फारसे आवडले नाही.
मी प्रचारक म्हणून थांबलो. वास्कोत शिक्षक म्हणून रुजू झालो. हळूहळू अनेक संघ कार्यक्रमांत, नंतर संघ वर्तुळाबाहेरही व्याख्याने, भाषणे देऊ लागलो. वर्तमानपत्रांत लेखनही करू लागलो. माझे लेख, बातम्या वर्तमानपत्रात वाचून त्यांना अभिमान वाटायचा.
गेल्यावर्षी त्यांच्या वयाला ऐंशी वर्षे पूर्ण झाली. घरीच वाढदिवस साजरा केला. त्यावेळी अनेक विद्यार्थी भेटायला आले. त्यांना भेटताना इतका आनंद होत होता. प्राथमिक शाळेत शिकताना चुकीसाठी आबा कशी शिक्षा द्यायचे याच्या आठवणी विद्यार्थी मला भेटल्यावर सांगायचे.
माझ्या लहानपणी घरी एक तरूण यायचा. मला आश्चर्य वाटायचे. तो मोठा, काम करणारा तरूण हातात पाटी घेऊन यायचा. त्याला एकट्याला आबा घरी शिकवायचे. नंतर कळले की तो काम करीत होता आणि कामावरून सुटल्यावर आमच्या घरी आबांकडे शिकायला यायचा. बोर्डे वडाजवळ एका भाड्याच्या घरात आम्ही राहायचो. तेथेही घरी खूप मुले अभ्यासाला यायची.
मी आजही घरी माझ्या कपड्यांना स्वतः इस्त्री करतो. पण आबा नेहमी परीटघडीटे कपडे वापरायचे. आजही त्यांच्या कपाटात घरी परीटघडीचे कपडे आहेत. साठाव्या वर्षी निवृत्त होईयर्र्ंत ते कधीही आजारी पडलेले, डॉक्टरकडे गेलेले, इस्पितळात राहिलेले आठवत नाहीत.
माझ्या लहानपणची एक आठवण आहे. त्यांना सर्पिण झाली होती. डिचोलीत पाजवाड्यावर कोणी तरी औषध द्यायचा. मी ते औषध आणायला जायचो. त्या औषधाला एक विशिष्ट वास येई. कुठली तरी वनस्पती होती ती. आजही मी सकाळच्या वेळेला फिरायला जातो, तेव्हा काही ठिकाणी काही वेळा त्या वनस्पतीचा मला वास येतो. मला ती ओळखता येत नाही, पण तो विशिष्ट वास आला की मला आबांच्या सर्पिणीच्या त्या आजाराची आठवण येते.
व्यक्तिगत जीवनात आबांनी एक पथ्य पाळले होते. कोणाचेही देणे असता कामा नये याबद्दल ते जागरूक असत. त्यामुळे वर्तमानपत्राचे किंवा पाण्याचे, विजेचे बील वेळच्या वेळी भरले गेलेच पाहिजे हा दंडक. आम्ही मुलांनी कधी मित्रांकडून वही, पुस्तक आणले, किंवा आईने शेजार्‍यांकडून एखादी वस्तू आणली की काम झाल्यानंतर लगेच ती ज्याची त्याच्याकडे पोचली पाहिजे असा दंडक होता. ‘कोणाचाही एक पैसादेखील राहता कामा नये’ याबद्दल आबा खूप आग्रही होते. वयाच्या ऐंशीव्या वर्षीही ते पहाटे उठून ओसरीवर बसून वर्तमानपत्रांची वाट पाहायचे. अक्षर सुंदर व सुवाच्य. कोणतेही व्यसन नव्हते. नाट्यगीते ऐकायला आवडायची. माझ्या जन्माअगोदर एका नाटकात स्त्रीपात्र भूमिका केल्याची आठवण मला नंतर कोणीतरी सांगितली.
आबांनी अनेकांना शाळेत शिकवले. मला त्यांनी शाळेत शिकवले नाही, पण जीवनात अनेक गोष्टी मात्र त्यांनी नकळतपणे शिकवल्या. त्यातील सर्वांत महत्त्वाच्या होत्या, शिस्त, स्वच्छता आणि नीटनेटकेपणा.
गेल्या सहा जानेवारीला रात्री सव्वा दहा वाजता डिचोलीच्या सरकारी इस्पितळात त्यांची प्राणज्योत मालवत असताना मी शेजारी उभा होतो. पण त्या क्षणी ते आमचा निरोप घेत आहेत हे मला कळलेच नाही.
माझे वडील शिक्षक आहेत आणि मला शिक्षकाचा पुत्र असल्याचा अभिमान आहे, असे अनेकवेळा मी व्याख्यानांतून, भाषणांतून म्हणत असे. शिक्षक व शिक्षणाचा वारसा मला माझ्या आबांकडून मिळाला हे माझे सर्वांत मोठे भाग्य!